Eknath Shinde & Kishor Patil esakal
जळगाव

Maharashtra Politics : बंडखोर आमदार किशोर पाटील यांना कुटुंबातूनच कडवे आव्हान

किशोर पाटील यांना कुटुंबातूनच कडवे आव्हान उभे ठाकले असून, तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणाची नांदी ठरू पाहात आहे.

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व निर्मल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छापर जाहिराती देऊन व मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर. ओ. पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना कुटुंबातूनच कडवे आव्हान उभे ठाकले असून, तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणाची नांदी ठरू पाहात आहे. (Latest Marathi News)

आमदार किशोर पाटील गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय नाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रथमपासूनच सहभागी झाले. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई अशा शिंदे गटाच्या प्रवासात ते सक्रिय होते. शिंदे गटात गेल्यावर त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची निषेध आंदोलने अथवा विरोध दर्शवणारी भूमिका मतदारसंघात व्यक्त झाली नाही. उलट आमदार पाटील यांच्या समर्थकांनी ‘न भूतो न भविष्यति’ समर्थन रॅली काढून कमालीचे शक्तिप्रदर्शन केले. अगदी परवा परवाच मुंबई येथील यशवंतराव सभागृहात आमदार पाटील यांनी मेळावा घेत मतदारसंघातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार घडवून आणला.

सत्तांतर नाट्यानंतर आमदार पाटील मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी आपल्या कामांचा, बैठकांचा धडाका लावला. या साऱ्या गोष्टी घडत असताना आमदार पाटील यांच्या चुलत भगिनी व माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कमालीची जाहिरातबाजी करून आपण ठाकरेंसोबत असल्याचा संदेश द्विगुणित केला. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती व मतदारसंघात लावलेले भलेमोठे डिजिटल बॅनर राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे ठरले आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार पाटील व माजी आमदार (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

(स्व.) आर. ओ. (तात्या) पाटील यांनी पाचोरा मतदारसंघात सर्वप्रथम शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यांच्या रूपाने १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रस्थ व राजपूत समाजाचे नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झाले. त्यांनी प्रथम (स्व.) ओंकार वाघ व त्यानंतर त्यांचे पुत्र दिलीप वाघ यांचा पराभव करून सलग दोनवेळा आमदारकी मिळवली. दरम्यानच्या काळात आमदारकीचा वाढता व्याप, त्यात निर्मल उद्योगसमूहाचे देशासह देशाबाहेर पसरणारे जाळे या गोष्टींचा व्याप पाहता (स्व.) आर. ओ. पाटील यांनी आपले पुतणे किशोर पाटील यांना पोलिसाची नोकरी सोडून स्थानिक राजकारणात आणले. किशोर पाटील यांनी त्या वेळी स्थानिक राजकारणात सक्रिय होऊन शिवसेनेचे संघटन करून प्रभाव वाढवला.

जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष अशी पदे मिळवत जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, जिल्हा बँक अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांत त्यांनी शिवसेनेचे प्राबल्य वाढवले. २०१४ च्या निवडणुकीत दिलीप वाघ यांना पराभूत करून किशोर पाटील यांनी विधानसभा गाठली. २०१९ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार बनले. (स्व) आर. ओ. पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून किशोर आप्पांची आतापर्यंतची ओळख आहे. परंतु (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट केल्याने आता त्या राजकीय वारसदार असल्याचे सिद्ध झाले आहे.

एकनिष्ठता व वारसा

आमदार पाटील प्रथमपासूनच शिंदेंसोबत असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी त्यांची कमालीची जवळीक आहे. आतापर्यंत पाच ते सहावेळा ते किशोर आप्पा यांच्या निवासस्थानी येऊन गेले आहेत. मात्र, सर्व घडामोडीत वैशाली सूर्यवंशी कोठेच दिसल्या नाहीत. आमदार किशोर पाटील यांच्यासह समर्थकांना मंत्रिपदाची आस लागलेली असताना वैशाली सूर्यवंशी यांनी टाकलेला राजकीय बाँब हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्या जाहिरातीतून विचार, एकनिष्ठता व वारसा अशा शब्दांचा वापर करून ‘तत्त्वांशी नाही केली तडजोड, विचारांशी सदैव एकनिष्ठ... आणि आता तोच विचारांचा वारसा’ असे शब्दप्रयोग करून बंडखोरांवर टीकास्त्र सोडण्यासह आपली ठाकरे कुटुंब व ‘मातोश्री’शी असलेली एकनिष्ठता स्पष्ट केली आहे. त्यांच्या जाहिरातीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघ, असाही उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ वैशाली सूर्यवंशी ठाकरेंसोबत असल्याचे सुस्पष्ट झाले आहे.

भाऊ-बहिणीमध्ये राजकीय व वैचारिक फूट

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष, निर्मल उद्योगसमूहाच्या संचालिका अशा पदांवर काही वर्षांपासून कार्यरत असताना शैक्षणिक व निर्मल उद्योगसमूहाच्या प्रगतीकडेच वैशाली सूर्यवंशी यांनी पूर्णवेळ लक्ष केंद्रित केले. उच्चशिक्षित, सुसंस्कारित, सामाजिक संवेदना जपणाऱ्या, शिस्तप्रिय, विकासाची दृष्टी असलेल्या व कार्यनिष्ठ महिला म्हणून त्यांची ओळख आहे. (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक राजकीय घडामोडी वैशाली सूर्यवंशी यांनी अनुभवल्या व पडद्याआड राहून अनेक कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजनही केले. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करून आपले चुलतभाऊ आमदार किशोर पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करतात की जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे उमेदवारी करतात की ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. या साऱ्या गोष्टी प्रश्नांकित असल्या तरी आमदार किशोर पाटील व वैशाली सूर्यवंशी या चुलतभाऊ- बहिणीमध्ये राजकीय व वैचारिक फूट पडून कौटुंबिक मतभेद विकोपाला जातील, असा सूर राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

बदलत्या राजकारणाची नांदी

गेल्या वेळी (स्व.) आर. ओ. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ठाकरेंकडून त्यांना तसा शब्दही देण्यात आला होता. पाचोरा येथे निर्मल सीड्सने उभारलेल्या अत्याधुनिक लॅबच्या उद्‍घाटनासाठी ठाकरे येणार होते. परंतु आर. ओ. पाटील आजारी पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी आता पूर्णत्वास नेणार, उद्धव ठाकरे यांना लॅब उद्घाटन व (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलावून आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा करणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे व ‘मातोश्री’ सोबत असल्याचे स्पष्ट केल्याने भविष्यात त्याचे पडसाद पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात उमटणार, हे मात्र निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT