जळगाव : अल्पवयीन शाळकरी मुलाला वाहन चोरीचे धडे देत त्याला वाहन चोरीच्या धंद्यात आणणाऱ्या मास्टरमाईंड चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. रिसेल व्हॅल्यू जास्त मिळत असल्याने फक्त होंडा कंपनीच्या शाईन गाड्या चोरण्यासाठी या भामट्याने तशा पद्धतीची मास्टर-की बनवून चोरलेल्या पूर्वीच्या चार आणि आता नऊ, अशा १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
शहरासह जिल्ह्यात वाहन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचा अटकाव करून चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिल्या होत्या. वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी विशेष पथकाची नेमणूक करून संशयितांचा पाठपुरावा सुरू केला. पोलिस कर्मचारी विजय पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन संशयिताला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याने चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या. चौकशीत त्याच्या टोळीचा आणि गुन्ह्याचा मास्टरमाईंट दादा बारकू ठाकूर याच्या नावाची त्याने कबुली दिली. तेव्हापासून गुन्हे शाखेचे विशेष पथक संशयित दादा ठाकूर याच्या मागावर होते. मंगळवारी (ता. २) रात्री त्याला नाशिक जिल्ह्यातून अटक करण्यात आली. चोरीच्या दुचाकींची माहिती दिल्याने चक्क नऊ दुचाकी पोलिस पथकाने जप्त केल्या आहेत.
कळवण जंगलात आश्रयाला
टोळीतील विधीसंघर्षित बालकाने चार दुचाकी चोरीची कबुली दिल्याने टोळीचा म्होरक्या दादा ठाकूर (मुळ रा. विजयवाडा, चोपडा) याने पळ काढला. त्याने नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील वनपरिक्षेत्रात आश्रय घेतल्याची माहिती मिळताच जितेंद्र पाटील, सुनील दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, विजय श्यामराव पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी यांनी कळवण (जि. नाशिक) जंगलातून सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिसप्रसाद मिळताच कबुली
दादा ठाकूर याला ताब्यात घेतल्यावर त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी प्रसाद दिल्यावर त्याने एका मागून एक, अशा ९ होंडाशाईन दुचाकी काढून दिल्या. जळगाव शहरासह अमळनेर, धरणगाव, एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या ९ मोटारसायकली त्याने काढून दिल्या.
मास्टर-की अन् मास्टरकी!
अटकेतील दादा ठाकूर याने होंडा कंपनीच्या दुचाकींच्या हॅण्डल लॉकची मास्टर-की तयार केली हेाती. तो केवळ नव्या कोरकरीत होंडाच्या शाईन दुचाकी चोरत होता. चोरीच्या दुचाकी सुरत, अहमदाबाद, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा येथे कुठल्याही कागदपत्रांशिवाय साधारण १५ हजारात एक या दराने तो मोटारसायकली विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.