Dr.-Balaji-Tambe
Dr.-Balaji-Tambe 
फॅमिली डॉक्टर

#FamilyDoctor उपासना शक्‍तीची

डॉ. श्री बालाजी तांबे

गर्भात शक्‍तीचे आवाहन होण्यासाठी नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तास हा कालावधी सांगितलेला आहे. शारीरिक शक्‍तीच्या पाठोपाठ मानसिक व अध्यात्मिक शक्‍तीच्या आवाहनाचा हा उत्सव! नवरात्रात दीपज्योती मध्ये ठेवून चक्राकार, सर्पाकार गतीने नाचत गरबा व रास नाचत नाचत शक्‍तीचे आवाहन केले जाते व शारीरिक स्वच्छतेसाठी उपवास करून जास्तीत जास्त वेळ शक्‍तीच्या आवाहनात घालवला जातो. असा सर्व खटाटोप करावा तेव्हा कुठे ही जगज्जननी शक्‍ती प्रसन्न होण्याची शक्‍यता असते. 

जीवनात पदोपदी, अगदी प्रतिक्षणी सर्वांनाच शक्‍तीची आवश्‍यकता असते. लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी; तरुणांना धडाडीने कार्य करण्यासाठी; चाळिशीच्या सुमाराला हातात घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी व वार्धक्‍यात निदान स्वतःचे काम स्वतः करण्यासाठी शक्‍ती लागतेच, तेव्हा शक्‍ती ही सर्वांनाच पूजनीय असते. 

प्रत्येक देवतेच्या मागे असणारी ‘चिद्‌शक्‍ती’, मंत्रशक्‍तीच्या अगोदर असणारी ‘मातृकाशक्‍ती’, शंकर-महादेवांच्या पलीकडे असलेली ‘पराशक्‍ती’, सर्व मनुष्यमात्रांचे जीवन उजळून टाकणारी ‘कुंडलिनी शक्‍ती’, शिवाजी महाराजांना तलवार देणारी ‘भवानी शक्‍ती’; असा हा सर्व शक्‍तीचा खेळ व पसारा आहे. साहजिकच वेगवेगळ्या मार्गांनी व वेगवेगळ्या वेळी या शक्‍तीची आठवण ठेवण्यासाठी शक्‍तिपूजनाचे अनेक सण असतात. 

त्यात सर्वांत महत्त्वाचा सण असतो ‘नवरात्र’! नवदुर्गाउपासना व शक्‍तीउपासना करणाऱ्यांसाठी हा अमृतयोग होय. या शक्‍तीचे महत्त्व अशासाठी की प्रत्येक घराला घरपणा देणारी, कुटुंबाला कुटुंबपण देणारी व वंशाला वंशवृद्धी व सामाजिक स्थान मिळवून देणारी तसेच प्रत्येक व्यक्‍तीला संरक्षण, समृद्धी, शांती देणारी अशी प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट देवता असते. शक्‍तिउपासना करण्यासाठी नऊ दिवस चालणारा नवरात्र हा सर्वांत मोठा उत्सव. ह्या उत्सवाला अधिक जोर येतो नंतर येणाऱ्या दिवाळीमुळे. शेवटी जे काही दिवे लावायचे ते या शक्‍तीच्याच जोरावर. ‘एकदा काय तो प्रकाश पडू द्या’ या वक्‍तव्यातला प्रकाश ज्ञानशक्‍तीचाच असतो. भारत शक्‍ती व प्रकाशाची उपासना करणारा देश आहे. ‘भा’ म्हणजे तेज व ‘रत’ म्हणजे रममाण होणारा. म्हणजे शक्‍तीच्या व तेजाच्या उपासनेत रममाण होणारे ते ‘भारतीय’! पूजेतल्या मूर्तीला जगदंबा, अंबा असे म्हटले जाते आणि लक्ष्मी, सरस्वती, गायत्री वगैरे रूपांनी ती समजली जाते. ती शक्‍ती आणि वैज्ञानिकांना अभिप्रेत असलेली शक्‍ती, या वेगळ्या नाहीत. एक घटना अशी सांगतात की, विद्युतशक्‍तीचा जनक असलेल्या एडिसनने स्वतःच म्हटले होते की मी वीज शोधली असे म्हणतात, पण ते खरे नाही, मी फक्‍त वीज कशी वापरायची हे शोधले, तिला प्रकट कशी करायचा हे शोधले. वीज म्हणजे काय ते मला कळलेले नाही.

दोन चुंबक ठेवून त्या चुंबकीय क्षेत्रात जर तांब्याची वेटोळी फिरवल्यास शक्‍तीचे आवाहन होऊ शकते, हे वैज्ञानिकांनी शोधून काढले म्हणजे वैज्ञानिकांनी आवाहनाचे तंत्र शोधून काढले. जी शक्‍ती आध्यात्मिक मार्गाने चालणाऱ्यांना व जगदंबेची उपासना करणाऱ्यांना अनाकलनीय व अज्ञात आहे, ती शक्‍ती वैज्ञानिकांना सुद्धा अनाकलनीयच आहे. आवाहनाचे तंत्र वेगवेगळे असू शकते. ही शक्‍ती प्रकट झाल्यावर ती कुठून आली हे मात्र अज्ञातच राहते. एकाच घरातल्या एकाच आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या चार मुलांमधला एक शक्‍तिवान असतो, तर एखादा अगदी दुर्बल असतो. चारही मुलांना जेवण व संगोपन सारखेच मिळत असते; पण एकाच्या अंगावर बाळसे धरत जाते, तर दुसरा रोडावत जातो. एक जाड असूनही त्याच्यात शक्‍ती किंवा स्टॅमिना कमी असतो, तर दुसरा किडकिडीत असूनही शक्‍तिवान असतो. एकाजवळ शारीरिक शक्‍ती असते तर दुसऱ्याजवळ बौद्धिक शक्‍ती असते, असे का असते याचे कोडे भल्याभल्यांना सुटलेले नाही. पण एवढे मात्र निश्‍चित की शक्‍तीविना इकडचे पान तिकडे हलू शकत नाही. किंबहुना असे म्हणता येईल की पान हलल्यामुळे शक्‍तीचे अस्तित्व कळते. ज्यायोगे पान हलते किंवा कुठलीही क्रिया घडते ती ‘शक्‍ती’ अशी व्याख्या करावी लागते.

इंद्रिय, मन व आत्मा यांची प्रसन्नता हे आरोग्याचे लक्षण असते व शक्‍तीशिवाय आरोग्य नसते तर या सर्वांसाठी शक्‍तीची नितांत गरज असते. रडण्यापेक्षा हसण्यासाठी अधिक शक्‍तीची आवश्‍यकता असते. किंबहुना शक्‍ती नसली की रडू येते. अर्थात या शक्‍तीचे अनेक प्रकार असतात, यात संख्यात्मक व गुणात्मक असे भेद असू शकतात. या सर्वांपलीकडे शक्‍तीत काही ‘जाण-समज’ असली तर ती शक्‍ती वेगळ्याच पातळीवर जाऊन पोचते. शक्‍ती सर्वच अणुरेणूंत असते. तिने केलेल्या कार्यवरून तिचे मोजमाप करता येते. जाणीव असलेल्या शक्‍तीला ‘देवत्व’ दिलेले असते. माणसाला सर्वप्रथम हवी देवत्वशक्‍ती. शक्‍तीबरोबरच त्या शक्‍तीच्या कार्याची जाणीव व तिचा दुरुपयोग टाळण्यासाठी मिळालेले संरक्षण सर्वांत महत्त्वाचे. त्याच पाठोपाठ आत्मिक शक्‍ती, मानसिक शक्‍ती, शारीरिक शक्‍ती वगैरे. शारीरिक शक्‍ती जरी विशिष्ट अन्नातून, पाण्यातून मिळणार असली व ह्या शक्‍तीत आवाहन करण्याची (म्हणजे ही शक्‍ती मिळवण्याची) पद्धत विज्ञानाने शोधून काढली असली किंवा आयुर्वेदाने याचे स्वरूप समजावलेले असले तरी शरीरात परिवर्तन घडण्यासाठी शरीरात असलेला वैश्वानररूपी अग्नी अनाकलनीयच राहतो व त्याला परमेश्वर समजले जाते.

