Bile acid
Bile acid sakal
आरोग्य

जिंकू या आम्लपित्ताला

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

आम्लपित्त हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. आम्ल अर्थात आंबट व पित्त अर्थात पित्तदोष- अग्नी-पचनक्षमता. पित्तदोष शरीर पचन करण्याकरता जबाबदार असतो. पित्त प्राकृतिक असले तर कटु व तिक्त गुणांचे असते पण जेव्हा हेच पित्त विदग्ध होऊन अर्थात जळून आंबट होते तेव्हा त्याला आम्लपित्त म्हणतात.

तत् पित्तम् अम्लपित्तम् ।..मधुकोष

सध्याच्या काळात ॲसिडिटी शब्द सगळीकडे रूढ झालेला आहे. ॲसिडिटी कशामुळे झालेली आहे, तिची काय लक्षणे आहेत हे समजून न घेता नुसते वरवरचे उपचार केले तर पूर्णपणे गुण येत नाही. आयुर्वेदानुसार आम्लपित्ताची काही खास लक्षणे असतात. आम्लपित्त झाल्यास अपचन होणे, सतत थकवा वाटणे, तोंडात गुळण्या येणे, आंबट वा कडू ढेकर येणे, शरीरात जडपणा वाटणे, छातीत व घशात जळजळ होणे, जेवणात रुची न वाटणे वगैरे त्रास होतात.

अविपाकक्लमौत्क्लेश अतिक्ताम्लोद्गारगौरवैः ।

हृत्कण्ठदाहरुचिभिश्र्च अम्लपित्तं वदेद्भिषक् ।।....माधवनिदान

आम्लपित्त हा पित्तदोषाचा मुख्य विकार. यामध्ये जर वात व कफ या दोन्हींपैकी एकाची वा दोघांची विकृती तयार झाली तर लक्षणे अधिक तीव्र होतात व त्या त्या दोषाप्रमाणे उलट्या होणे, डोके दुखणे, हात-पाय गरम वाटणे, अंगात ताप असल्यासारखे वाटणे, खाज येणे, शहारे येणे एवढेच नव्हे तर भ्रम होणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे येथपर्यंत त्रास होऊ शकतात. ॲसिडिटी वाढली की अँटासिड घेण्याची प्रवृत्ती असलेली दिसते.

पण आयुर्वेदानुसार आम्लपित्ताचा त्रास सुरू झाला की लगेच योग्य औषधोपचार केल्यास बरा होऊ शकतो. पण या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अर्थात आजार जीर्ण झाल्यास सुधारणा होणे अवघड होत जाते व नंतर योग्य उपचार मिळूनही कधी कधी हवा तसा गुण येऊ शकत नाही. त्यामुळे ॲसिडिटी झाल्यास नुसते अँटासिड घेऊन ॲसिडिटी न्यूट्रलाईझ करणे हा या आजारावरचा खरा उपचार नव्हे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आम्लपित्त होण्याची कारणे काय आहेत व हा त्रास सध्याच्या काळात एवढ्या प्रमाणात का वाढतो आहे हे पाहणे योग्य ठरेल. ऋतूनुसार, तिथीनुसार समुद्राच्या लाटा कमी-जास्त होत राहतात, भरती-ओहोटीची वेळ बदलत राहते, त्याचप्रमाणे निसर्गनियमानुसार वात-पित्त-कफाचा एक निश्र्चित क्रम आपल्या शरीरात असलेला आढळतो. वर्षा ऋतूत शरीरात पित्ताचे संचयन होते व शरद ऋतूत पित्ताचा प्रकोप होतो.

सुरुवातीपासून आयुर्वेदात सांगितलेले आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने त्या त्या ऋतूत त्या त्या दोषावर काम करणे आवश्यक असते. सध्या या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे वर्षानुवर्षे पित्त आपल्या शरीरात साठत राहते. त्याचबरोबरीने आपली दिनचर्या व आहार यात होत असलेल्या चुकाही आम्लपित्त वाढायला कारणीभूत ठरतात.

1) विरुद्ध अन्नपान – काही अन्न व द्रव हे एकमेकांशी विरुद्ध कार्य करत असतात. आयुर्वेदात याबद्दल सखोल मार्गदर्शन सापडते. गरम-गार गोष्टी एकत्र घेणे, दुधाबरोबर फळे घेणे, दुधाबरोबर मांसाहार घेणे वगैरे विरुद्धान्न घेण्यात येण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे.

2) सध्या आम्ल वा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

3) गोठविलेले पदार्थ, जंक फूड हेही आपल्या पचनसंस्थेसाठी चुकीचे ठरते.

4) रेडीमेड अन्नात मीठ व तिखट या दोन्हींचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळेही पित्तदोष प्रकुपित व्हायला मदत होते.

5) रात्रीची जागरणे, सकाळी उशिरा उठणे हे सुद्धा पित्तप्रकापासाठी कारणीभूत ठरते.

आम्लपित्त कमी करायचे असले तर सर्वप्रथम आपल्याला आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • गहू, जव, ज्वारी, जुने तांदूळ, नाचणी वगैरे धान्ये; दुधी, भेंडी, पडवळ, काकडी, घोसाळी, कोहळा वगैरेंसारख्या पाणीदार भाज्या वगैरे आहारात ठेवाव्या. आहारात शक्यतो उसळींचे प्रमाण कमी असावे, त्यातल्या त्यात मूग उत्तम.

  • दूध, लोणी, तूप यांचा वापर आहारात नक्की असू द्यावा.

  • मसाल्यांमधील धणे, जिरे, जायफळ, दालचिनी वेलची, सुंठ वापरणे जास्त उत्तम. फार जास्त प्रमाणात लाल तिखट, मिरची वापरणे अयोग्य ठरते.

  • आम्लपित्तामध्ये उकळून गार केलेले पाणी पिणे उत्तम. गरम वा अत्यंत थंड पाणी पिणे टाळावे. पोटात जळजळ जाणवते म्हणून बऱ्याच व्यक्ती फ्रीजमधील गार पाणी पिणे, शीतपेये पिणे अशी तात्पुरती मदत करणाऱ्या गोष्टी करतात पण त्यामुळे आम्लपित्त अजूनच उफाळते.

  • फार जास्त प्रमाणात पाणी पिणे, चहा-कॉफीचा अतिरेक टाळणे उत्तम.

  • आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी मद्यपान टाळणे इष्ट.

  • पोटात त्रास जाणवत असताना अधूनमधून मूठभर साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होतो. सकाळी न्याहारीच्या वेळी शतानंत कल्प किंवा अनंत कल्प टाकलेल्या दुधाबरोबर साळीच्या लाह्या खाल्ल्यास दिवसभर पित्ताचा होत नाही असा अनुभव आहे. साळीच्या लाह्यांचे पाणी घेणेही आत्मपित्ताच्या त्रासात उपयोगी ठरते.

  • मूठभर काळ्या मनुका चावून खाल्ल्याने फायदा होतो. किंवा रात्रभर मनुका पाण्यात भिजवाव्या. सकाळी मनुका चावून खाव्या व पाणी थोडे थोडे प्यावे.

  • नारळाचे पाणी अधून मधून पिण्यात ठेवावे. स्वयंपाकामध्ये नारळाचा चव वापरणे उत्तम.

  • सध्या कांदा-लसणाचा मसाला लावून वेगवेगळे पदार्थ करण्याची पद्धत रूढ होत आहे, चव वाढविण्याच्या दृष्टीने टोमॅटोचा वापरही सढळ हाताने होताना दिसतो. याऐवजी खोबऱ्याचा वापर केला तर पदार्थ चविष्ट होतो तसेच पित्त वाढत नाही.

  • रोज मोरावळा, गुलकंद वगैरे नियमित घेण्याचा फायदा मिळू शकेल.

  • आम्लपित्तामुळे सतत मळमळ होत असली, अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्या तर सौम्य विरेचन घेणे उत्तम. यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने संतुलन त्रिफळासारखे चूर्ण अधून मधून घेणे चांगले. संतुलन अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण नियमाने घेतल्याचा फायदा मिळू शकेल.

  • नारळाच्या वड्या, पेठा, राजगिरा, कोकम सरबत, आवळ्याचे सरबत, कोथिंबीर-धणे-जिरे-पुदिना यांच्यापासून बनविलेली चटणी, शिंगाड्याची खीर किंवा लाडू, मुगाचे लाडू वगैरे आहारात ठेवणे उत्तम.

  • आम्लपित्तावर सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे. यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतिनुरूप वमन, विरेचन घेणे, बरोबरीने अनुवासन व आस्थापन बस्ती घेणे उत्तम ठरू शकते.

  • आम्लपित्तामुळे उलटी येत असल्यास बरेच लोक ती थांबविण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने त्रास अजूनच वाढू शकतो.

  • मानसिक ताण, काही कारणामुळे राग राग होणे वगैरेंमुळेही आम्लपित्त वाढू शकते. याकरता सर्वांत महत्त्वाची असते मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, चांगले संगीत ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, आराम करणे. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे स्वास्थ्यसंगीत ऐकण्याचाही फायदा होऊ शकतो.

  • रात्री झोपण्यापूर्वी डोक्यावर ब्रह्मलीन तेल लावणे, नियमितपणे पादाभ्यंग करणे हेही आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी मदत करू शकते.

एकूणच आम्लपित्त- ॲसिडिटी हा बारीक-सारीक त्रास आहे असे समजून त्यासाठी दुर्लक्ष करण्यापेक्षा वा छोटे छोटे उपचार घेण्यापेक्षा आजारावर व्यवस्थितपणे उपचार केले तर मूळचा त्रास कमी होईलच बरोबरीने त्यातून उद्भवू शकणाऱ्या मोठ्या त्रासांना प्रतिबंध होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT