काही सुखद

...अन्‌ श्रेयसच्या ओठांवर फुलले हसू 

सकाळवृत्तसेवा

कडूस : पाच वर्षांचे बालक... हुशार आणि चपळ पण जन्मतःच दुभंगलेले ओठ... त्यात जन्म आदिवासी कुटुंबात; उपचार करण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने बालक व त्याच्या पालकांच्या आयुष्यात अंधाराशिवाय दुसरे काहीच नव्हते; परंतु वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या हरहुन्नरी शिक्षकामधील 'माणसा'च्या अथक प्रयत्नांना माणुसकीचा हात देणाऱ्या मुंबई माता बाल संगोपन केंद्रामुळे या बालकावर मुंबईतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार झाले. त्यामुळे एका आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात जणू आनंदच फुलला. 

वेताळे (ता. खेड) येथील उंच डोंगरावरील ठाकर वस्तीत राहणाऱ्या श्रेयस सोमनाथ पारधी या मुलाचा वरच्या बाजूचा ओठ जन्मतःच दुभंगलेला होता. नाकाच्या खाली ओठाचे नामोनिशाण दिसत नव्हते. वरचा ओठ फाटून थेट नाकाच्या व वरच्या जबड्याच्या आतल्या बाजूने तोंडात उघडला होता. दुभंगलेल्या ओठांमुळे श्रेयसला स्पष्ट बोलत येत नव्हते. मुलावर उपचार करता येतील अशी आर्थिक परिस्थिती तर नव्हतीच. शिवाय यासाठी आपल्याला कोणी तरी मदत करेल, असे श्रेयसच्या आई-वडिलांच्या ध्यानीमनीसुद्धा होते.

या वस्तीवरील प्राथमिक शिक्षक संदीप जाधव यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी उपचारासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले. श्रेयसच्या आई-वडिलांशी चर्चा केल्यानंतर उपचाराला पहिल्यांदा मिळालेल्या नकाराचे होकारात परिवर्तन करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या मदतीने मुंबई माता बाल संगोपन केंद्राचे सचिव डॉ. माधव साठे यांना भेटून श्रेयसची माहिती सांगितली व उपचाराची विनंती केली.

डॉ. साठे यांनी मुलाची ठाकर वस्तीत जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. त्याची अवस्था आणि त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत त्यांनी जाधव यांच्या प्रयत्नांना साथ देत मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली; परंतु यासाठी श्रेयस व त्याच्या आई-वडिलांना मुंबई येथे यावे लागेल, असे सांगितले. कुपोषण, कमी रक्त व कमी वजन त्यात सर्दी-खोकला, यामुळे श्रेयसवर तत्काळ शस्रक्रिया करणे शक्‍य होत नव्हते. मात्र श्रेयसवर उपचार करायचेच, असा निश्‍चय डॉ. साठे, शिक्षक जाधव व संस्थेच्या समन्वयिका स्वाती शिंदे यांनी केला होता.

संस्थेच्या माध्यमातून तीन महिने उपचार व सकस आहारातून श्रेयसचे रक्त व त्याच्या वजनात वाढ करण्यात त्यांनी यश मिळवले. ऑपरेशनचा खर्च मोठा होता; परंतु, डॉ. साठे यांनी मुंबईतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होण्याकरिता यश मिळवले. श्रेयसच्या आई- वडिलांकडे मुंबईत उपचार कालावधीत दहा दिवस राहण्यासाठी व तिथपर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते. यासाठी संस्थेने मिलट्रेन प्रोग्रॅममधून त्यांना निधी मिळवून दिला. सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉ. मुकुंद थत्ते यांनी श्रेयसच्या ओठांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात डॉ. माहिनूर देसाई, डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी त्यांना मदत केली. शस्त्रक्रियेसह औषधोपचाराचा खर्च मुंबई माता बाल संगोपन संस्था व सुश्रुत हॉस्पिटलने उचलला. या वेळी श्रेयसच्या टाळूला असलेल्या छिद्रावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेयसच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आता आनंदाचे हसू फुलले आहे. याबाबत डॉ. माधव साठे म्हणाले, ''एका गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद पाहून मोठे समाधान लाभले. त्यामुळे एका आदिवासी कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले आहे.'' 

...देवासारखं धावून आलं 
''आमचा पोर कधी सगळ्या पोरांसारखा दिसल, असं सप्नातसुदा वाटलं नव्हतं. पर जाधव गुरुजी आन्‌ डाक्‍टर साठे सायब देवासारखं धावून आलं. आमी त्यांचं उपकार कधीच इसरनार नाय,'' अशी प्रतिक्रिया श्रेयसचे वडील सोमनाथ व आई सविता यांनी या वेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

New Year Party Menu 2026: 31 डिसेंबर अन् 1 जानेवारीसाठी 'असा' बनवा परफेक्ट मेनू, चवीने जिंकाल सगळ्यांची मनं

Ghati Hospital : डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मृत्यूला हरवले! विषबाधेच्या रुग्णाचे तीन महिन्यांनंतर निघाले व्हेंटिलेटर

Digital Census India : देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना! राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Navi Mumbai Airport: दोन दिवसांत 10 हजार प्रवाशांचा प्रवास, नवी मुंबई विमानतळाला नागरिकांची पसंती

SCROLL FOR NEXT