जळगाव : श्रीरामांपेक्षा रावण श्रेष्ठ होते, असे वक्तव्य उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केल्याचा दावा भाजप सदस्यांनी केला. श्रीरामाचा उपमहापौरांनी अपमान केल्याचा आरोप करीत भाजप सदस्यांनी महासभेत घोषणाबाजी सुरू केली व व्यासपीठासमोर ठिय्या मांडला. गदारोळ अधिकच वाढल्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यामुळे एकही विषयावर चर्चा न होता सभा तहकूब झाली. (dispute in Municipal General Assembly over issue of Shriram Jalgaon News)
महापालिकेची महासभा बुधवारी (ता. २१) सकाळी अकराला सुरू झाली. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्षपदी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देवीदास पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभा सुरू होताच भाजपचे नगरसेवक मयूर कापसे यांनी प्रथम आपण जो मुद्दा उपस्थित करीत आहोत, त्यावर चर्चा करावी, अशी मागणी केली. त्यावर महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की अजेंड्यावर महत्त्वाचे विषय आहेत.
त्यावर चर्चा करून घेऊ, त्यानंतर तुमचा मुद्दा मांडा. त्यावर चर्चा करू, असे सांगितले. मात्र, नगरसेवक कापसे आपला मुद्दा मांडण्यावर ठाम राहिले. ते म्हणाले, की उपमहापौर कुलभूषण पाटील निविदा घेणाऱ्यांवर दबाव आणत आहेत. आपल्याला विचारल्याशिवाय निविदा घेणाऱ्यांच्या पावत्या फाडू नये, असे त्यांनी लिपिकाला सांगितल्याचा दावाही श्री. कापसे यांनी केला. त्यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या आवाजातील लिपिकांशी बोलतानाची मोबाईलवरील ध्वनिफितही दाखविली.
त्यावर कुलभूषण पाटील यांनी सांगितले, की आपण तसे बोललो नाही. केवळ महापालिकेच्या हितासाठी काही आदेश दिले आहेत. आवश्यकता असेल, तर आपण संबंधित लिपिकास महासभेत बोलावून घ्यावे. यावर मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याविरोधात भाजपच्या सदस्यांनी घोषणा सुरू केल्या. काही नगरसेवक व्यासपीठावर चढले व त्यांनी घोषणा दिल्या. यामुळे एकच गदारोळ सुरू झाला. नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांनीही उपमहापौर दबाव आणत असल्याचा आरोप केला.
पाटील-सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक
महासभेत गोंधळ सुरू असताना, भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या शाब्दिक वाद झाला. यात दोघांनी इतिहासाचे जुने दाखले दिले. त्या वेळी कुलभूषण पाटील यानी रामायणाचा दाखला देत असताना, श्रीरामांपेक्षा रावण श्रेष्ठ असल्याचा उल्लेख केल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ सुरू झाला. उपमहापौरांनी श्रीरामांचा अपमान केला,
असा आरोप नगरसेवक विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे यांनी केला. त्यानंतर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत भाजप सदस्य व्यासपीठावर गेले, तर काही जणांनी व्यासपीठासमोर ठिय्या देत कुलभूषण पाटील यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. गोंधळ अधिकच वाढल्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी आपण महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब करीत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृहातील शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य, ‘एमआयएम’चे सदस्य सभागृहाबाहेर निघून केले. मात्र, भाजपचे सदस्य सभा सुरू करण्याची मागणी करीत सभागृहातच होते. नंतर मात्र तेही सभागृहाबाहेर निघून गेले.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
सत्ताधाऱ्यांना विकासाचे श्रेय न मिळण्यासाठी गोंधळ : लढ्ढा
महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा म्हणाले, की ‘अमृत’ योजनेचा निधी परत जाऊ नये, म्हणून महासभा बोलाविण्यात आली. दोन महिन्यांत याच भाजपच्या सदस्यांनी ‘अमृत’चा सल्लागार नियुक्त करण्याबाबत कोणतीही माहिती घेतली नाही. सभेत ५८ कोटींच्या निधी व विकासकामांवर चर्चा करण्यात येणार होती. मयूर कापसे सभेतील विषय झाल्यावरही आपला मुद्दा मांडू शकले असते.
मात्र, सद्यःस्थितीत शिवसेनेचे महापौर व उपमहापौर काम करीत आहेत. त्याचे श्रेय मिळू नये, म्हणून त्यांनी हा गोंधळ घातल्याचे दिसून येत आहे. भाजपचे सर्व सदस्य मिळून उपमहापौरांवर धावून जात असतील, तर हे चुकीचे आहे. महापौर महिला आहेत. त्यामुळे कोणताही वाद अधिक वाढू नये, तसेच सभागृहात वादाचा अधिक प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा आपण अपमान केलेला नाही : उपमहापौर
आपण रावणापेक्षा प्रभू श्रीराम श्रेष्ठ असल्याचे कुठेही म्हटलेले नाही, असा दावा करीत उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले, की रामायणाचा दाखला देत असताना, रामायणात सांगितल्याप्रमाणे रावण ताकदवान व सर्वगुण संपन्न होते. मात्र, त्याच्यात अहंकार होता. त्यामुळे श्रीरामांनी रावणाचा वध केला. तसाच अहंकार आता पिंप्राळ्याचे नगरसेवक कापसे यांच्यात आला आहे. भाजप सदस्य मात्र आपण आपण अपमान केल्याचे चुकीचे सांगत आहेत.
पिंप्राळ्यात आपण विकास करीत आहोत, तसेच आता भव्य शिवस्मारक उभारत आहोत. त्यामुळे पिंप्राळ्याचे वैभव वाढणार आहे. त्याचे श्रेय आपल्याला मिळू नये, म्हणूनच नगरसेवक मयूर कापसे यांनी हा गोंधळ घातला. आपण त्या क्लीपमध्ये कुठेही चुकीचे बोललेलो नाही. कापसे यांनी ती क्लीप सर्वच जनतेसाठी व्हायरल करावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
रावणाला रामापेक्षा श्रेष्ठ म्हणणाऱ्या उपमहापौरांचा निषेध : शुचिता हाडा
भाजपच्या नगरसेविकास ॲड. शुचिता हाडा म्हणाल्या, की नगरसेवक कापसे यांनी त्याच्या वॉर्डातील प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत बोलताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रावण रामांपेक्षा श्रेष्ठ होते. मात्र, त्यांच्या अंहकारामुळे त्याचा वध झाला, असे वक्तव्य केले. भगवान श्रीराम राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
त्यामुळे रामाचा अपमान करणाऱ्या उपमहापौरांनी व्यासपीठावर न बसता खाली नगरसेवकांत बसावे, अशी आमची मागणी आहे. ते खाली बसल्यास सभा सुरू करण्यास आमची हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.