फूड

आजचा रंग करडा; मशरूम खा, हेल्दी राहा!

सकाळ डिजिटल टीम

- संजीव वेलणकर

मशरूमचा भाव देश सापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मशरूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मशरूमला हजार रुपये किलो द्यावे लागतात. ते फार छोटय़ा क्षेत्रात अल्प प्रमाणात येते. मुंबईच्या पाच स्टार हॉटेलात त्याच्या डिशला तीन हजार रुपये पडतात. हा झाला चांदीचा भाव. ते खाणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागते इतके ते अप्रतिम चवीचे व स्वादाचे असते म्हणतात.

फोर सिग्मॅटीक’ या ब्रँडने मशरुम कॉफी ही नवी कॉफी बाजारात आणली आहे. मशरुम हा या कॉफीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. रेशी Reishi मशरुमपासून ही कॉफी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये असणाऱ्या तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते, व ही मशरुम कॉफी रक्तातील साखरेचं प्रमाण आणि चयापचन क्रियेत योग्य तो समतोल राखण्यास कारणीभूत ठरतं. असंही ‘फोर सिग्मॅटीक’ या ब्रँडचे संस्थापक टेरो आय सो कौप्पीला यांनी सांगितल्याचं वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलं होतं.

मशरूम अतिशय पौष्टिक असून याचे काही औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

  • यात प्रोटिनचा भरपूर समावेश असतो.

  • स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.

  • अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

  • खनिजांचा भरपूर साठा असल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.

  • यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.

  • याच्या सेवनाने चयापचय शक्ती सुधारते.

  • यात कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असं असलं तरी मशरूम खाताना थोडीशी खबरदारी बाळगावी लागते. कारण हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला धोकादायकही ठरू शकतं.

काही मशरूमचे पदार्थ

मशरूम करी

साहित्य: एक वाटी मटार, पाव किलो मशरूम, तीन कांदे, टोमॅटोचा रस अर्धा कप, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, दीड चमचा धनेपूड, एक चमचा जिरेपूड

कृती: मशरूम चिरा. थोडे तेल तापवून त्यात जिरे टाका, त्यानंतर कांदा परता. आलं, लसूण, धनेपूड टोमॅटो घालून शिजवा. त्यात उकडलेले मटार, आणि चिरलेले मशरूम घाला. रस्सा घट्ट ठेवा. जास्त पाणी घातलं तर चव लागणार नाही. या मशरूम करीला वेगवेगळ्या मसाल्याची चव देता येते. त्यासाठी तयार झालेल्या करीत कोणताही मसाला अर्धा चमचा घालावा.

मशरूम पुलाव

साहित्य: दोन कप बासमती तांदूळ, पाऊण कप उकडलेले मटार, एक कप मशरूम, लसूण आणि आलं पेस्ट, तीन कांदे स्लाइस केलेले. (पुलावासाठी वेगळा मसाला तयार करा. त्यासाठी मिरे, लवंगा, वेलची, शहाजिरे एकत्र वाटून घ्या. अगदी पावडर करण्याची गरज नाही.)

कृती: तुपावर कांदे स्लाइस केलेला कांदा परता. आलं लसून पेस्ट, मशरूमचे तुकडे करून घ्या. पुलाव करण्यासाठी तांदूळ भिजवून जास्तीचे पाणी घालून शिजवून घेऊन त्यातील पाणी काढा. मग मसाल्यासह मशरूम टाकून प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्या किंवा मसाल्यासह धुतलेले तांदूळ कुकरमध्ये शिजवा. कोथंबीर, तळलेल्या कांद्याने सजवून वाढा.

मशरुम चिली स्प्रिंग ओनियन

साहित्य : मशरुम (एका मशरुमचे चार भाग करून) १ बाऊल, बारीक चिरलेले लसूण २ चमचे, लांब चिरलेले आले १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची १ चमचा, सोया सॉस २ चमचे, बारीक चिरलेली कांदापात, मीठ चवीनुसार, साखर चिमूटभर, व्हाइट पेपर पावडर चिमूटभर, तेल २ ते ३ चमचे

कृती : एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. नंतर सोया सॉस, मीठ, व्हाइट पेपर, साखर टाका. नंतर त्यामध्ये मशरुमचे तुकडे टाकून मोठय़ा आचेवर टॉस करून घ्या. वरून चिरलेला पातीचा कांदा टाकून नीट टॉस करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मशरूम सँडविच

साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड्स, १ चमचा बटर, १/२ चमचा तेल, १५ ते १८ मशरूम, उभे कापून, २ मध्यम कांदे, पातळ उभे कापून, १/२ वाटी किसलेले चीज, १/४ चमचा रेड चिली फ्लेक्स, १ चिमटी मिक्स हब्र्ज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, चिमटीभर साखर

कृती: कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा. कांदा छान परतला की मशरूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हब्र्ज, मीठ, मिरपूड आणि साखर घालून मिक्स करावे. आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे. ब्रेड एक बाजूने कट करावा, पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सव्‍‌र्ह करावे. टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

पनीर मशरूम शासलिक

साहित्य : पनीर क्युब्स ८ ते १०, बटन मशरूम ७ ते ८, ब्लॅक ऑलीव्ह ५ ते ६, ग्रीन ऑलीव्ह ५ ते ६, रंगीत सिमला मिरची १ इंच कापलेले ५ ते ६ तुकडे, शासलिक स्टिक्स (बांबू स्टिक्स) ५ ते ६,

मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड १ चमचा, मीठ, बाब्रेक्यु सॉस २ ते ३ चमचे, (बाब्रेक्यू सॉस नसेल तर टोमॅटो केचप वापरा) व्हाइट पेपर पावडर चिमूटभर, तेल ३ ते ४ चमचे, बारीक चिरलेली लसूण १ टीस्पून, बारीक चिरलेली बेसील पाने २ चमचे (असल्यास), वरील सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून मॅरीनेशन तयार करून घ्या.

कृती : तयार मॅरीनेशनमध्ये पनीर व मशरूम, ऑलीव्ह, रंगीत सिमला मिरची, डीप करून बांबू स्टिक्सला एकामागोमाग एक लावून घ्या. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकून या स्टिक्स ग्रिल करून घ्या. गरमागरम बाब्रेक्यू सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

मशरुम कॉर्न कटलेट

साहित्य : २ मोठे कांदे व १०० ग्रॅम मशरुम चिरलेले, १ वाटी ओल्या मक्याचे दाणे, १ वाटी उकळून मॅश केलेले बटाटे व ब्रेडचा चुरा, २ चमचे बदाम काप, १ मोठा चमचा टोमॅटो कॅचप, बटर, तूप, गरम मसाला, मीठ, मिरेपूड अंदाजे.

कृती : तूप गरम करून कांदे परतून घ्या. ब्रेडचे तुकडे सोडून सर्व साहित्य एका नंतर एक टाकून परतून घ्या. मीठ मिरेपूड टाकून २ मिनिटे शिजू द्या. थंड झाल्यावर ब्रेडचे तुकडे मिसळा व कटलेटच्या आकाराचे गोल बनवा. अर्धीवाटी कॉर्नफ्लोअर आणि १/२ वाटी मशरुम पावडरमध्ये तेल व मीठ टाकून पाण्याने पातळ मिश्रण बनवा. या मिश्रणात कटलेटस बुडवून ब्रेडच्या चुऱ्यात रोल करा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.

मशरुम आचारी टिक्का

साहित्यः १२-१५ मध्यम आकाराचे बटन मशरुम्स, १ कांदा चौकोनी चिरुन, १ भोपळी मिरची चौकोनी चिरुन, १ टोमॅटो चौकोनी चिरुन, २-३ चमचे घट्ट दही , १-२ चमचे डाळीचे पीठ ( भाजलेले असेल तर उत्तम.), २ चमचे आलं-लसुण पेस्ट , २ चमचे लोणचे मसाला. १/२ चीज क्युब किसुन, १/२ चमचा कसूरी मेथी, १/२ चमचा साखर, १ चमचा लाल तिखट, मीठ, हळद, तेल

बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या ग्रील करण्यासाठी.

सॅलड साठी :- १ कांदा उभा पातळ चिरुन, १ टोमॅटो उभा पातळ चिरुन, मीठ, तिखट, लिंबूरस

कृती :- प्रथम मशरुम्स स्वच्छ कापडाने नीट पुसुन घावेत. मशरुम्स कधीही धुवुन घेउन नयेत त्यांना खुप पाणी सुटतं आणी ते मऊ पडतात.मशरुम्स ना खुप माती असेल तर एखादा स्वच्छ न वापरलेल्या टूथब्रश ने हलक्या हाताने साफ करुन घ्यावेत.देठ तसेच राहु द्यावेत. कांदा, आणि ढबु मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. टोमॅटो च्या मधल्या बिया काढुन त्याचे पण मोठे तुकडे करुन घ्यावेत.

एका बाउल मध्ये दही, डाळीचे पीठ, आलं-लसुण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कसुरी मेथी, साखर, तिखट, मीठ, हळद, चीज ईत्यादी सर्व मॅरीनेशन चे साहित्य घेउन नीट एकत्र करावे. हे मॅरीनेशन मशरुम्स, कांदा आणि भोपळी मिरची च्या तुकड्यांना सर्व बाजुनी लागेल असे चोळावे. २०-२५ मिनीट्स फ्रीज मध्ये झाकून ठेवावे. बांबु स्क्युअर्स किंवा लोखंडी सळी वर आधी कांद्याचा तुकडा, मग टोमॅटो तुकडा खुपसुन घ्यावा. मग त्यावर मशरुम देठाकडुन खुपसावे. मग त्यावर ढबु चा तुकडा खुपसून घ्यावा. मग परत कांदा, टोमॅटो, मशरुम आणि भोपळी असे अल्टरनेट खुपसुन घ्यावे. आता तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल सोडावे आणि त्यावर या सळ्या/स्क्युअर्स अलगद ठेवावे.गोल गोल फिरवत सगळीकडुन नीट भाजुन घ्यावे.गॅस ची आच मध्यम असावी म्हणजे करपणार नाही व नीट भाजले जातील. तंदुर ईफेक्ट येण्यासाठी डायरेक्ट गॅस च्या फ्लेम वर काही मिनिटे भाजावे. सॅलड साठी दिलेले साहित्य एकत्र करुन सॅलड करुन घ्यावे. गरमगरम मशरुम टीक्का, सॅलड आणि लिंबाच्या फोडीसोबत सादर करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT