जळगाव : एमआयडीसीने जळगाव शहर, परिसरासह जिल्ह्यातील सुमारे ३५ हजारांवर कामगारांना रोजगार दिला. कोविडमुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात उद्योगातील कामगारांसाठी ई-पास बनविले होते. त्यातून ही माहिती समोर आली. असे असले तरी अद्याप २५ ते ४० टक्के कामगार त्यांच्या उद्योगस्थळी हजर झालेले नाहीत. त्यामुळे बहुतांश उद्योगांचे युनिट पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.
जळगावच्या विकासात येथील औद्योगिक वसाहतीचे योगदान मोठे आहे. साधारण चार-साडेचार दशकांपासून एमआयडीसी सुरू होऊन तीन दशकांत चांगली प्रस्थापितही झाली. नंतरच्या काळात या वसाहतीकडे स्थानिक नेतृत्व, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेनेही दुर्लक्ष केले. त्यामुळे एमआयडीसीतील बरेच मोठे उद्योग एकतर स्थलांतरित झाले किंवा बंद पडले. जे उद्योग सुरू आहेत, त्यापैकी काही डबघाईस आलेत. तरीही सुरू असलेल्या उद्योगांमधून जवळपास ३५ हजार कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतोय.
सध्या पंधराशे उद्योग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू आहे. त्यात जळगाव एमआयडीसीतील उद्योगही ‘लॉक’ झाले. एमआयडीसीतील बहुतांश उद्योग कृषी आधारित असल्याने ते बंद ठेवून चालणार नव्हते. जळगाव एमआयडीसीत लहान व मध्यम असे जवळपास दीड हजार उद्योग आहेत. त्यापैकी हजार युनिट पूर्णपणे कार्यान्वित आहेत. उर्वरित युनिट अर्धवेळ, अथवा तेथील उत्पादन नगण्य आहे.
३५ हजारांवर कामगार
हजार-पंधराशे युनिटमध्ये जवळपास ३५ हजारांपेक्षा अधिक कामगार आहेत. त्यात बहुतांश स्थानिक तर नऊ-साडेनऊ हजार म्हणजेच ३० टक्के कामगार परप्रांतीय असून, ते साधारणत: चटई उद्योग, दालमिल आदी उद्योगांत काम करतात. काही फर्निचरच्या मोठ्या मॉलमध्येही ते सुतारीचे काम करतात. चटई उद्योगांसाठी कुशल कामगार लागतात, ते बहुतांश परप्रांतीयच आहेत.
ई-पासने मिळाली माहिती
लॉकडाउनच्या काळात उद्योग अनलॉक झाल्यानंतर या कामगारांसाठी ई-पास बनविले. उद्योगांनी कामगारांना उद्योगांच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रशासनाकडून पास बनवून घेतले. जूनमध्ये अनलॉक-१ सुरू झाल्यानंतर जवळपास ६० ते ७० टक्के उद्योग सुरू झाले होते. तेव्हाच या उद्योगातील कामगारांसाठी इश्यू केलेल्या ई-पासची संख्या २३ हजार ५०० होती. त्यातही काही कामगार अजूनही कामावर हजर होऊ शकलेले नाहीत. ते सर्व हजर झाले, सर्व परप्रांतीय कामगार परतले, तर ही संख्या ३५ हजारांवर जाते.
वाहतुकीअभावी हजेरी कमी
सध्या काही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सुरू असले तरी उत्पादन १०० टक्के घेतले जात नाहीत. कारण त्यांचे कामगार पूर्णपणे हजर झालेले नाहीत. स्थानिक, म्हणजे जळगावात भुसावळ, पाचोरा, अमळनेर, चोपडा, वरणगाव, रावेर, सावदा, फैजपूर, धरणगाव, एरंडोल आदी ठिकाणांहून कामगार येतात. परंतु, त्यांना वाहतुकीची व्यवस्था नसल्याने ते कामावर हजर होऊ शकत नाहीत. तर परराज्यात गेलेले काही कामगार परतले असले तरी अद्याप १५ ते २० टक्के कामगार परतलेले नाहीत. ते साधारण महिनाभरात परततील, अशी अपेक्षा आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.