Nicky Halle esakal
ग्लोबल

Nicky Halle : अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक, निकी हॅले यांची माघार

अनेक राज्यांत पराभव झाल्याने निर्णय

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रखरपणे विरोध करणाऱ्या भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले यांनी आज स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आहे.

अमेरिकेतील १५ प्रायमरींमध्ये झालेल्या निवडणुकीत केवळ एकाच राज्यात विजय मिळाल्यानंतर हॅले यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनीही सांगितले. हॅले यांच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही ट्रम्प विरुद्ध ज्यो बायडेन असा सामना रंगणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रथमपासूनच आघाडीवर होते. विवेक रामास्वामी यांच्यासह इतर काही नेत्यांनी विविध टप्प्यांवर माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. निकी हॅले मात्र स्पर्धेत ट्रम्प यांच्याविरोधात ठामपणे उभ्या होत्या. पुन्हा ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपद गेल्यास देशात अराजकता निर्माण होईल, असे त्या आपल्या प्रचारसभांमध्ये सांगत होत्या. एकामागून एक राज्यांत आणि विशेषत: कॅरोलिना या आपल्या गृहराज्यातही पराभव झाला तरी त्यांनी माघार घेतली नव्हती.

त्यातच वॉशिंग्टन डी. सी. मध्ये विजय मिळाल्याने हॅले यांना बळ मिळाले होते. रिपब्लिकन पक्षाकडून प्रायमरीमध्ये विजय मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या. मात्र, आज निवडणूक झालेल्या १५ प्रायमरींपैकी १४ ठिकाणी पराभव स्पष्ट झाल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. या मोठ्या विजयामुळे ट्रम्प यांनी डेलिगेट्‌सच्या संख्येत बरीच आघाडी घेतली असून येत्या काही दिवसांत त्यांची उमेदवारी निश्‍चित होईल, असे अमेरिकेतील माध्यमांनी सांगितले.

दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्षातर्फे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे पुन्हा एकदा उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. त्यामुळे २०२० प्रमाणेच यावर्षीही ट्रम्प विरुद्ध बायडेन अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत बायडेन यांचा विजय झाला होता.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT