Finlands education
Finlands education sakal
एज्युकेशन जॉब्स

फिनलंडच्या शिक्षणपद्धतीचे वास्तव

सकाळ वृत्तसेवा

दिल्लीतील शिक्षकांच्या फिनलंड अभ्यासदौऱ्याचा विषय नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील मतभेदाने गाजला.

- शिरीन कुलकर्णी (फिनलंड)

दिल्लीतील शिक्षकांच्या फिनलंड अभ्यासदौऱ्याचा विषय नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील मतभेदाने गाजला. तथापि, फिनलंडमधील शिक्षणपद्धती नेमकी आहे तरी कशी, याविषयी तिथल्याच शिक्षणपद्धतीचा जवळून अभ्यास करणाऱ्या पालकाने तेथील प्रत्यक्ष स्थितीचे मांडलेले चित्र.

सध्या शैक्षणिक वर्तुळामध्ये फिनलंडची शिक्षणव्यवस्था हा चर्चेचा, कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. इंटरनेटमुळे लोकांना माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे बऱ्याचदा शहानिशा न करता लोक फिनलंडच्या शिक्षण पद्धतीबद्दल लिहीत असतात. अनेक गैरसमज निर्माण होतात. दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वादामुळे फिनलंड पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याबद्दलचा वृत्तलेख नुकताच ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाला होता. वृत्तलेख लिहिणारी व्यक्ती कधी फिनलंडमध्ये राहिलेली नसावी आणि तिने कधीही फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला नसावा, असे लक्षात येते.

मी फिनलंडमध्ये माझ्या कुटुंबासहीत गेली १७ वर्षे राहात आहे. फिनलंडच्या शिक्षण पद्धतीबद्दल इथल्याच तांपेरे विद्यापीठात शिक्षण विभागात संशोधन करते. माझी मुलं इथल्याच शाळेत जातात. शिवाय, मी इथल्या शाळेत शिकवते सुद्धा. त्यामुळे एक शिक्षक, पालक, संशोधक आणि विद्यार्थिनी म्हणून सुद्धा मी फिनलंडची शिक्षण पद्धती जवळून अनुभवते आहे. त्याशिवाय Council for Creative Education या संस्थेची मी संस्थापक-संचालक आहे. त्याद्वारे अनेक देशातल्या शिक्षकांशी नियमितपणे संवाद होत असतो. हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच की, मला फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा दीर्घ अनुभव आहे. फिनलंडच्या शिक्षणपद्धतीबद्दल नुकताच जो वृत्तलेख आला होता त्यातले काही चुकीचे मुद्दे खोडले जावेत आणि योग्य माहिती वाचकांपर्यंत पोचावी, यासाठी हा लेखनप्रपंच.

गैरसमज : विद्यार्थ्यांना फक्त नऊ वर्षे शाळा शिकणे बंधनकारक

वास्तव - सध्या फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांना एकूण १+९+३ म्हणजे १३ वर्षे शिकणे बंधनकारक आहे. पूर्वी प्रीस्कूल आणि दहावी- बारावी अर्थात माध्यमिक शाळेमध्ये जाणं बंधनकारक नव्हतं, पण २०१८ पासून नियम बदलले आहेत.

आठवी इयत्ता शिकणे ऐच्छिक, पण नववी बंधनकारक

- मुळात असं होऊ शकेल का? फिनलंडमध्ये विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर कसा शिकतो आहे याकडे शिक्षकांचं खूप लक्ष असतं. आठवीपर्यंत परीक्षाच नाहीत, असं काही धोरण इथे राबवलं गेलेलं नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलांना सगळ्या इयत्ता बंधनकारक आहेतच.

शिक्षण बंधनकारक न करता वाढीच्या वयात त्यांना मुक्त वातावरण पुरवले जाते

- या विधानाने नक्की काय माहिती पुरवली आहे, ते समजत नाही. मुलांची औपचारिक शिक्षणाची सुरुवात सातव्या वर्षी होते. तेव्हापासूनच इथे शाळेमध्ये अत्यंत खेळीमेळीचे वातावरण असते. मुलांना स्वयंशिस्त लागावी यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. एक उदाहरण देते. मूल जर शाळेत उशिरा पोचले तर भारतात आपण त्या मुलाला किंवा मुलीला वर्गाबाहेर उभे करतो किंवा काही शिक्षा करतो. काही शाळांमध्ये पालकांना बाहेर बसवून ठेवले जाते. यात पुन्हा आणखी नुकसान होते. याउलट जर फिनलंडमध्ये मुलाला उशीर झाला तर त्याने किंवा तिने वर्गात जाऊन सगळ्यांसमोर I am sorry. I am late एवढं म्हणून वर्गात बसून अभ्यास करणं अपेक्षित आहे. या एका वाक्याचा खूप खोल परिणाम मुलांवर होतो आणि मुलं शाळेत जायला उशीर होऊ नये यासाठी प्रयत्न करतात.

