फलटण शहर : जीएसटी ऑफिसमध्ये विविध पदावर नोकरीस लावतो, असे सांगून बनावट ट्रेनिंग ऑर्डर देऊन ११६ मुलांची ४२ लाख ७३ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. या संशयितामध्ये फलटणच्या तिघांचा समावेश आहे.
मारुती गुलाबराव मोहिते (रा. राजाळे, ता. फलटण), रवी अंकुश वणवे (रा. मलठण, फलटण), चंद्रजित अनिल पाटील (रा. कुंडलापूर, ता. कवठेमहांकाळ), संदेश लोटलीकर (रा. मुंबई), नितीन चतुर्वेदी, सचिन चतुर्वेदी दोघे (रा. मथुरा, उत्तर प्रदेश) व कैलास भारत दोशी (रा. लक्ष्मीनगर, फलटण) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत नितीश पोपटराव भोसले (वय २८, रा. संजीवराजेनगर फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की १० सप्टेंबर २०१७ मध्ये मारुती मोहिते यांनी नितीन भोसले यांच्या घरी येऊन मी तुम्हाला नोकरीला लावतो, असे सांगत कागदपत्रे मागितली. कागदपत्रे जामविल्याचे सांगितल्यावर मोहिते यांनी भोसले यांना रवी वणवे याच्या मलठण येथील घरी बोलावून घेऊन तेथे त्यांना जीएसटी असिस्टंट या पदासाठी नोकरीला लावतो, असे सांगितले. त्यानंतर २०१७ मध्ये वाशी नवी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मोहिते, वणवे, पाटील व लोटलीकर यांनी तुमचे सिलेक्शन झाले आहे, असे सांगितले. ऑर्डरची प्रत न देता २५ हजार रुपये रोख स्वरूपात मागून घेतले. तिथे आणखी ४० ते ५० मुलेही कागदपत्रे पडताळणीसाठी आलेली होती. त्यांच्याकडूनही पैसे घेण्यात आले.
त्यानंतर ७ जानेवारी २०१९ पूर्वी १० दिवस भोसले यांना सही शिक्का असलेली ट्रेनिंग ऑर्डर पोस्टाने प्राप्त झाली. त्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंट दिल्ली फरिदाबाद येथे ट्रेनिंग असल्याचे नमूद होते. यानंतर वाशी नवी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ३० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल, असे वणवे व मोहिते यांनी फोनद्वारे सांगितले. हे पैसे रोख स्वरूपात आपण दिले. त्या वेळी तिथे अन्य ३० ते ४० मुले होती, त्यांच्याकडूनही असेच पैसे घेण्यात आले. प्रत्येकी दोन कोरे धनादेश व कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या.
त्यानंतर फलटण येथे सुमारे २५ मुलांना प्रत्येकाकडून त्यांना मिळणाऱ्या पोस्टप्रमाणे वेगवेगळ्या रकमेची मागणी करून पैसे त्याच दिवशी भरण्यास सांगितले. त्यानुसार रवी वणवे व मारुती मोहिते यांनी भोसले यांना २ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम त्यांनी त्या दोघांना रवी वणवे याच्या घरी रोख दिली. यानंतर एप्रिल २०१९ मध्ये वणवे व मोहिते यांनी फोन करून अभिनव एज्युकेशन सोसायटी आंबेगाव, पुणे येथे १० दिवसांचे ट्रेनिंग असल्याचे सांगितले. या ट्रेनिंगला ११७ मुले हजर होती. ट्रेनिंग दरम्यान नितीन चतुर्वेदी व सतीश चतुर्वेदी यांनी त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख, ५०० चा एक व १०० चे दोन स्टॅम्प पेपर सरकारी सर्व्हिस बॉण्ड करण्यासाठी घेतले. यानंतर दोन महिन्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतले. दिल्ली येथील एका संस्थेच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे त्यांनी त्यांच्याकडून १५ हजार ५०० रुपये घेतले.
लॉकडाउन संपल्यानंतर जॉइनिंग लेटर येईल, असे सांगितले; परंतु अद्यापपर्यंत जॉइनिंग लेटर न आल्याने, वणवे व मोहिते यांना याबाबत समक्ष व फोनद्वारे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. २९ मार्च २०२१ रोजी चंद्रजित अनिल पाटील यांनी झूम ॲपवर मीटिंग घेत तुमचे नॉमिनेशन झाल्याचे व लवकरच जॉइनिंग लेटर पाठवू, असे सांगत, आमच्यावर विश्वास नसेल, तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता, असे सांगितले; परंतु आजपर्यंत जॉइनिंग ऑर्डर न आल्याने भोसले यांनी मारुती मोहिते यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी १ लाख रुपये रोख परत दिले. उर्वरित रक्कम देत नाही असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे भोसले यांची १ लाख ९० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली. भोसले यांच्याप्रमाणेच दीपक सुरेश मेंगावडे (रा. रुई, ता. बारामती, जि. पुणे) यांना जीएसटी इन्स्पेक्टर या पदासाठी त्यांनी १ लाख ६५ हजार रुपये, अमोल बबनराव तावरे यास जीएसटी इन्स्पेक्टर या पदासाठी २ लाख ९० हजार रुपये, योगेश नंदकुमार घाडगे (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) व त्याचे सोबत चार मुलांना जीएसटी इन्स्पेक्टर या पदासाठी १४ लाख ७८ हजार रुपये घेतले असून, सूर्याली सोमनाथ भांडवलकर, जगदीश सोमनाथ भांडवलकर (दोन्ही रा. मठाचीवाडी, ता. फलटण), ऋतिक शहाजी सस्ते (रा. बोडकेवाडी, ता. फलटण) यांना जीएसटी इन्स्पेक्टर या पदासाठी त्यांच्याकडून २१ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात कैलास भारत दोशी (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी घेतले असून, इतर मुलांना चंद्रजित पाटील याने मध्यस्थी एजंटच्या मार्फत पैसे घेऊन, तुम्हाला जीएसटी ऑफिसमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून त्यांचीही फसवणूक केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.