मुले मोठी व्हायला लागली, की त्यांचा भरपूर वेळ घराबाहेर जातो आणि घरात असताना सुद्धा ते अनेक समाजमाध्यमांच्या मदतीमुळे मित्रांबरोबरच असतात.
- डॉ. भूषण शुक्ल
मुले मोठी व्हायला लागली, की त्यांचा भरपूर वेळ घराबाहेर जातो आणि घरात असताना सुद्धा ते अनेक समाजमाध्यमांच्या मदतीमुळे मित्रांबरोबरच असतात. आपल्यापेक्षा खूप वेगळ्या जगात वाढणारे हे मूल पालकांना पटकन अनोळखी वाटायला लागते.
अशा वेळेस अनेक पालक आपल्या मुलांचे मित्र बनून त्यांच्या जगात आपले स्थान टिकवण्याचे प्रयत्न करतात. उगाच मुलांशी जवळजवळ करून, त्यांच्या बोलीभाषेतील स्लॅंग शब्द वापरून आपण किती कूल आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुले दाद देत नाहीत. पालकांशी खरी मैत्री होऊ शकत नाही हे मुलांना समजते. आपले मित्र हे फक्त आपल्या वयाचे असून पुरत नाही, तर ते आपल्या भावनिक आणि मानसिक जगात सहजतेने वावरणारे समकालीन असावे लागतात. आवडी-निवडी यात काहीतरी साम्य लागते, तरच मैत्री बनते आणि टिकते सुद्धा.
अनेकदा आपले खरे मित्रमंडळी पालकांना मुळीच आवडणार नाहीत, याची मुलांना जाणीव असते. लिंग, जात, आर्थिक स्तर, सामाजिक स्थान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेतील गुण हे पालकांच्या मैत्रीच्या हिशोबामधले महत्त्वाचे घटक असतात.
मुलांच्या दृष्टीने - आपले एकत्र जमते का? एकत्र वेळ घालवायला, गप्पा मारायला मजा येते का? मोकळेपणाने बोलता येते का? या मैत्रीमुळे आपली इतरांमध्ये किंमत वाढते का? हे महत्त्वाचे भाग असतात. हे अनेकदा पालकांशी जमत नाही, मग ही मैत्री पालकांपासून लपवली जाते. पालकांशी वाद आणि संघर्ष टाळण्याचा मुले प्रयत्न करतात. यातल्या अनेक मैत्र्या फारशा पुढे जात नाहीत किंवा टिकत नाहीत. आता सर्वच शाळा दरवर्षी बळजबरीने मुलांचे वर्ग बदलतात. घरे लांब लांब असतात. क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग मैत्री दृढ होण्यासाठी जो संपर्क आणि निवांतपणा लागतो तो मिळणे आता अवघड होत चालले आहे.
चांगली मैत्री बनवता येणे हे निकोप मानसिक वाढीचे लक्षण आहे. शाळा, शिकवण्या आणि खेळ यांचे पूर्ण नियंत्रण करणाऱ्या थोरांना हे भान असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना त्यांच्या मित्र-मैत्रिणीसह वेळ घालवायला घर उपलब्ध करून देणे हे पालकांचे काम आहे. जरा निवांत जागा आणि थोडे खाणे एवढे मुलांना पुरते. घरी मुले आल्यावर त्यांच्या गप्पा ऐकत बसणे, सतत प्रश्न विचारणे आणि त्यांच्या घराबद्दल, अभ्यासाबद्दल, सवयींबद्दल खूप प्रश्न विचारत बसणे हे चांगले नव्हे. असल्या घरांमध्ये जाण्याचे मुले टाळतात, खाण्या-पिण्याची खूप रेलचेल असेल तरीही.
नात्यांची पायाभरणी
मेंदूची सामाजिक भूक आणि समज ११-१२ वर्षांपासून वाढते. सामाजिक कौशल्ये सुद्धा वेगाने वाढतात. आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजाचा आवाका येणे, नियम समजणे आणि त्यांची मोडतोड करता येणे, नाती बनवणे, समाजाची गुंतागुंत नीट शिकणे आणि खऱ्या अर्थाने ‘सामाजिक प्राणी’ बनणे हे या वयाचे मेंदूचे महत्त्वाचे काम आहे. समवयस्कांची मैत्री हे मेंदूचे या सामाजिक शिक्षणाचे साधन आहे. सुजाण पालक विशिष्ट अंतरावर राहून मुलांना हे सर्व नीट शिकू देतात. खूप जास्त लुडबूड न करता मुलांना हे सर्व शिकू द्यावे लागते. आपल्या काळज्या खूप डोईजड न होऊ दिल्यास मुले गोष्टी चांगल्या जमवून घेतात आणि त्यांच्या भवितव्याची आणि नात्यांची आपोआप पायाभरणी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.