पाचोरा (जि. जळगाव) : कुऱ्हाड (ता. पाचोरा) येथील रहिवासी व पीटीसी संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारा हर्षवर्धन रवींद्र पाटील हा विद्यार्थी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय (नवी दिल्ली) व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (अहमदाबाद) यांच्यातर्फे आयोजित इन्स्पायर ॲवॉर्ड विजेता ठरला असून, जिल्ह्यातील एकमेव बालवैज्ञानिक म्हणून त्याने जिल्ह्याच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. हर्षवर्धनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. (Recognition of central government to walker cum Chair project of harshvardhan patil of kurhad Latest Jalgaon News)
नवी दिल्ली येथील केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्रसिंग व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अहमदाबादचे डाॅ. बिपिनकुमार यांच्या नेतृत्वात नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर इन्स्पायर ॲवॉर्डसाठीची स्पर्धा झाली. यात संपूर्ण देशभरातून सहा लाख विद्यार्थ्यांचे नामांकन आले. त्यातून ५१६ वैज्ञानिक उपकरणांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील उपकरणांची संख्या ३१ व जळगाव जिल्ह्यातील हर्षवर्धन पाटील याचे एकमेव उपकरण होते.
हर्षवर्धनने सादर केलेल्या 'वॉकर कम चेअर' या अनोख्या उपकरणाचा कमोड शौचालय म्हणूनही वापर करता येतो. तसेच यात इमर्जन्सी सायरन, फ्लॅश लाइट, प्रथमोपचार पेटी, वॉटर बॉटल कंटेनर, मोबाईल स्टॅन्ड अशा सुविधा आहेत. त्यास जिल्हाभरातून प्रथम क्रमांक मिळवून बालवैज्ञानिक म्हणून हर्षवर्धन पाटील याने लौकिक मिळवला आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्ही. टी. जोशी, ॲड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन सतीश चौधरी, दगाजी वाघ, सुनील पाटील, शांताराम चौधरी या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धनचा गुणगौरव केला. याप्रसंगी आर. एम. पाटील, सुहास मोरे, सुधाकर माळी, शरद महाजन, राजू माळी, दीपक राजपूत, श्रद्धा पाटील, संदीप पाटील ,चेतन पाटील, मनोज खलाल, प्रदीप पाटील, रवींद्र बोरसे या शिक्षकांसह हर्षवर्धनचे वडील रवींद्र पाटील व आई विजया पाटील उपस्थित होते. हर्षवर्धनचे हे उपकरण कुऱ्हाड येथील आदर्श विद्यालयात ठेवण्यात आले असून, जिल्हाभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्याचे अवलोकन केले जात आहे.
उपकरणाची केंद्र सरकारकडून प्रसिद्धी
या इन्स्पायर ॲवॉर्डसाठी प्रत्येक शाळेतून दोन नामांकन स्वीकारली जातात व प्रत्येक विद्यार्थ्यास संशोधनासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे दिले जाते. हर्षवर्धन पाटीलने रुग्ण, अपंग वृद्धांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे 'वॉकर कम चेअर' उपकरण सादर करून साऱ्यांना आश्चर्यचकित केले. या उपकरणास केंद्र शासनातर्फे प्रसिद्धी देण्यात येत आहे.
विज्ञान विषयाचे शिक्षक सुहास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धनने हे उपकरण तयार केले. कुऱ्हाडसारख्या ग्रामीण भागात शिकणाऱ्या हर्षवर्धनने राष्ट्रीय पातळीवर बालवैज्ञानिक म्हणून जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवून जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा व दिशा मिळवून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.