थोडक्यात:
काही दिवसात श्रावण सुरू होणार आहे. या महिन्यात बहुतांश लोक नॉन-व्हेज खाणं टाळतात.
त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी किंवा आषाढ अमावस्या साजरी केली जाते.
या दिवशा वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन-व्हेज डिश बनवल्या जातात. अशीच एक मटण झणझणीत मटण खर्ड्याची रेसिपी ट्राय करण्यासारखी आहे.
Traditional Maharashtrian Akhad Special Recipe: थोड्याच दिवसांत श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण आला की सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे बहुतांश लोक या काळात नॉनव्हेज खाणं टाळतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच अनेक घरांत मनसोक्त नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.
या काळात प्रत्येक घरात काहीतरी खास आणि चविष्ट नॉनव्हेज डिश बनवली जाते. अशाच एका अस्सल मराठमोळ्या आणि झणझणीत मटण रेसिपीची ओळख आम्ही आज तुम्हाला करून देणार आहोत. मटणप्रेमींसाठी ही रेसिपी म्हणजे एक पर्वणीच आहे!
चला तर मग, घरच्या घरी सोप्या पद्धतीने झणझणीत ‘मटन खर्डा’ कसा तयार करायचा, ते जाणून घेऊया.
आपल्या महाराष्ट्रायीन खाद्यसंस्कृतीत 'ठेचा' किंवा 'खर्डा' ही एक झणझणीत आणि चविष्ट चटणी मानली जाते. प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते. हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि जिरं यांचा वापर करून बनवलेला हा खर्डा अगदी झणझणीत लागतो.
हाच झणझणीत खर्डा जेव्हा मटणासोबत शिजतो, तेव्हा 'मटण खर्डा' हा अप्रतिम पदार्थ तयार होतो. यामुळे मटण अतिशय मऊ होते आणि खर्ड्याचा तिखटपणा आणि लसणाचा स्वाद त्यात पूर्णपणे मुरतो.
मटण
१ किलो
हिरव्या वाटणासाठी
६ तिखट हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, १ इंच आले, थोडी ताजी कोथिंबीर, थोडं पाणी
खर्ड्यासाठी
२० तिखट हिरव्या मिरच्या(प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता), ३० लसूण पाकळ्या, २ इंच आले, १ मुठभर कोथिंबीर, अर्धा वाटी सुकं खोबरं (किसलेलं), पाव वाटी ओलं खोबरं (ऐच्छिक), ८-१० पुदिन्याची पाने (ऐच्छिक), १ छोटा चमचा जिरे
इतर
दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, हळद, मीठ, गरम मसाला, तेल आणि तूप
मटण शिजवणे
सर्वप्रथम, हिरव्या वाटणाचे साहित्य घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्या. स्वच्छ केलेल्या मटणाला २ मोठे चमचे हिरवे वाटण, हळद आणि चवीनुसार मीठ लावून चांगले मिक्स करा. कुकरमध्ये २-३ चमचे तेल गरम करून त्यात एक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यात मॅरीनेट केलेले मटण घालून तेलावर ५ मिनिटे परतून घ्या. मटण झाकले जाईल इतपत गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावा. मटण ८५% ते ९०% शिजेल इतपत ४-५ शिट्ट्या करून घ्या. मटण शिजल्यानंतर ते स्टॉकमधून (पाण्यातून) वेगळे करून घ्या.
खर्डा तयार करणे
एका कढईत सुके खोबरे सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. त्याच कढईत मिरची, लसूण आणि आले हलकेसे भाजून घ्या. त्यावर थोडे तेल आणि जिरे घालून परता. हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात कोथिंबीर, पुदिना आणि ओले खोबरे घालून थोडे पाणी वापरून जाडसर पेस्ट तयार करा.
मटण खर्डा एकत्र करणे
एका भांड्यात तूप आणि तेल गरम करून दुसरा चिरलेला कांदा परता. त्यात शिजवलेले मटण घालून १-२ मिनिटे परता. आता त्यात तयार केलेला खर्डा घालून चांगला मिक्स करा आणि २ मिनिटे परतून घ्या. मटणाचा स्टॉक त्यात घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजवा, जेणेकरून मटण आणि खर्डा चांगले मिसळतील. शेवटी, चवीनुसार मीठ, चिमूटभर गरम मसाला आणि उरलेलं कच्चं हिरवं वाटण घालून चांगले मिक्स करा . यामुळे पदार्थाला एक खास ताजेपणा मिळेल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
खर्डा आणि ठेच्यात काय फरक आहे?
(What is the difference between Kharda and Thecha?)
➡खर्डा सिलबट्ट्यावर दळला जातो, तर ठेचा खलबत्त्यात कुटून बनवला जातो.
मटन खर्डा फारसा तिखट लागतो का?
(Is Mutton Kharda extremely spicy?)
➡हो, तो तिखट असतो, पण मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करता येतं.
मिक्सरशिवाय खर्डा तयार करता येईल का?
(Can I make Mutton Kharda without a mixer grinder?)
➡होय, पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात किंवा सिलबट्ट्यावर खर्डा तयार करता येतो.
मटन खर्डा कोणत्या प्रकारासोबत खायला चांगला लागतो?
(What can I eat with Mutton Kharda?)
➡मटन खर्डा भाकरी, चपाती, साधा भात, किंवा इंद्राणी भातासोबत छान लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.