जळगाव : दिवाळीच्या मंगल पर्वातील महत्त्वाचा दिवस, शुभमुहूर्त म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस होय. हाच दिवस दिवाळीचा प्रकाशोत्सव म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी रविवारी (ता. २३) बाजारपेठेत रविवार असूनही मोठी गर्दी झाली होती. पूजेसाठी लक्ष्मीच्या मूर्ती, केरसुणी, प्रसादासाठी साळीच्या लाह्या, बत्ताशे, ऊस, विविध प्रकारची फळे, फराळाच्या साहित्याला प्रचंड मागणी होती. सोबतच नवीन कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, सुखोपयोगी वस्तू, मिठाई, फटाके इत्यादी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. (On eve of Lakshmi Puja market flourished Latest Jalgaon News)
लक्ष्मीपूजनाला घरे, दुकाने, वाहने झेंडूंच्या फुलांच्या माळा करून सजविली जातात. यामुळे रविवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर झेंडूंच्या फुलांची आवक झाली. शहरासह उपनगरांतही झेंडूच्या फुलांच्या विक्रीची दुकाने लावण्यात आली होती. एरवी ४० रुपये किलोने मिळणारी झेंडूची फुले ५०-८० रुपये किलोने विकली जात होती. सोमवारी (ता. २४) फुलांचा दर आणखी वाढेल यामुळे रविवारीच बहुतांश नागरिकांनी फुले खरेदी केली. सोबतच लक्ष्मीपूजनाला कमळाचे फूल महत्त्वाचे असते. या फुलाला मागणी होती. दहा रुपयांना एक याप्रमाणे फुले विकण्यात आली.
बाजारपेठेत प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळाही ५० रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध होत्या. त्यांच्या खरेदीस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आकाशकंदील, आकर्षक रोषणाई, पणत्या, दिवे, झुंबरालाही मागणी होती. आकर्षक पणत्या दहा रुपयांना एक याप्रमाणे उपलब्ध होत्या.
चायनीज रोषणाई नाकारली
चायनीज रोषणाईला दर वर्षी मागणी असते. मात्र यंदा बहुतांश नागरिकांनी चायनीज रोषणाई नाकारत स्वदेशी रोषणाईला पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्वदेशी झुंबर, रोषणाईला मोठी मागणी होती. शंभर रुपयांपासून विविध प्रकारातील रोषणाई उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
मिठाईच्या दुकानांत गर्दी
दिवाळीत मिठाईला अधिक मागणी असते. सर्वच मिठाई तयार करणाऱ्या दुकानांवर विविध प्रकारातील मिठाई उपलब्ध होत्या. चारशे रुपयांपासून एक हजार रुपये किलोपर्यंत मिठाईचा दर होता. ड्रायफ्रूटचे बॉक्सही पाचशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत उपलब्ध होते. तयार फराळालाही मागणी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.