शैक्षणिक किंवा व्यावसायिक हायस्कूलमधून पदवीधर होणाऱ्यांचे प्रमाण ९९ टक्के आणि फिनलंड मधील ६६% विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतात.

- ही दोन विधानं खूपच विसंगत आहेत आणि चुकीची माहिती देणारी आहेत. फिनलंडमध्ये उच्च शिक्षण दोन प्रकारे घेता येतं. एक म्हणजे तुम्ही विद्यापीठात जाऊन पदवी घेता, ज्यात थिअरी जास्त आणि प्रॅक्टिकल कमी असतं आणि दुसऱ्या प्रकारात तुम्ही व्यावसायिक प्रशिक्षण घेता ज्यात प्रॅक्टिकल जास्त आणि थिअरी कमी असते. दोन्ही पदव्या समकक्ष असतात. विद्यार्थी दोन्ही प्रकारच्या शिक्षणाकडे आपापल्या आवडीनुसार वळतात.

फिनलंडमध्ये अभ्यासाचं टेन्शन नाही

- अ) मुळात अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन फिनलंडमध्ये वेगळा आहे. खूप तास शिकवल्याने आणि खूप लिखाणाचा गृहपाठ दिल्याने मूल शिकते, असे फिनलंड मधल्या शिक्षकांना वाटत नाही.

ब) Less is more कमी वेळात पण जास्त फोकसने अभ्यास यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून शाळेचे तास प्री स्कूल ते नववी क्रमाक्रमाने वाढवले जातात.

क) ज्या प्रमाणे शाळेचे तास वाढतात त्याच प्रमाणे अभ्यासाची व्याप्ती, शिकण्याचे विषय आणि खोली वाढते. इथे मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, अभ्यासक्रमाचा विस्तार होत नाही तर विषयांची खोली वाढते.

ड) विद्यार्थी प्राथमिक वर्गात असताना त्यांना अभ्यास करताना ज्या अडचणी येतात, विशेषतः शिकण्याच्या प्रक्रियेत त्याकडे विशेष लक्ष पुरवलं जातं. याचं कारण पुढच्या वर्गांमध्ये म्हणजे सातवीपासून त्यांचा अभ्यास त्यांनी स्वत: करणं अपेक्षित आहे. त्यांना कुठलीही तयार प्रश्नोत्तरे दिली जात नाहीत.

फिनलंडमध्ये शेवटी बारावीला एक राष्ट्रीय परीक्षा होते, याशिवाय इतर कुठल्याही चाचण्या मुलांना बंधनकारक नाहीत

- हा एक फार मोठा गैरसमज आहे. फिनलंड मध्ये रचनात्मक मूल्यांकन आणि सारांशात्मक मूल्यांकन या दोन्ही पद्धतीने मुलांची शैक्षणिक प्रगती सातत्याने तपासली जाते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन ही पद्धत योग्य प्रकारे राबवली जाते. प्राथमिक शाळांमध्ये त्यांच्या वारंवार चाचण्या होत असतात. त्यांचे प्रमाण टप्प्या-टप्प्याने वाढवतात.

सातवीपासून पुढे त्यांना चार तासिका असतात. आणि प्रत्येक तासिकेमध्ये भरपूर चाचण्या होतात. शिक्षक अतिशय काटेकोरपणे पेपर तपासतात आणि गुण देतात. उगीच भरमसाठ गुण देण्याची पद्धत नाही. अर्थात यामुळे मुलांना भरपूर अभ्यास करावा लागतो. बारावीच्या शेवटी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा होते, ती अतिशय कठीण आणि विद्यार्थ्यांचा कस पाहणारी असते. एकेक पेपर सहा तासांचा असतो आणि असे किमान पाच पेपर लिहिणं बंधनकारक आहे.

(लेखिका फिनलंडमधील शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT