नवी दिल्ली - महाराष्ट्रात महाविकास नव्हे तर फक्त महावसुली आघाडी सरकार सुरू असल्याचा आरोप करताना भाजपने या राज्यातील ‘शो'' नेमका कोण चालवीत आहे ? असा सवाल विचारला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारले की, ‘शरद पवार यांना राजकीय विश्वसनीयता प्राप्त आहे. मग ते कोणत्या नाईलाजातून गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवत आहेत ?''
कायदामंत्री प्रसाद यांनी सलगपणे दुसरी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. एका राज्याच्या माजी पोलिस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर दरमहा १०० कोटींचे टार्गेट दिल्याचे पत्र लिहिणे, हा प्रकार भारताच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. शरद पवार यांना आपली विश्वासार्हता कायम ठेवायची असेल तर देशमुख यांचा त्वरित राजीनामा घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अखेर काय चालले आहे, असे विचारून प्रसाद म्हणाले की त्या राज्यातही एक ‘खेला'' सुरू आहे. महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा हवाला देऊन ते म्हणाले, की शुक्ला यांचा इतका छळ करण्यात आला की अखेर त्यांना डेप्युटेशनवर सीआयएसएफमध्ये जावे लागले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शुक्ला यांचीच बदली केली.
राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप सदस्यांनी आज मोठा गदारोळ केला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शून्य प्रहाराच्या अखेरीस, ‘देशमुख यांना बडतर्फ करण्याच्या विषयी बोलण्याची परवानगी मागितली होती त्याचे काय झाले?'' असे अचानक विचारले आणि एकच गोंधळ सुरू झाला. संतप्त कॉंग्रेस आघाडी सदस्यांनी भाजपच्या बाकांकडे पहात प्रत्युत्तर दिले. अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी, मी तुम्हाला बोलण्यास परवानगी नाकारली आहे, असे वारंवार सांगूनही गोंधळ चालूच राहिला. अखेर प्रश्नोत्तर तास सुरू होत आहे, असे नायडू यांनी जाहीर केले.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.