दहावीनंतर मिळणारे व्यवसायाभिमुख शिक्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
पुणे - दहावीनंतर मिळणारे व्यवसायाभिमुख शिक्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. आयटीआयच्या प्रवेशासाठी राज्यातील तीन लाख आठ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यातील ५.२३ टक्के विद्यार्थी हे ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर १०० टक्के गुण मिळालेल्या ५३ विद्यार्थ्यांनी, ९६ ते ९९ टक्के मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज केला आहे.
या प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या नियमित फेरीसाठी तब्बल दोन लाख ४८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवीत अर्ज भरला आहे. तर पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना सतर्क झालेल्या महाविद्यालयाचा तपशील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. २९) ‘एसएमएस’द्वारे आणि विद्यार्थी लॉगिनमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयालयाने दिली आहे. काही वर्षांपूर्वी दहावीमध्ये कमी टक्क्यांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘आयटीआय’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे वळायचे. परंतु गेल्या सहा वर्षात दहावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक किंबहुना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थीही आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आयटीआय प्रवेशासाठी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या राज्यातील १६ हजार १५५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.
दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून देखील ‘आयटीआय’कडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षात वाढली आहे. यंदाही ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४०७ आहे. व्यवसायाभिमुख शिक्षणामुळे लवकर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी आणि कमी खर्चात शिक्षण यामुळे आयटीआयकडे येण्याचा ओढा वाढत आहे. अभियांत्रिकीसंदर्भातील ‘ट्रेड’च्या जागा प्रवेशाच्या पहिल्या फेरीतच भरल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने, इलेक्ट्रॉनिक्स, मेटाट्रॉनिक्स, फिटर, मोटार मेकॅनिक आदी ट्रेडचा समावेश आहे.
- योगेश पाटील, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
‘आयटीआय’कडे वळण्याची कारणे
व्यवसायाभिमुख शिक्षण
रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी
कमी खर्चात उपलब्ध होणारे शिक्षण
शिकाऊंना औद्योगिक क्षेत्रात काम करण्याचा मिळणारा अनुभव
स्वयंरोजगाराची खुली होणारी दालने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.