Chakarmani App Guide For Tourist Sindhudurg Marathi News
Chakarmani App Guide For Tourist Sindhudurg Marathi News 
कोकण

सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा...

नीलेश मोरजकर

बांदा ( सिंधुदुर्ग ) - मोठ्या महानगरांमध्ये ओला - उबेरप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आता रिक्षाचे ऑनलाईन बुकिंग एका क्‍लिकवर करता येणार आहे. जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती, येथील मालवणी खाद्यसंस्कृती, हॉटेल, होम स्टे सुविधा, हिरव्यागार वनश्रीने नटलेली गावे, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेली देवस्थाने, सातासमुद्रापार गेलेली दशावतारी लोककला, दळणवळण व्यवस्था यांची सविस्तर माहिती आपल्याला आता घरबसल्या ‘चाकरमानी’ या मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहेत. हे ॲप बनविण्यासाठी बांद्यातील युवक विपुल विजय परब याने पुढाकार घेतला आहे.

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा मान कोकणातील ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्याला मिळाला आहे; मात्र म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नसल्याने येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेली अनेक पर्यटनस्थळे अद्यापपर्यंत दुर्लक्षितच राहिली आहेत. आपल्याला जिल्ह्यात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्‍याच किल्ल्यांची आतापर्यंत माहिती होती; मात्र जिल्ह्यातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या ३० हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती या ॲपमध्ये फोटोसह देण्यात आली आहे. या किल्ल्यांपर्यंत कसे जावे? पक्के रस्ते, जंगलवाटा याची माहितीही देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७५२ गावांमध्ये जाणाऱ्या एसटीच्या दररोजच्या फेऱ्या, त्यांचे वेळापत्रक, रेल्वे, बस बुकिंग, त्यांचे वेळापत्रक याची माहिती ॲपमध्ये देण्यात आली आहे. याचा फायदा जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना होणार आहे.

मोबाईल अॅपच्या माध्यमातून रिक्षा बुकींग

गणेशोत्सव कालावधीत मुंबई, पुणे येथून लाखो चाकरमानी जिल्ह्यात येतात. यामध्ये रेल्वेतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ६० टक्के असते. वेळेत घरी पोहोचण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नाही. यासाठी आपल्याला या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन रिक्षा बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसे यांची बचत होणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची गाडी नादुरुस्त झाल्यास चिंता करण्याची गरज नाही, त्यासाठी देखील हे ॲप मदत करणार आहे. जिल्ह्यातील त्या-त्या भागातील सर्व गॅरेजचे संपर्क नंबर ॲपवर देण्यात आले आहेत.

७५२ भागांची बेव सिरीज

जिल्ह्यातील बेरोजगार तरुण - तरुणींसाठी ‘जॉब अलर्ट’च्या माध्यमातून या ॲपवर नोकरीच्या संधी, जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ७५२ गावांची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी ७५२ भागांची बेव सिरीज करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व गावांची संकलित माहिती चित्रीकरण करून ॲपवर देण्यात येणार आहे.

पर्यटकांना ‘जंगल स्टे’चे पॅकेज 

ॲपवर आठही तालुक्‍यांची माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे. निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी व्यतीत करण्यासाठी पर्यटकांना ‘जंगल स्टे’चे पॅकेज देण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक मालवणी खाद्यपदार्थ, मालवणी जेवण, जंगल भ्रमंती, पशु-पक्षी दर्शन यांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग व लहान मुलांच्या आवडीनुसार आपण यामध्ये पॅकेज निवडू शकतो. चाकरमानी ॲप हे प्ले स्टोअरमधून आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केल्यानंतर आपण या ॲपचा वापर करू शकतो. विपुल सोबत इरफान चाऊस, मंगेश खैरनार, प्रथमेश धनावडे, सूरज कलंबटे हे या ॲपचे मुंबईतून काम पाहत आहेत. 

पर्यटकांना मालवणी व इंग्रजी भाषेत माहिती

जिल्ह्याच्या नजीक असलेल्या गोव्यात आज लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. हे पर्यटक आपल्या जिल्ह्यात थांबावेत, येथील निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घ्यावा यासाठी प्रयत्न आहेत. याबाबत चाकरमानी ॲपच्या निर्मितीचा विचार आला. यावर काम करण्यासाठी मुंबईत तांत्रिक टीम तयार केली. या ॲपवर काम करण्यासाठी चार महिने मेहनत घेतली. देशी-विदेशी पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, यासाठी युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना गाईड म्हणून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हे युवक येणाऱ्या पर्यटकांना मालवणी व इंग्रजी भाषेत माहिती देणार आहेत.
- विपुल परब, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT