Adani Powerplant in Kolhapur : पाटगाव (जि. कोल्हापूर) धरणाचे पाणी वापरून आंजिवडे (ता. कुडाळ) येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्प होऊ घातला आहे. याला केंद्राकडून परवानगी मिळाल्याचेही कळते.
आंजिवडे येथे या प्रकल्पासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आंजिवडे गावाचाच भाग असलेल्या वाशी येथे हा प्रकल्प होणार आहे. यासाठी १४० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
वाशी हे गाव फार पूर्वी प्लेगच्या साथीमुळे निर्मनुष्य झाले होते. या भागात जंगल वाढले आहे. याच्याबरोबर वर पाटगाव (जि. कोल्हापूर) असून तेथील धरणाचे पाणी खाली आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे.
पाटगाव धरणाचे पाणी टनेलसदृश पाईपलाईनद्वारे सह्याद्रीच्या माथ्यावरून आंजिवडे गावातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या धरणात सोडले जाणार आहे. तेथे टर्बाइन्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. त्याला पंप स्टोअरेज प्रोजेक्ट म्हणतात; मात्र बनविण्यात येणारी ही वीज कुणाला पुरवली जाणार आहे? याबाबत काहीच स्पष्टता होत नाही. (Latest Marathi News)
सध्या गुप्तपणे तेथे प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू आहेत. या भागात काही प्रमाणात यंत्रसामग्री आणण्याचीही तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यासंदर्भात ‘सकाळ’ने जिल्हा प्रशासनाला विचारले असता त्यावर आम्ही कोणतीच माहिती देऊ शकत नाही. भाष्य करू शकत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यासाठी आंजिवडे गावात १७३ एकरांत धरण उभारले जाणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीने २०२२ मध्ये थेट दिल्लीतून या प्रकल्पाला मंजुरी घेतली आहे. हा संपूर्ण गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत आहे. धरण क्षेत्र व सभोवतालची मिळून एकूण ३४६ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी पुन्हा पंपाद्वारे लिफ्ट करून ते पुन्हा पाटगाव धरणात सोडले जाणार आहे. (Latest Marathi News)
येत्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीही या ठिकाणी प्रयत्न होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पाला कोणतीही आडकाठी आलेली नाही. अदानी समूहाने दिल्लीत आपली ताकद वापरून वनखात्याकडून ७०४ हेक्टर जमीनदेखील मिळवली असून, या प्रकल्पाला लागणारी १४० हेक्टर जमीन पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
असे असले तरी रोजगाराच्या मुद्द्यावर श्रेयासाठी कायम पुढे येणारे राजकारणी या प्रकल्पाबाबत गुप्तता पाळून आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनीही या संदर्भात बोलण्यास नकार दिला. इतकी गोपनियता का पाळली जात आहे? याचे कोडे मात्र कायम आहे.
(Latest Marathi News)
निर्मनुष्य गावात होतोय प्रकल्प
या प्रकल्पासाठीचे नियोजित आंजिवडे-वाशी हे गाव सह्याद्रीच्या दुर्गम रांगांमध्ये वसले आहे. या ठिकाणी संस्थानकाळात प्लेगची साथ आली होती. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यातून उरल्या सुरल्या गावकऱ्यांनी गाव सोडले. त्यामुळे या गावात सध्या वस्ती नाही. फक्त गावातील एक व्यक्ती सहदेव डांगी हे तेथे एकटेच राहत होते. त्यांचे छोटेसे घर वगळता सर्वत्र जंगल वाढले होते. डांगी यांचे चार-पाच वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर त्यांचे भाऊ कांता डांगी यांनी भावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथे पक्के घर उभारले आहे.
प्रकल्पासाठी हालचाली
आंजिवडे-वाशी येथे स्थानिकांशी संपर्क साधला असता, तेथे प्रकल्पाबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी काही मशिनरी दोरखंड बांधून त्या भागात नेण्यात आली. तेथे रस्ता नसल्याने ही कसरत करण्यात आली. तेथे ड्रीलही केल्याचे समजते.
घाटरस्त्याला नाही; प्रकल्पाला जमीन
आंजिवडे येथून पाटगावमार्गे कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अनेक वर्षे मागणी होत आहे. हा रस्ता झाल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी होणार आहे. फार कमी घाट फोडून हा मार्ग होऊ शकतो; मात्र वनजमिनीच्या प्रश्नामुळे हा घाट रस्ता लोकांची मागणी होऊनही प्रत्यक्षात आला नव्हता; मात्र अदानींच्या या नियोजित प्रकल्पासाठी शेकडो एकर वनजमीन संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.