अध्यात्मिक क्षेत्रात साडेतीन मात्रात या शक्‍तीची पूजा होते. शक्‍तीची पीठे आहेत सात. विज्ञानातील शक्‍ती सुद्धा साडेतीन स्वरूपात (तीन फेज व न्यूट्रल) अशीच केलेली असते. गर्भात शक्‍तीचे आवाहन होण्यासाठी नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तास हा कालावधी सांगितलेला आहे. शारीरिक शक्‍तीच्या पाठोपाठ मानसिक व आध्यात्मिक शक्‍तीच्या आवाहनाचा हा उत्सव!

नवरात्रात दीपज्योती मध्ये ठेवून चक्राकार, सर्पाकार गतीने नाचत गरबा व रास नाचत नाचत शक्‍तीचे आवाहन केले जाते व शारीरिक स्वच्छतेसाठी उपवास करून जास्तीत जास्त वेळ शक्‍तीच्या आवाहनात घालवला जातो. असा सर्व खटाटोप करावा तेव्हा कुठे ही जगज्जननी शक्‍ती प्रसन्न होण्याची शक्‍यता असते. 

साध्या शारीरिक व मानसिक शक्‍ती मिळवण्यासाठीसुद्धा विशेष कष्ट व विशेष प्रयत्न करावे लागतात. तेव्हा या जगज्जननी मातेच्या शक्‍तीची प्राप्ती सहज होईल अशी अपेक्षा करणे कसे शक्‍य आहे? विशेष आहार, व्यायाम, योग व प्राणायाम या सर्वांचा उपयोग करूनच शारीरिक व मानसिक शक्‍ती मिळू शकते. शारीरिक शक्‍ती मिळवण्याबरोबर ती खर्च कशी करायची हेही शिकावे लागते. कारण शक्‍ती मिळवण्यापेक्षा शक्‍ती वाचवणे खूपच सोपे असू शकते. शरीरात तयार होणारा वीर्यधातू रक्‍त, मांस, मज्जेतूनच तयार होतो, पण गर्भधारणेसाठी जीवनशक्‍तीचे आवाहन करण्यासाठी या सहा धातूंचा उपयोग होत नाही, त्यासाठी लागतो तो सातवा वीर्यधातू. म्हणून या वीर्यधातूची जोपासना, संरक्षण व वृद्धीसाठी आयुर्वेदात खूप महत्त्व दिले आहे व शक्‍तीच्या वर्धनासाठी याचे महत्त्व सांगितले आहे. काय खाण्याने वीर्यवर्धन होते व काय खाल्ल्याने वीर्यनाश होतो हेही आयुर्वेदात स्पष्टपणे समजावलेले आहे. वीर्यनाश होईल अशा सर्व कृती सांभाळून व काळजीपूर्वक निर्णय घेऊन कराव्यात, हेही आयुर्वेदात सांगितले आहे. शारीरिक व मानसिक शक्‍तीविषयी अत्यंत वैज्ञानिक पातळीवर पूर्ण समज आयुर्वेदशास्त्राने नक्कीच करून दिलेली आहे आणि हे विज्ञान आयुर्वेदाने विकसित केलेले आहे. त्याच शक्‍तीच्या जोरावर मनुष्य शारीरिक वा मानसिक पातळीवर संसारात येणाऱ्या घटनांना सामोरे जाऊन संसार सुखाचा होऊ शकतो, शांतता अनुभवू शकतो. शांत झोपेसाठी सुद्धा शक्‍तीचीच आवश्‍यकता असते. अशक्‍त मनुष्य शांत झोपू शकत नाही, तो निपचित होऊन बेशुद्ध होऊ शकतो. जीवनाचे एकही अंग असे नाही, जे शक्‍तीशिवाय चालेल. 

ह्या जगज्जननी, जगदंबामाता, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीची उपासना करण्याची प्रेरणा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाला मिळून शक्‍तिउपासनेसाठी सर्व प्रवृत्त होवोत, हीच प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT