सोलापूर : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. भरतीसाठी मागच्या वर्षीच्या नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत मागितल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तरीपण, मागील वर्षीच्या उत्पन्नावर आता काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालेल, असे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात शुध्दीपत्रक काढून उमेदवारांमधील संभ्रम गृह विभागाला दूर करावा लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यभरात पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई, सशस्त्र पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस अशी जवळपास साडेचौदा हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारास ज्या जिल्ह्यात किंवा शहरात भरतीसाठी उभारायचे आहे, त्या ठिकाणाची निवड उमेदवार करू शकतो. police recruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. ९ ते ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची मुदत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३३ वयोमर्यादा असणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे. महिलांसाठी उंची १५५ से.मी. आणि पुरुषांसाठी १६५ से.मी. आवश्यक आहे. छाती न फुगवता ७९ से.मी. असावी आणि फुगवून पाच से.मी. वाढणे अपेक्षित आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये आहे.
गृह विभागाच्या आदेशातील मुद्दा...
विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती- ब, क, ड, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा पुरावा म्हणून नॉन क्रिमेलिअर बंधनकारक आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील ते असावे. मूळ प्रमाणपत्र पडताळणीवेळी (छाननी) नॉन क्रिमेलिअर त्या वर्षातील नसल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द होईल, असे गृह विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नॉन क्रिमेलिअरसंदर्भात स्पष्टीकरण...
आर्थिकदृष्ट्या मागास व मागास प्रवर्गातील उमेदवार उन्नत तथा प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भातील पुरावा म्हणून पोलिस भरतीसाठी नॉन क्रिमेलिअर आवश्यक आहे. आता नॉन क्रिमेलिअर काढताना चालू वर्षातील (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) उत्पन्नावर आधारित मिळत नाही. ते मागील तीन वर्षाच्या उत्पन्नावर पण मिळते आणि एका वर्षाचे पण मिळते. त्यामुळे नॉन क्रिमेलिअर काढताना त्यात १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षात तो उन्नत व प्रगत गटातील नसावा, यासाठी भरतीच्या आदेशात ते वर्ष नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिस भरतीसंदर्भात कार्यवाही करणाऱ्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या उत्पन्नावर सध्या काढलेले नॉन क्रिमेलिअर पोलिस भरतीसाठी चालणार आहे.
लेखी परीक्षेला ९० मिनिटांचा वेळ
पोलिस शिपाई भरतीसाठी अंकगणीत, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण या चार घटकांवर १०० गुणांची परीक्षा होईल. वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि त्यासाठी ९० मिनिटांचा (दीड तास) वेळ असणार आहे. चालक पोलिस शिपायांसाठी वाहतूक संदर्भात एक विषय जास्त असणार आहे. लेखी परीक्षा सर्वांची एकाच दिवशी होणार आहे. शारीरिक चाचणी पहिल्यांदा होणार असून त्यात १०० मीटर आणि १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक असे प्रकार आहेत. महिला उमेदवारांसाठी सोळाशेऐवजी आठशे मीटर धावणे असा बदल असणार आहे. किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी चाचणीसाठी निवड केली जाणार आहे.
नॉन क्रिमेलिअर सध्या काढता येते
पोलिस भरतीसाठी नॉन क्रिमेलिअर हे १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळातील उत्पन्नावर आधारित काढलेले आवश्यक आहे. ते मागील वर्षाच्या उत्पन्नावर सध्या काढता येते.
- संजय कुमार, पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.