काही सुखद

अविरत कष्ट, एकीतून कुटुंब झाले स्वयंपूर्ण

रमेश चिल्ले

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अाडवळणाच्या ठिकाणी असलेल्या मोरवड येथे दिगंबर बने यांचं कुटुंब राहतं. घरी मूळची भिक्षुकी असलेल्या या कुटुंबाची केवळ चार एकर शेती. आजची पिढी म्हणजे बाळासाहेब व रामप्रसाद यांच्यावर मुख्य आर्थिक व प्रापंचिक जबाबदारी. कुटुंबात एकूण बारा सदस्य. कुटुंबाचा चरितार्थ केवळ अल्प शेतीतून चालणे शक्य नव्हते. मात्र सतत कष्ट करीत राहणे व काळानुसार बदलत केवळ शेतीवर अवलंबून न राहता आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवणे या गोष्टी केल्यानेच आज हे कुटुंब स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. 

जयश्रीताईंची मेहनत    
तशी घरच्या शेतीची पूर्वीची पार्श्वभूमी सांगायची तर उत्पन्नाची बाजू भक्कम नव्हती. घरच्या मुलांची शिक्षणं, दैनंदिन खर्च अशा अनेक बाबी होत्या. मग परिस्थितीमुळे घरच्या महिलेने म्हणजे बाळासाहेब यांची पत्नी जयश्री यांनीही पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतीकडे लक्ष द्यायला सुरवात केली. सोयाबीन काढणी केली, तर मळणी यंत्राला द्यायला पैसे नाहीत, अशी अवस्था होती. मग गावातल्या बचत गटातील महिलांसोबत जयश्री यांची ओळख झाली. गटात सहभागी होण्यासाठी महिना शंभर रुपये जमा करायलादेखील पैसे नव्हते. काहीतरी लघू उद्योग करायचं ठरवलं. उदबत्ती तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. दहाजणी एकत्र आल्या. पण, घरच्यांकडून भांडवल कमी पडल्याने हा व्यवसाय तिथेच थांबवावा लागला. पुढे परिसरातील स्वयंशिक्षण प्रयोग संस्थानचे श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनातून जयश्रीताईंनी मिश्र पीकपद्धती, सेंद्रिय शेती, भाजीपाला लागवडीचं प्रशिक्षण घेतलं. जाधव यांनीच सेंद्रिय शेती करण्याची दिशा दिली. 

प्रगतीकडे वाटचाल 
 जयश्रीताईंनी स्वतः पुढाकार घेत जीवतोड मेहनत करत दहा गुंठ्यांत कारले पिकवले. स्वतः बाजारात बसून हिमतीने विकले. पती, सासू, सासरे अशी सर्वांची साथ मिळाली. आलेल्या उत्पन्नातून तुषार संच घेतला. विहिरीवर मोटर बसवली. आज बने कुटुंब सोयाबीन हे मुख्य पीक घेते. एकरी बारा क्विंटलपर्यंत उतारा घेते. शेतीत जयश्रीताई, पती व दीर असे सर्वजण राबतात. अलीकडेच ऊसही घेतला आहे. काही क्षेत्रात भाजीपाला, मका अशी पिकेही घेतली जातात.

बचत गटाद्वारे सामाजिकता 
जयश्रीताई सध्या कृषी विभागाच्या आत्मा गटांतर्गत काम करतात. महिलांना बॅंकेचे व्यवहार शिकवणे, कर्ज मिळवून लघू उद्योग सुरू करून देणे, सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करणे अादी कामे करतात. त्यांच्या अडचणीला धावून जातात. स्वयंशिक्षण प्रयोगातर्फे महिलांना महिना हजार रुपये मानधन मिळते. त्यातून गट बांधणी, प्रशिक्षण घेणे अशा कामांसाठी जयश्रीताईंना आधार मिळतो. 

उत्पन्नाचे स्रोत वाढवले 
केवळ शेतीतील उत्पन्नातून काही होणार नाही, हे कुटुंबाला जाणवले. आता घरी मळणी यंत्र आले आहे. त्याची जबाबदारी बाळासाहेब पाहतात. त्यातून हंगामात दिवसाला ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत कमाई होते. परिसरातील शेतकरी पिकांची मळणी त्याद्वारे करून घेतात.

विहीर खोदाईचे कामदेखील बाळासाहेब व त्यांचे बंधू करतात. एक लाख रुपयांची गाळ काढण्याची क्रेन घेतली आहे. एप्रिल व मे या काळात त्याचे काम चालते. त्यातून दोघांना मिळून एका कामासाठी सुमारे ३० हजारांची एकूण कमाई होते. 

स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या मदतीने थोडे कर्ज घेऊन, तसेच थोडे घरचे पैसे घालून दुभती म्हैस घेतली, त्यावर घरखर्च भागतो. आज दोन म्हशी आहेत. रोजचे किमान आठ लिटर दूध मिळते. जयश्रीताईंच्या सासू गोठ्याचे व्यवस्थापन पाहतात. दूधविक्रीचे काम दोघे बंधू पाहतात. 

जयश्रीताईंच्या जाऊ अश्‍विनी शिलाई यंत्राद्वारे शिवण व्यवसायाचे काम करतात. दिवसाला त्यातून दोनशे ते तीनशे रुपयांचे उत्पन्न मिळते. 

हंगामात कारली, दोडका, तसेच अन्य भाजीपाला घेतला जातो. लातूर येथे तो घेऊन दोघे बंधू थेट ग्राहकांना विक्री करतात. त्यातून खर्च वजा जाता हंगामात ५० हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडते. सोयाबीन, हरभरा आदी पिकांचेही उत्पन्न हातभार लावते. ठिबक सिंचन करून घेतलेला ऊस पंधरा ते वीस कांड्यांवर आला आहे, त्यात गहू घेतला. तो अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा झाला. ठिबकसाठी कृषी खात्याकडून अनुदान मिळाले. आता उसाचेही उत्पन्न मिळेल. 

एवढे सगळे कष्ट कमी की काय, म्हणून घरी किराणा विक्री व्यवसायही सुरू केला आहे. त्यात शाळा उपयोगी, डेअरी उपयोगीही काही सामान ठेवले आहे. 

सगळ्यांच्या हातांना काम मिळाल्याने वर्षाला प्रपंच व्यवस्थित चालेल इतके उत्पन्न हाती येते. जिथे पूर्वी मळणी यंत्रासाठी द्यायला पैसे नसायचे, तेथे आज हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या केवळ कष्ट व एकीच्या जोरावर स्वयंपूर्ण झाले आहे. घराचे काही बांधकाम झाले. सिमेंट- विटांच्या भिंती बांधल्या. छप्पर म्हणून नवे पत्रे टाकले. घरी पाण्यासाठी बोअर घेतला. घरातील प्रत्येकाने पुढाकार घेतला, तर कुटुंब सुधारते. त्यातूनच गाव व राष्ट्र उभे राहते. शेततळेही घेतले आहे. त्या पाण्यावर मागील दुष्काळात पिकांना पाणी मिळाले, त्यातूनच उत्पन्न मिळू शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT