औरंगाबाद : मासिक पाळी म्हणजे स्त्रियांसाठी अडचणीचे दिवस. याविषयी आजही ग्रामीण भागात नकारात्मक दृष्टिकोन आहे. काही कुटुंबांमध्ये यावर बोलणेही टाळले जाते. त्यामुळे महिलांची खास करून किशोरवयीन मुलींची यात कोंडी होते. हे चित्र बदलण्यासाठी येथील वुड्रिज स्कूलची बारावीमध्ये शिकणारी आर्या गावंडे सरसावली आहे. हे अडचणीचे दिवस सुखद व्हावे, यासाठी तिने ग्रामीण भागात ‘टिकल्स पिंक मूव्हमेंट’ सुरू केली. याशिवाय पॅडऐवजी मेन्स्ट्रुअल कप कसा योग्य आहे, हे ती पटवून देत आहे.
सॅनिटरी पॅड वापरताना स्वच्छतेची खूप काळजी घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्वचेचे आजार होऊ शकतात. सॅनिटरी पॅड्समध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे त्याचे विघटन होत नाही. परिणामी, पर्यावरणाला धोका होतो. मासिक पाळीत पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप वापरला तर शारीरिक समस्या दूर होतीलच, शिवाय पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. या दोन्ही विषयांबाबत समाजात आर्या जनजागृती करीत आहे. शिवाय हे चार दिवस निसर्गचक्र चालविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, असेही ती ग्रामीण भागातील मुली व महिलांना ‘टिकल पिंक मूव्हमेंट’द्वारे सांगत आहे.
कसे सुचले?
मासिक पाळीत पॅड वापरल्याने मोठ्या प्रमाणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, याचा अनुभव आर्याला आला. शिवाय पॅडला मेन्स्ट्रुअल कप हा उत्तम पर्याय आहे. हेही तिने जाणले. याबाबत सगळ्यांना माहिती व्हावी, यासाठी तिने मोहीम राबण्याचे ठरवले. सुरुवातीला आई-वडिलांना याविषयी सांगितले. त्यांनी तिला पाठिंबा दिला. नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजे साधारणतः जूनपासून तिने ग्रामीण भागातील गावागावांत जाऊन जनजागृती सुरू केली.
आधी मिळत नव्हता प्रतिसाद
सुरुवातीला मुली, महिलांना मासिक पाळी, सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कपविषयी विचारले असता कुणी बोलत नव्हते. मुली तर खाली माना घालून निघून जात होत्या. मात्र, आर्याने खचून न जाता हळूहळू घोळक्याने नव्हे तर एकट्यात बोलून जागृती सुरू केली. आता ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन ती मार्गदर्शन करते. तिला आता अनेक शाळांकडून बोलवणे येत आहे. सध्या कॉलेज सुरू आहेत. त्यामुळे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस एक वाजता कॉलेज सुटले की, आर्या ग्रामीण भागातील एक गाव निवडून भेट द्यायला निघते. केवळ तीन महिन्यांत आर्या दोन ते अडीच हजार महिला, मुलींपर्यंत पोचली आहे.
लोकवर्गणीतून शैक्षणिक साहित्यही
मासिक पाळीविषयी जनजागृती करताना ग्रामीण भागातील अनेक मुलांना शैक्षणिक साहित्यही घेणे परवड नसल्याचे आर्याच्या लक्षात आले. त्यातून तिने लोकवर्गणी जमा करून मुलांना त्यांच्या गरजेप्रमाणे शैक्षणिक साहित्य देणे सुरू केले आहे. अशाप्रकारे तिने आतापर्यंत तिने ६० पेक्षा जास्त मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.
आर्थिकदृष्ट्या कप्स स्वस्त
एक महिला तिच्या संपूर्ण आयुष्यात अंदाजे १५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स वापरते. त्यासाठी सुमारे सव्वालाख रुपये खर्च होतात. परंतु, एक मेन्स्ट्रुअल कप्स दोनशे ते २५० ते ३०० रुपयांना मिळतो आणि तो जवळपास दहा वर्षे वापरता येतो. भारतातील लोकसंख्येतील महिलांची संख्या विचारात घेता कोट्यवधी महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर उभ्या ठाकणाऱ्या पर्यावरणीय आणि आरोग्य समस्यांचा विचार कोणीही करीत नाही.
आधी केले, मग सांगितले...
आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे. लोक उपदेशापेक्षा अनुकरण करण्यास प्राधान्य देतात. एक दृष्टांत असा आहे की, कोणतेही नीतिशास्त्र पुस्तकांमधून शिकविल्यानंतर ते जेवढे रुजते त्यापेक्षा ते अधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. अनेक संतांनी वर्तनावर भर दिला आहे. ते म्हणतात, ‘मार्गाधारे वर्तावे’ किंवा ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले’ अशा आशयाची अनेक वचने आपल्याकडे आहेत, परंतु, आर्यासारख्या स्वतः आचरणात आणून इतरांना प्रेरणा देणाऱ्या समाज घटकांनी पुढे येण्याची गरज आहे.
सॅनिटरी पॅड अन् मेन्स्ट्रुअल कप्सची तुलना
पॅड्सऐवजी कप वापरामुळे दुर्गंधी येत नाही. कपमुळे रक्त हवेच्या संपर्कात येत नाही.
कप्स बारा तास वापरता येतात, पॅड वारंवार बदलावे लागतात.
कप्सचे निर्जंतुकीकरण होते, त्यामुळे त्वचेला त्रास होत नाही.
पॅडमुळे त्वचेला त्रास किंवा संसर्ग होऊ शकतो. तसेच ‘इंटिमेट एरिया’ची त्वचा पॅड्सने घासल्यामुळे वेदना होतात.
कप्सचा वापर करून जीम, शारीरिक कामे, विविध खेळ आरामात खेळू शकता.
मेन्स्ट्रुअल कप्स पॅडपेक्षा पाच पटीने रक्त शोषतात. मात्र, पाळीत कमी जास्त प्रमाणात रक्त प्रवाह झाल्यास पॅड बदलावे लागतात.
शारीरिक समस्या, पर्यावरणास हानीकारक असलेल्या सॅनिटरी पॅडपेक्षा सिलिकॉन कप महिलांसाठी कधीही चांगले आहेत. आपल्या देशात याबाबत अजून पूर्णपणे महिलांमध्ये जागृती नाही. त्यामुळे महिलांनी अधिकाधिकक शिक्षण आणि पब्लिक लाईफ प्रशिक्षण, स्वॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण अशा क्षमतांचा विकास करायला हवा. कुटुंब व्यवस्थेत सर्वसाधारणपणे शारीरिक, मानसिक, आर्थिक सुरक्षा मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
-डॉ. अर्चना पाटील, गर्भविकार तज्ज्ञ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.