यशाचा विक्रम नोंदवाल
मेष : सप्ताहात व्यावसायिक पार्श्वभूमीवरील जुगारसदृश व्यवहारापासून लांब राहा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहारापासून अंतर राखले पाहिजे. बाकी सप्ताहाचा शेवट अर्थातच ता. १३ आणि १४ हे अष्टमीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस होतकरू तरुणांचे भाग्योदय करतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती एखादे स्पर्धात्मक यश अथवा विक्रम नोंदवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात विवाहयोगाची शक्यता.
नोकरीच्या उत्तम संधी येतील
वृषभ : आजचा रवि-शुक्र केंद्रयोग मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र फळे देऊ शकतो. सरकारी नियम पाळा. रस्त्यावर ‘ओव्हरटेक’ नको. अर्थातच सिग्नल पाळा. बाकी सप्ताहातील ता. १२ ते १४ हे दिवस मोठी रंगतदार फळे देतील. व्यावसायिक वसुली. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीच्या संधी. मुलाखतीमधून यश मिळेल. ओळखी-मध्यस्थीतून मोठे लाभ होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ ची अष्टमी घरामध्ये आनंदोत्सवाची ठरेल.
व्यावसायिक मोठी वसुली होईल
मिथुन : सप्ताह जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर जपण्याचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र फसवणुकीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. संमोहन टाळा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह घरातील वृद्धांची चिंता वाढवू शकतो. बाकी सप्ताहातील अष्टमीचं प्रभावक्षेत्र वादग्रस्त वास्तुविषयक प्रकरणातून मार्ग काढणारं. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी व्यावसायिक वसुली होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय, स्त्रीमुळे लाभ होतील.
नोकरीत सन्मान होईल
कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या संगतीतून अडचणीत येण्याची शक्यता. बेकायदेशीर व्यवहार टाळा. उधार-उसनवारीमध्ये जपा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रोख पैसे सांभाळावेतच. सप्ताहात वृद्धांनी दुखापती जपाव्यात. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात एखादं मोठं स्पर्धात्मक यश मिळेल. जीवनातील एक यशस्वी पर्व सुरू कराल. नोकरीत एखादा सन्मान मिळेल. सप्ताहात नवविवाहित मंडळींनी वागण्या-बोलण्यातून सांभाळावं.
मुलाखतींमध्ये यश मिळेल
सिंह : सप्ताहात होणारा रवि-शनी केंद्रयोग शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर जपावा. नवपरिणितांनी आचारसंहिता पाळावी. बाकी सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर वरिष्ठांशी जपण्याचा. राजकारणात पडू नका. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी जपून. बाकी सप्ताह व्यावसायिक उत्सव प्रदर्शने गाजवेलच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ च्या अष्टमीचं प्रभावक्षेत्र मुलाखतींतून यश देणारं. पुत्रचिंता जाईल.
व्यवसायात भांडवल मिळेल
कन्या : सप्ताह व्यावसायिक पार्श्वभूमीवर आर्थिक कोंडी घालवेल. वास्तुखरेदीतील अडचणी जातील. हस्त नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाच्या शेवटी छान विवाहयोग. स्थळ येतील. बिनधास्त पुढं जा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अग्निभय दाखवतो. पंचमहाभुतांशी अरेरावी नको. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात व्यावसायिक भांडवल पुरवठा होईल. प्रेमिकांनी सप्ताहात वाद टाळावेत.
वृद्धांना वादातून त्रास शक्य
तूळ : रवि-शनी केंद्रयोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा सप्ताह वृद्धांना घरातील वादविवादातून त्रास देऊ शकतो. घरातील तरुणांशी जमवून घ्या. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस व्यावसायिक गाठीभेटी, उत्सवसमारंभ आणि करारमदार या बाबींमधून फलद्रूप होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग आहेत. नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त वसुलीतून लाभ होईल.
भाऊबंदकीचे प्रश्न सतावतील
वृश्चिक : सप्ताह कौटुंबिक पार्श्वभूमीवर पर्यावरण बिघडवू शकतो. काहींना भाऊबंदकीचे प्रश्न सतावू शकतील. सप्ताह शेजाऱ्यांशी जपण्याचा. बाकी सप्ताहातील रवि, बुध आणि शुक्र यांच्या प्रभावात होणारी ता. १४ ची अष्टमी ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पार्श्वभूमीवर निखालस शुभ ठरेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात गुरुबळातून लाभ देणारी ठरेल.
नोकरीतल्या चिंता जातील
धनु : सप्ताह वृद्धांना व्याधींच्या पार्श्वभूमीवर त्रासदायक ठरू शकतो. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी संसर्गापासून जपावे. बाकी मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे अष्टमीचं प्रभावक्षेत्र महत्त्वाच्या कामातून सुसंगत राहील. वैवाहिक जीवनात आनंद साजरा कराल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन कामामध्ये यश मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ चा शुक्रवार नोकरीतील चिंता घालवेल. सप्ताहात चांगली मौज कराल.
गतिमान कालखंड असेल
मकर : शुक्रभ्रमणाची कनेक्टिव्हिटी राहीलच. व्यावसायिक भांडवल पुरवठा होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाची स्पंदनं खेचून घेतीलच. मात्र सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी नोकरीत विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस मोठे गतिमान राहतील. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. ओळखीतून विवाह जमतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातूनही धन्यता लाभेल.
वास्तुविषयक प्रश्न सुटतील
कुंभ : रवि-शनी केंद्रयोगाची पार्श्वभूमी मातृपितृ चिंतेतून अडचणीची. बाकी सप्ताह वैयक्तिक भाग्योदयातून प्रसन्नच. विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकऱ्या मिळतील. धनिष्ठा नक्षत्राच्या स्वतंत्र व्यावसायिकांना कर्जमंजुरीतून लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक प्रश्न सुटतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वैवाहिक जीवनात जपण्याचा आहे. मानसिक पर्यावरण नक्की सांभाळा.
सरकारी कामं होतील
मीन : सप्ताह व्यावसायिक उभारी आणणारा. विशिष्ट व्यावसायिक पर्याय पुढं येतील. सरकारी कामं फत्ते होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. मात्र सप्ताहात तरुणांनी कुसंगत टाळणे योग्य तसेच व्यसनी मित्रांपासूनही दूर राहावे. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी बाबींमध्ये उत्तम कालखंडाचे ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.