चोपडा : शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील काही कामगारांचे कुटुंब कारखाना परिसरातील वसाहतीत वास्तव्यास आहेत. या वसाहतीचे दोन लाख ५४ हजारांचे वीजबिल थकविल्याने वीज वितरण कंपनीने ७ मे २०१८ म्हणजे तब्बल सव्वादोन वर्षांपासून वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे वसाहतीमधील जवळपास ५५ ते ६० कुटुंबांचे जिणे अंधारात सुरू आहे.
‘चोसाका’ने आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने वीजबिल थकविले आहे. मात्र, या प्रकाराने वसाहतीत वीज नाही, पाणीही नसल्याने कुटुंबांचे हाल होत आहेत. यात कामगारांना पगारही नाही. एकप्रकारे कामगार मरणयातना सोसत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. चोपडा येथील सहकारी साखर कारखाना चहार्डी- वेले या रस्त्यालगत चहार्डीपासून तीन किलोमीटरवर आहे. कारखान्याच्या परिसरात कामगारांसाठी राहण्यासाठी जवळपास दोनशे घरे बांधली आहेत. सध्या कारखाना बिकट परिस्थितीत असल्याने अनेक कामगार काम सोडून गेले आहेत. उर्वरित जवळपास ५५ ते ६० कुटुंबे राहत आहेत. मात्र, या कुटुंबांना अंधारात राहावे लागत आहे. वीजच नसल्याने कारखान्याच्या कूपनलिकांमधील मोटारी बंद आहेत. ७ मे २०१८ पासून वीजपुरवठा खंडित होता. यात फक्त जेमतेम एक महिनाभर वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. तो अजूनही खंडित असल्याने जगणे कठीण झाले आहे.
सिंगल फेजची मागणी
कारखान्याकडून वीजबिल भरले जात नसेल, तर चहार्डीकडून सिंगल फेज वीजपुरवठा करून प्रत्येक घरास स्वतंत्र मीटर बसवून पुरवठा करावा. वीजबिल आम्ही भरू. मात्र, वीज द्या, अशी मागणी कामगारांनी तत्कालीन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह चहार्डी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
पाण्यासाठी पायपीट
‘चोसाका’ कामगारांना पगार तर मिळतच नाही. तसेच पिण्याचे पाणीही शेजारील तीन किलोमीटरवरून चहार्डी आणि वेले या गावांतून आणावे लागत आहे.
वसाहतीतील कामगार मतदानासाठी चहार्डी ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक सहामध्ये समाविष्ट आहेत. ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारून अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली. कामगारांनी संबंधित पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडेही धाव घेतली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
‘चोसाका’च्या कामगार वसाहतीचे वीजबिल थकीत झाल्याने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजबिल थकल्याने कनेक्शन कट करूनही महावितरण ७० ते ७५ हजार रुपयांची भाडेआकारणी करीत होते. महावितरणने अर्ज सादर करण्यापूर्वीच कायमचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे. यामुळे वसाहतीत वीज नाही.
- अकबर पिंजारी, प्रभारी कार्यकारी संचालक, चोसाका
मालमत्ता कारखान्याची आहे. महावितरणची थकबाकी कारखान्याकडे आहे. ज्या जागेवर थकबाकी आहे, त्या ठिकाणी नवीन कनेक्शन देता येत नाही, हा विषय सर्कल ऑफिसशी संबंधित आहे. थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन मिळणे कठीण आहे. दुसऱ्याच्या जागेत तिसऱ्याला कनेक्शन कसे देता येईल? कनेक्शन देताना तांत्रिक अडचणी आहेत.
- रमेश पवार, कार्यकारी अभियंता, महावितरण, धरणगाव
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.