School Student esakal
health-fitness-wellness

School Student : मुलांमधील दादागिरी व गुंड प्रवृत्ती कशी टाळावी; जाणून घ्या..

लहान मूल धमकावणे, रागावणे, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मोठ्यांकडून शिकतात.

सकाळ डिजिटल टीम

मुलामध्ये नैराश्य असल्यास, शैक्षणिक अक्षमता असल्यास, शारीरिक व्यंग असल्यास त्याला समुपदेशन मिळेल हे पाहावे जेणेकरून त्याची स्वप्रतिमा सकारात्मक होईल.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण, sajagclinic@gmail.com

भाविनच्या आईला (Mother) व भाविनला शाळेतून समुपदेशनासाठी पाठवले होते. भाविन नववीत शिकत होता व वेळोवेळी इतर मुलांसोबत त्याची मारामारी होई, अशी शिक्षकांची तक्रार होती. भाविन एक प्रेमळ आणि प्रामाणिक मुलगा होता. अभ्यासात मात्र तो थोडा गतिमंद होता व उंचीनेही थोडा बुटका होता. भाविनची आई सांगत होती, भाविनचे वडील पोलिस होते व भाविनची तक्रार आल्यास ते त्याला बेदम मारी. भाविनला हल्ली शाळा आवडेनाशी झाली होती कारण, शिक्षकही नेहमी त्यालाच शिक्षा करी.

लहान मूल धमकावणे, रागावणे, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मोठ्यांकडून शिकतात. वेळीच या वागण्याला रोखले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पालकांनी जाणावे. मूल घडवण्यात पालकांचे व शिक्षकांचे (Teacher) मोठे योगदान असते व एकंदरीत कौटुंबिक व शाळेच्या वातावरणाचा मुलांवर प्रभाव असतो. मुलांच्या वर्तणूक समस्येमागे योग्य पालकत्वाचा अभाव, परिवारातील वाद, कौटुंबिक हिंसा तसेच शाळेतील वातावरण असू शकते.

सामान्यतः मुलांमधील हिंसा चार प्रकारची असते. १) शारीरिक हिंसा- मारहाण करणे, ढकलणे, चिमटा काढणे, वस्तू तोडणे. २) शाब्दिक हिंसा- टोपण नावाने चिडवणे, शिवीगाळ करणे. ३) मानसिक हिंसा - अफवा पसरवणे, एकटे पाडणे. ४) सायबर हिंसा - अश्लील ई-मेल पसरवणे, बदनामी करणारा मजकूर, पोस्ट किंवा लाजिरवाणा फोटो शेअर करणे इ. शालेय वयात मुलांची मानसिक जडणघडण सुरू असते, त्यामुळे अनुभवलेल्या छेडछाडीचा दूरगामी परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. शाळेतील हिंसेमुळे मूल आत्मविश्वास गमावण्याचा धोका राहतो. मुलाची स्वप्रतिमा बाधित झाल्यामुळे पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच शाळेने, शिक्षकांनी व पालकांनी त्याला एकजुटीने रोखावे.

हिंसा कधी एकट्याने, तर कधी गटामध्ये घडू शकते. आवेशात किंवा अनियोजित हिंसेच्यामागे मुलाची अतिचंचलता, गतिमंदत्व किंवा नैराश्य असू शकते. नियोजित, ठरवून झालेली हिंसा, गुन्हेगार प्रवृत्तीची चाहूल असू शकते हे जाणावे. हिंसेसोबत जर इतर लक्षणे जसे शाळा बुडवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, आग लावणे आढळली तर मूल गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करते आहे, असे ओळखावे.

हिंसक मुलांच्या पार्श्वभूमीतले काही घटक ः मूल लहान असल्यापासून हट्टी आणी चिडके असते. घरातील मोठे हिंसक वागत असण्याची शक्यता असते. कुटुंब मोठे असते व नियमांमध्ये सातत्य नसते. घरातील माणसे गरिबीत, दाटीवाटीने राहत असल्याने मुलांवर संस्कार करण्यास वेळ नसतो व मुलांवर पुरेशी देखरेख नसते. घरच्या सदस्यांमध्ये शारीरिक बळाचा वापर जास्त व संवाद कमी असतो. मुलांमध्ये शैक्षणिक अक्षमता किंवा इतर वैगुण्य असते. मूल ज्या शाळेत शिकते तिथे वातावरण हिंसामुक्त नसते. मूल वारंवार माध्यमातून, गेमिंगमधून हिंसा अनुभव असते.

मूल हिंसेचा बळी आहे, कसे ओळखावे?

मुलाच्या वागण्यात अचानकचा बदल, जसे शाळा टाळणे, उदास असणे, मित्रांना टाळणे, सतत पोटदुखी किंवा डोकेदुखीचा बहाणा करणे, उगाच घाबरणे, झोप व भूक हरपणे इ. अशावेळी मुलाला विश्वासात घ्यावे. समस्येच्या मुळाशी जाऊन शाळेशी संपर्क साधावा व हिंसा लगेच थांबेल यासाठी प्रयत्न करावा. मुलाला शाळेकडून योग्य आधार, समुपदेशन मिळेल यासाठी आग्रही राहावे.

मूल इतरांवर हिंसा करत असेल, तर काय कराल?

मुलाशी चर्चा करा, त्याला याचे गांभीर्य समजवा व परिणाम समजावून त्याला त्वरित हे वागणे थांबवण्यास प्रवृत्त करा. आपले मूल असे का वागले त्याचे कारण शोधा. समजून घ्या की, मुलाला कोणी आधी छळले होते का? त्याच्या वागण्याचा निषेध करा, मुलाचा नव्हे. मुलाला समजून घ्या; परंतु हे वागणे पूर्णपणे अस्विकार्य आहे, हे ठामपणे जाणवू द्या. मुलाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होण्यास संधी द्या. शिक्षकांना भेटून हे वागणे कसे टाळता येईल यासाठी प्रयत्नशील राहा. पालकांनी व घरातील मोठ्यांनी मुलाशी वागण्यात एकवाक्यता आणावी.

मुलामध्ये नैराश्य असल्यास, शैक्षणिक अक्षमता असल्यास, शारीरिक व्यंग असल्यास त्याला समुपदेशन मिळेल हे पाहावे जेणेकरून त्याची स्वप्रतिमा सकारात्मक होईल. मुलाच्या शालेय प्रगतीसाठी योग्य ती मदत करा. मुलाला अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, खेळ, छंदवर्गामध्ये प्रोत्साहन द्या. त्याच्यातली कौशल्य घडवण्यास मदत करा जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल. मूल कौतुकाने बदलते टिकेने नव्हे हे समजून त्याच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन द्यावे. भाविनच्या आई-वडिलांचे समुपदेशन व शाळेसोबत काम केल्याने भाविनवरची हिंसा थांबली व त्याला शाळा पुन्हा आवडू लागली.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT