Sumitra Mahajan
Sumitra Mahajan 
देश

Loksabha 2019 : मला आता लोकसभा निवडणूक लढवायचीच नाही: सुमित्रा महाजन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत इंदूरच्या जागेवरून पुन्हा इच्छुक असलेल्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपने लांबविल्याने विलक्षण नाराज होऊन, "आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही,' असे स्वतःहून जाहीर केले. दिल्लीतून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुमित्राताईंची पक्षनेतृत्वाबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. भाजप नेतृत्वाला इंदूरमधून महापौर मालिनी गौड यांना तिकीट देण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. 

भाजप नेतृत्वाने 75 वर्षांच्या पुढच्या नेत्यांना निवडणुकीची दारे बंद असे धोरण ठेवले आहे. कर्नाटकात येडियुरप्पा यांचा अपवाद वगळता अशा अन्य साऱ्याच भाजप नेत्यांबद्दल ही फूटपट्टी लावली गेली आहे. मात्र तिकीट कापतानाही त्या नेत्याने "इदं न मम...' या धर्तीवर स्वतःच निवडणूक लढवायची नाही असे जाहीर करावे, असा विचित्र आग्रह पक्षाकडून धरला जात असल्याने अटलजी-अडवानींच्या काळातील भाजपच्या नेत्यांची कोंडी होत आहे. लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्र, करिया मुंडा यांच्यावर असाच प्रसंग ओढवला व त्याच मालिकेत आता सुमित्राताईंचा बळी गेल्याचे मानले जाते. इंदूरमधून तब्बल आठ वेळा निवडून आलेल्या व दिल्लीच्या वर्तुळात "ताई' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमित्राताईंनी पक्षनेतृत्वाशी संपर्क साधूनच निवडणुकीची तयारीही सुरू केल्याची माहिती होती. मात्र त्यांना पक्षनेतृत्वाचा "संदेश' पोचविण्यात आल्यावर त्या नाराज झाल्या. 

लोकसभा सचिवालयामार्फत जारी केलेल्या पत्रकात ताईंनी आपला त्रागाही विलक्षण समंजसपणे व्यक्त केला आहे. पक्षाने आपल्याला विनासंकोच कर्तव्यमुक्त करून इंदूरबाबत त्वरित निर्णय जाहीर करण्यास सांगितले आहे. त्या म्हणतात, ""भाजपने आतापर्यंत इंदूरमध्ये उमेदवाराची घोषणा केलेली नाही. ही अनिर्णयाची परिस्थिती कशामुळे उद्‌भवली आहे? पक्षाला (माझे तिकीट कापण्याबाबत) काही निर्णय घेण्यास संकोच होत असावा, अशी शक्‍यता आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याआधीच यासंदर्भात चर्चा केलेली आहे. मला तिकीट द्यायचे की नाही याचा निर्णय मी त्यांच्यावरच सोडला होता. मात्र उमेदवाराची घोषणा अजूनही न झाल्याने येथे पक्षकार्यकर्ते गोंधळाच्या मनःस्थितीत आहेत. ही कोंडी लवकर फुटावी यासाठी "मला आता लोकसभा निवडणूक लढवायचीच नाही', अशी घोषणा मी करत आहे. यानंतर पक्षाने या जागेबाबत निश्‍चिंत मनाने निर्णय करावा.'' 

जोशी-अडवानी भेट 
भाजप नेतृत्वाने वयाचा निकष लावून तिकीट कापलेले डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अडवानी यांनी तिकीट कापल्यापासून प्रथमच मौन सोडताना काल लिहिलेला ब्लॉग सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. अडवानींनी भाजप संस्कृती म्हणजे काय, याचे धडे वर्तमान नेतृत्वाला दिले होते. त्यातच डॉ. जोशी यांनी आज त्यांच्या "30 पृथ्वीराज रस्ता' येथील घरी जाऊन भेट घेल्याने चर्चा सुरू झाली. दोघांत काय चर्चा झाली याचा तपशील अर्थातच बाहेर आला नाही. मात्र सध्याच्या कार्यपद्धतीत भाजपच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासला जात असल्याबद्दल या दोन ज्येष्ठांनी चिंतायुक्त चर्चा केल्याची माहिती बाहेर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT