थोडक्यात:
हार्मोन्स म्हणजे शरीरात तयार होणारी रसायने असून, त्या विविध ग्रंथींद्वारे निर्माण होतात व शरीराच्या अवयवांचे कार्य नियंत्रित करतात.
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक विकार निर्माण होतात जसे की डायबेटीस, थायरॉईड, पीसीओएस, वंध्यत्व इ., ज्यांचे अचूक निदान व उपचार गरजेचे असतात.
हार्मोनल विकार मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतात, त्यामुळे वेळेत लक्षणे ओळखून तपासणी व उपचार आवश्यक आहेत.
Common Symptoms of Hormonal Imbalance in Women: हार्मोन्स जसा ओळखीचा तितकाच अनोळखी शब्द! हार्मोन्स म्हणजे शरीरात तयार होणारी काही रसायने, जी शरीराच्या अनेक अवयवांचे "केमिकल कंट्रोल' करीत असतात व त्या अवयवांची कार्ये त्याद्वारे नियंत्रित करीत असतात. मराठीत आपण त्यांना अंतःस्राव म्हणतो.
शरीरात अनेक अशा ग्रंथी कार्यरत असतात, ज्या असे हार्मोन्स तयार करून त्यांना रक्तामध्ये मिसळवितात. असे हार्मोन्स तयार करणाऱ्या ग्रंथींना अंतःस्रावी ग्रंथी (Endocrine Glands), थोडक्यात हार्मोन्स ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींचा व हार्मोन्सचा सखोल अभ्यास करणाऱ्या वैद्यकीय शाखेला अंतःस्राविकी (Endocrinology) म्हणतात. या शाखेतले सर्वोच्च प्रशिक्षण व अनुभव घेऊन या हार्मोनल विकारांची चिकित्सा व उपचार करणाऱ्या तज्ज्ञांना अंतःस्रावी ग्रंथी अर्थात, हार्मोनतज्ज्ञ (Endocrinologist) असे संबोधले जाते.
हार्मोन्सच्या तयार होण्यात किंवा कार्य करण्यात कमी-जास्तपणा झाला, तर शरीरातील व रक्तातील या हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त (Imbalance) होते व त्यातून अनेक प्रकारचे हार्मोन विकार निर्माण होतात. हार्मोन विकारांचे अनेक प्रकार असतात. ते विविध प्रकारे शरीरातील अनेक अवयवांवर दूरगामी व गंभीर परिणाम करू शकतात. एकदा का हे परिणाम गंभीर बनले, की मग पुढे त्याचे नियंत्रण गंभीर बनून जाते. म्हणून वेळेत त्याचे निदान होऊन योग्य उपचार सुरू होणे महत्त्वाचे ठरते.
उपचारांची दिशा ठरविण्यासाठी मुळापर्यंत जाऊन हार्मोन विकारांचे निदान होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी "हार्मोनल चेकिंग'ची गरज पडते. बऱ्याच वेळा या हार्मोन तपासण्या थोड्या महागड्या असू शकतात; पण हार्मोनतज्ज्ञांकडून त्या योग्य प्रकारे व अचूकतेने करून घेऊन योग्य त्या निदानापर्यंत पोचल्यास आपले अनेक प्रश्न परिणामकारकतेने सुटू शकतात.
सामाजिक प्रश्न बनू पाहणारा "डायबेटिस' हा सर्वांत महत्त्वाचा हॉर्मोनविकार. इन्शुलिन हार्मोनच्या असंतुलनातून निर्माण होणारा हार्मोन विकार रक्तातील साखर अनियंत्रित करतो व अनेक गंभीर व दूरगामी परिणाम शरीरावर करू शकतो.
"थायरॉईड' हा काही आजार नसून, ती एक हार्मोन ग्रंथी आहे. थायरॉईड ग्रंथी गळ्यामध्ये असते व तिच्या हार्मोन्स तयार करण्यामध्ये कमी-जास्तपणा झाल्यास किंवा त्या ग्रंथीमध्ये गाठी तयार झाल्यास थायरॉईड ग्रंथीचे अनेक प्रकारचे विकार उद्भवतात. थायरॉईडचे विकार हे उपचारयोग्य असतात.
"लठ्ठपणा'मागे अनेक हार्मोनल कारणे असू शकतात. ती असतील, तर ओळखणे महत्त्वाचे. लठ्ठपणामुळे अनेक हार्मोनल विकार मुख्यत्वे "डायबेटिस',"पी.सी.ओ.एस.' इत्यादी होऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या अनेक समस्यांमागे हार्मोनल असंतुलन हे महत्त्वाचे कारण असते. हार्मोनल उपचारांनी त्याचे उपचार परिणामकारकतेने होऊ शकतात.
स्त्रियांमधील शरीरावरील/चेहऱ्यावरील जास्तीचे केस, पिंपल्स यामागेही हार्मोनल विकार कारणीभूत असू शकतात. त्यामागील कारणे अचूक शोधून त्यावरील हार्मोन उपचार योग्य प्रकारे घेणे महत्त्वाचे. "पी.सी.ओ.एस.' हा स्त्रियांमधील एक हार्मोन विकार असून, वजन वाढणे, मासिक पाळीच्या समस्या, चेहऱ्यावर केस, पिंपल्स वाढणे, वंध्यत्व व लहान वयात मधुमेह या अनेक समस्यांमागे "पी.सी.ओ.एस.' असू शकतो.
लहान मुलांमधील उंचीच्या समस्या, वयात येतानाच्या हार्मोन समस्या, मुलांमध्ये जननेंद्रियाचे विकार, स्थूलपणा, छातीची वाढ, हाय ब्लड प्रेशर व हाता-पायांचा वाकडेपणा, मुडदूस (Rickets) या सर्व समस्यांमध्ये हार्मोनल असंतुलन हेच कारण बऱ्याच वेळा असते. त्याचे अचूक निदान व मुलांच्या आयुष्यभराच्या अनेक दूरगामी समस्यांपासून वाचवू शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
(सकाळ अर्काईव्हमधून)
हार्मोन म्हणजे काय? (What are hormones?)
हार्मोन्स म्हणजे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींनी तयार केलेली रसायने जी विविध शारीरिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतात.
हार्मोन बिघाड कसा ओळखावा? (How to identify hormonal imbalance?)
अनियमित पाळी, वजन वाढ, थकवा, पिंपल्स, केस गळणे, मूड स्विंग्स ही लक्षणं हार्मोनल बिघाड दर्शवू शकतात.
हार्मोन विकारांचे निदान कसे होते? (How is hormonal imbalance diagnosed?)
रक्त तपासण्या, हार्मोनल प्रोफाइल, तज्ज्ञांची सल्ला घेऊन अचूक निदान केले जाते.
हार्मोन विकारांचे उपचार कोण करतो? (Who treats hormonal disorders?)
हार्मोन विकारांचे निदान व उपचार एंडोक्रिनोलॉजिस्ट म्हणजेच हार्मोन तज्ज्ञ डॉक्टर करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.