बीजिंग : हिंद महासागरावर वर्चस्व निर्माण करण्याची मनिषा बाळगणाऱ्या चीनने त्यांचे अत्याधुनिक युद्धजहाज पाकिस्तानच्या नौदलाला दिले. शांघाय येथे काल (ता. ८) झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांकडे हे जहाज सुपूर्द करण्यात आल्याचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स’ने आज प्रसिद्ध केले आहे. चीनने निर्यात केलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक युद्धजहाज आहे.
चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (सीएसएससी) या कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी केली आहे. पाकिस्तानने या जहाजाला ‘पीएनएस तुघरिल’ असे नाव दिले आहे. हे युद्धजहाज पाकिस्तानला मिळाल्याने हिंद महासागरात सत्तेचा समतोल साधला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मोईन उल हक यांनी दिली आहे. तुघरिल वर्गातील (०५४ ए/पी वर्ग) एकूण चार युद्धजहाजे पाकिस्तानसाठी बांधली जाणार असून काल त्यातील पहिले जहाज ताब्यात देण्यात आले. याशिवाय पाकिस्तानला चीनकडून आठ पाणबुड्याही मिळणार आहेत.
‘पीएनएस’ तुघरिलची वैशिष्ट्ये
वजन : ४,०५३ टन
लांबी : ४४० फूट
रुंदी : ५२ फूट
पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करण्याची क्षमता
पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता
पाण्याखाली मारा करण्याची क्षमता
देखरेखीसाठी अत्याधुनिक यंत्रणा
चीनची नजर हिंद महासागरावर
गेल्या काही वर्षांपासून चीन पाकिस्तानची लष्करी क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक युद्धजहाजे देण्याबरोबरच चीन पाकिस्तानला जेएफ-१७ थंडरबोल्ट ही लढाई विमाने निर्माण करण्यासाठी मदत करत आहे. हिंद महासागरात आपले वर्चस्व निर्माण करणे हाच त्यांचा हेतू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी हिंद महासागर क्षेत्रातील देशांशीही ते प्रयत्नपूर्वक संरक्षण सहकार्य वाढवत आहेत. जिबुतीमध्ये लष्करी तळ उभारणे, पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदराचा विकास करणे, श्रीलंकेतील हम्बान्टोटा बंदर विकसित करणे हा त्याच प्रयत्नांचा भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.