काही सुखद

बैलांच्या सजावटीला बचत गटाचा साज

चंद्रकांत जाधव

जळगाव शहरापासून सुमारे १२ किलोमीटरवर नशिराबाद हे गाव आहे. ब्रिटिशकाळापासून नशिराबादला बाजारपेठ आहे. या गावात दर शुक्रवारी बाजार भरतो. आजूबाजूच्या गावातील शेतकरी या गावात बाजारासाठी येतात. नशिराबाद शेतीप्रधान असल्याने या गावातील नाथ समाजातील कुटुंबे आपला परंपरागत व्यवसाय म्हणजेच बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करतात. 

बचत गटाने घेतला पुढाकार 
नशिराबाद गावातील दुर्गाबाई शांताराम नाथ आणि महिलांनी पारंपरिक व्यवसायाला बळकटी मिळून आर्थिक स्थैर्य यावे, तसेच महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी २००७ मध्ये बहिरमबाबा स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटात दुर्गाबाई शांताराम नाथ, पद्माबाई नींबा नाथ, शांताबाई श्रावण नाथ, विमलबाई हरी नाथ, पूंजाबाई हरी नाथ, मंदाबाई संजय नाथ, सताबाई मुरलीधर नाथ, सरला सुका नाथ, विमलबाई शिवनाथ नाथ, मालू अशोक माळी या कार्यरत आहेत. पंचायत समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातून हा गट स्थापन झाला. त्यामुळे विखुरलेल्या स्वरूपात चालणाऱ्या त्यांच्या व्यवसायाला एकसंधपणा आला. यातून शाश्‍वत बाजारपेठ तयार झाली. 

कुटुंबाची मिळाली साथ  
नशिराबादमधील पेठ भागातील नाथ वाड्यात या गटाचा साहित्य निर्मितीचा व्यवसाय चालतो. सजावट साहित्य निर्मितीसाठी सूतावर पूर्व प्रक्रियेसाठी चरख्याचा वापर केला जातो. चरखे चालवून सुताची प्रक्रिया करण्याचे काम महिलांना काहीसे अवघड असते. त्यामुळे घरातील मुले व पुरुषांच्या मदतीने सुतावर पूर्व प्रक्रिया केली जाते. साधारणपणे दहा किलो सुतावर चरख्याद्वारे प्रक्रिया करण्यासाठी साडेचार तास लागतात. मोरखी, गोंडे, गेठे, नाथा, जोतपानासाठी वेगवेगळा आकार व लांबीच्या दोऱ्या सुतावर प्रक्रिया करून तयार केल्या जातात. या दोऱ्या विणून, गुंफून निरनिराळे साहित्य निर्मितीचे काम महिला आपापल्या घरी करतात. साहित्याच्या निर्मितीमध्ये महिलांची जबाबदारी अधिक असते.

मोठ्या विक्रेत्यांशी केला संपर्क 
पूर्वी नाथ वाड्यातील मंडळी स्वतः सुताची खरेदी करून त्यापासून सजावटीचे साहित्य तयार करायचे. हे साहित्य मग आठवडी बाजार, जळगावमधील काही विक्रेत्यांकडे विकले जायचे. सूत जळगाव शहरातील बोहरा गल्लीमधील विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या दरात मिळायचे. त्याचे दर कपाशीच्या दरांवर अवलंबून असायचे. अनेकदा आर्थिक उत्पन्नाचे गणित बसायचे नाही. गटाची स्थापना झाल्यानंतर नफा व्यवस्थित राहावा, आर्थिक गणित चुकू नये म्हणून मजुरीवर काम करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी जळगाव शहरातील बैल सजावटीचे साहित्य विक्रेत्यांशी संपर्क साधण्यात आला. बचत गटातील महिलांसह जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. ही संकल्पना जळगावमधील विक्रेत्यांनाही पसंत पडली. विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात साहित्याची गरज असते. ते हे साहित्य खरेदी करून बुलडाणा, नंदुरबार, धुळे, नाशिक आदी भागात पाठवितात.

स्वयंचलित चरख्यांचा वापर 
महिला बचत गटाला साहित्य निर्मितीसाठी स्वतःची जागा नाही. गटातील काही महिलांनी बचतीच्या रकमेतून हस्तचलित चरख्याऐवजी स्वयंचलित चरखे तयार केले. हे चरखे नाथवाड्यालगतच्या दोधूनाथ बाबा मंदिराच्या आवारातील जागेत बसविले आहेत. काही महिलांचे चरखे घरासमोर आहेत. त्यासाठी स्वतंत्र जागेची गरज असून, स्वयंचलित चरख्यांना लागणाऱ्या वीजेसंबंधीदेखील सवलत हवी आहे, अशी माहिती गटाच्या सदस्या दुर्गाबाई नाथ यांनी दिली.

