संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला जी भाजी बनवतात ती भोगीची भाजी. मराठवाडा भागात याच दिवसात म्हणजे वेळ अमावस्येच्या सुमारास एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते- ज्याला ‘भज्जी’ म्हणतात.
- नीलिमा नितीन
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये ।।
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः ।।
अर्थात
जसे सूर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते, तद्वतच तुमचे तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो, वाढो ही मनोकामना. मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. या दिवसांमध्ये भरपूर ताज्या भाज्या मिळतात आणि या सगळ्या भाज्यांचा वापर करून, आहारशास्त्र, ऋतुशास्त्र याचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी काही भन्नाट रेसिपीज बनवल्या आहेत. मग तो गाजराचा हलवा असो, की सुरतचा फेमस उंदियो असो, दक्षिणेतला पोंगल कुट्टू असो किंवा महाराष्ट्राची फेमस भोगीची भाजी असो. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि परिपूर्ण अशा या भाज्या हेल्दीच नाही, तर अतिशय चविष्ट असतात. माझी आत्या काय म्हणायची माहिती आहे? ‘न खाई भोगी! तो सदा रोगी!’ मग गपचूप खाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय कुठे होता?
संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला जी भाजी बनवतात ती भोगीची भाजी. मराठवाडा भागात याच दिवसात म्हणजे वेळ अमावस्येच्या सुमारास एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते- ज्याला ‘भज्जी’ म्हणतात. भोगीच्याच भाज्या वापरून ही ‘भज्जी’ केली जाते, परंतु बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ही भाजी पौष्टिक आणि चटपटीतही आहे. तीळ लावलेल्या बाजरीच्या, किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, किंवा गरम फुलक्यांसोबत चविष्ट लागते. तुमच्या चवीप्रमाणे किंवा भाज्यांच्या अव्हेलेबिलिटीप्रमाणे तुम्ही या भाजीत बदल करू शकता.
साहित्य : हिरवे मटार, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ प्रत्येकी एक वाटी; घेवडा एक वाटी, एका गाजराचे तुकडे, दोन वांगी (तुकडे), निवडलेली मेथी एक ते दोन मोठ्या वाट्या, कांद्याची पात एक वाटी, असल्यास थोडी लसणाची पात, हिरव्या चिंचेचा कोळ (हिरवी चिंच पाण्यात उकळून गाळून घ्यावी. ती नसल्यास नेहमीचा चिंचेचा कोळ वापरू शकता), मिरचीचे तुकडे आवडीनुसार, आलं लसूण ठेचून दोन चमचे, एक चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडेसे जास्तच तेल आणि लागेल तसे बेसन. (मला यात भाज्या जास्त व बेसन पीठ कमी आवडते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसन कमी-जास्त करू शकता.)
फोडणीसाठीचे साहित्य : तेल, मोहरी, कडीपत्ता, चवीनुसार तिखट, भरपूर ठेचलेला लसूण आणि थोडेसे हिंग. (यात तुम्ही थोडेसे शेंगदाणेही घालू शकता. छान क्रंची लागतात.)
कृती :
भरपूर तेलाची खमंग फोडणी करून घ्यावी. त्यात सर्व दाणे, मटार घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यातच आले-लसणाची पेस्ट घालावी व उरलेल्या फळभाज्या- जसे की गाजर वांगी घालाव्यात व व्यवस्थित परतून घ्यावे.
यातच हळद मिरचीचे तुकडे घालून मिक्स करावे व झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यावे.
हे दाणे व्यवस्थित शिजले, की यात पालेभाज्या घालाव्यात. ते व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ घालावे व हिरव्या चिंचेचा कोळ व आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
झाकण ठेवून एक वाफ आणावी.
बेसनामध्ये पाणी टाकून त्याची गुठळी न होऊ देता पेस्ट बनवावी. ही पेस्ट भाजीत घालून व्यवस्थित ढवळून घ्यावी. लक्षात ठेवा, गुठळी होऊ देऊ नये. आता झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यावी.
एका कढईत तेल घेऊन त्यात जिरे मोहरी घालावी. कडीपत्ता घालावा; तसेच भरपूर लसूण ठेचून घालावा. यातच तुम्ही शेंगदाणेही तळून घेऊ शकता. ही चुरचुरीत फोडणी तयार भाजीवर घालावी.
ही भाजी दुसऱ्या दिवशी जरा जास्त चांगली लागते, त्यामुळे जास्त प्रमाणात बनवली जाते. हिरव्या, ताज्या भाज्या, दाणे, मटार मुबलक प्रमाणात आहेत. ही ‘भज्जी’ नक्की करून बघा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.