बचतीची सवय आणि  पतही झाली तयार 
अभियानाच्या नियमानुसार महिन्याला एक हजार रुपयांची बचत हा गट स्थापनेपासून करतो आहे. महिला गटाला नशिराबादमधील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतून आत्तापर्यंत दोनदा कर्ज मिळाले. आता पुन्हा एकदा जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळणार आहे. सर्वप्रथम २५ हजार रुपये कर्ज सवलतीच्या दरात मिळाले होते. बारा महिन्यात गटाने वेळेत कर्जफेड केली. मग दोन लाख रुपये कर्ज मिळाले. त्याची देखील परतफेड केली. बॅंकेत गटाचे बचतीचे पैसे आहेत. त्यामुळे या गटाची चांगली पत बॅंकेत आहे.बैल सजावटीचे साहित्य तयार करण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम हा गट करीत असल्याने त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. या गटाचा सहभाग जिल्हास्तरीय मुक्ताई सरस प्रदर्शनात करण्यात आला. अनेक शेतकरी आवर्जून या गटाने तयार केलेल्या साहित्याची खरेदी करतात. नशिराबाद गावातही पोळा सणापूर्वी या गटातील महिला किंवा घरातील कर्ती मंडळी बैलांच्या सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवतात. त्याच्या खरेदीसाठी भादली बुद्रुक, निमगाव, भागपूर, सुनसगाव, जळगाव खुर्द, बेळी आदी ठिकाणचे शेतकरी येतात.

संपूर्ण कुटुंबाला मिळाला रोजगार  
सजावट साहित्य तयार करण्यासाठी महिलांना तसेच कुटुंबातील सदस्यांना सकाळपासून सायंकाळपर्यंत कष्ट करावे लागतात. साहित्य निर्मितीमध्ये महिला व पुरुष यांच्या कामाची जबाबदारी ठरलेली आहे. पुरुष मंडळी प्रामुख्याने सुतावर चरख्याद्वारे प्राथमिक प्रक्रिया करून देतात. काळे, पांढरे, निळे व लाल प्रकारचे सूत जळगावमधील व्यापारी या गटापर्यंत दर आठवड्याला पाठवितात. १०० किलो सुतामागे तीन किलो घट व्यापारी किंवा विक्रेते गृहीत धरतात. कारण काही वेळेस सूत तुटून ते वाया जाते. त्यातील काही भाग कमी लांबी व इतर कारणांमुळे वापरात येत नाही.

बचत गटातील महिलांना दर आठवड्याला किमान ५० ते ५५ किलो सुताची गरज भासते. महिलांनी साहित्य तयार केल्यानंतर ते घेण्यासाठी जळगावमधील विक्रेत्यांचे कर्मचारी नशिराबाद येथे जातात. सूत पाठविल्यानंतर आठवडाभरात साहित्य तयार होते. विक्रेत्यांचे कर्मचारी साहित्य वजन काट्यावर मोजून घेतात. मोजणी करताना सुतामधील घट गृहीत धरली जाते. साहित्य जळगावला पाठविण्यासाठीचे वाहतूक भाडेही महिलांना ठरल्याप्रमाणे द्यावे लागते. साधारणपणे बैल सजावट साहित्य व्यवसायातून चार जणांच्या कुटुंबाला रोज ६०० रुपये मजुरी मिळते. 

गोंडे, एकमुखी, मोरखी निर्मिती  
जळगावमधील विक्रेते बचत गटाला साहित्य निर्मितीसाठी लागणारे सूत उपलब्ध करून देतात. हे दुय्यम दर्जाचे सूत असते. हे सूत मालवाहू तिचाकीने बचत गटातील महिलांपर्यंत पोचविले जाते. त्यासाठी महिलांना ३०० रुपये वाहतूक भाडे द्यावे लागते. महिला एक किलो सुतापासून १० गोंडे किंवा १४ नग एकमुखी नाथा, दोनमुखी नाथांचे बारा नग किंवा मोरखीचे सहा नग किंवा गेठ्याचे आठ किंवा जोतपानचे चार नग बनवितात. या साहित्याच्या निर्मितीसाठी मजुरीचे दर वेगवेगळे ठरले आहेत. संबंधित विक्रेते व बचत गटातील महिलांच्या समन्वयाने हे दर ठरवले जातात. एकमुखी नाथांसाठी ३५ रुपये, १२ नग दोनमुखी नाथा तयार केल्यास ६० रुपये, १० गोंडे बनविल्यास ६० रुपये, ८ नग गेठ्यांसाठी ४० रुपये आणि चार नग जोतपान बनविले तर ४० रुपये मजुरी मिळते.

शांताबाई नाथ, ९०९६६७६२३७ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT