गेली अनेक वर्षे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरत होते; मात्र गेल्या वर्षीचा महापूर महाप्रलयंकारी होता. त्यामुळे यावर्षी मुसळधार पाऊस सुरू झाला अन् वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली की, काळजाचा ठोका चुकतो. सर्वांना २२ जुलै २०२१चा महाप्रलयंकारी महापूर आठवतो. वर्षानंतरही त्या महापुराच्या आठवणी ताज्या आहेत. पूर येऊ नये, यासाठी कोणत्या उपाययोजना झाल्या. पूर आलाच तर कमीत कमी कसे नुकसान होईल, यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली? नागरिकांमध्ये सुधारणा झाली का? वर्षभरातील घडामोडी अन् पुराला तोंड देण्याची तयारी आदी बाबींचा आढावा.
- मुझफ्फर खान, नागेश पाटील, चिपळूण
पुन्हा पूर आला तर..
चिपळूणच्या इतिहासात पाण्याने सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुरात चिपळूणचे १४५३ कोटींचे नुकसान झाले. एवढ्या मोठ्या नुकसानानंतरही चिपळूणकरांनी खचून न जाता पुन्हा उभारी घेतली. यावर्षी अजूनतरी पूर आलेला नाही, तरीही नागरिकांच्या मनात महापुराची धडकी अजूनही कायम आहे. पुन्हा पूर आला तर करायचे काय? अशी भीती नागरिकांना आहे.
गाळ उपसाचे सकारात्मक परिणाम
वाशिष्ठी नदीतील गाळामुळे नदीचे पाणी चिपळूण शहरात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून झाला. खचलेल्या पूरग्रस्तांनी पुन्हा परिस्थितीशी दोन हात करत पुन्हा उभारी घेतली. महापुराचा सामना केल्यानंतर चिपळूणच्या भवितव्याच्या प्रश्न निर्माण झाला. लाल व निळ्या पूररेषेमुळे त्याची दाहकता आणखी जाणवू लागली होती. या जाणिवेतूनच शहरातील चिपळूणकरांनी बचाव समितीद्वारे उठाव केला. ६ डिसेंबर २०२१ ला सुरू झालेले साखळी उपोषण २७ दिवस सुरू होते. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने गाळउपसा करण्यासाठी लागणाऱ्या इंधनापोटी ८ कोटीचा निधी दिला.
वाशिष्ठी व शिवनदीच्या पात्रातील गाळ उपशाचे काम सुरू केले. महाराष्ट्रातील विविध भागातून जलसंपदाच्या तांत्रिक विभागाची यंत्रणा कामास लागली. राज्यातील गाळ उपशाचे सर्वात मोठे काम चिपळूणला सुरू झाले. ४ महिन्यात साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा झाला. जलसंपदासह नाम फाउंडेशनने दिलेले योगदानही मोलाचे ठरले. त्याचे सकारात्मक प्रतिसाद यावर्षी दिसले. महिन्याभरात तीनवेळा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला; मात्र वाशिष्ठी आणि शिवनदीला इशारा पातळीदेखील ओलांडता आली नाही. साडेसात लाख घनमीटर गाळ उपसा केल्याचे सकारात्मक परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाच्या जय्यत तयारीला दाद
गेल्या वर्षीच्या महापुरात प्रशासन ठप्प होते. महापुरात आणि महापुरानंतर अधिकारी सक्रिय नसल्याचा आरोप झाला; मात्र यावर्षी प्रशासनाने सहा महिन्यापूर्वीच महापुराची तयारी केली होती. महापूर असो किंवा इतर नैसर्गिक आपत्ती, अशावेळी नुकसानग्रस्त लोकांपर्यंत संपर्क होत नाही. यावर उपाय म्हणून प्रशासनाने प्रथमच सार्वजनिक उद्घोषणाप्रणाली उभारली. चिपळूण शहरात १० ठिकाणी तर तालुक्यात पेढे, तिवरे, तिवडी, नांदिवसे, कोळकेवाडी, खेर्डी, कळंबस्ते येथे उभारण्यात आली. आपत्तीदरम्यान सर्व मोबाईल कंपन्यांची यंत्रणा कोलमडली तरी सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीतून नागरिकांशी संपर्क साधला जात आहे.
याशिवाय शहरात प्रथमच १० वॉकीटॉकी उपलब्ध झाले. त्यातून शहरातील विविध भागात महापुरामुळे संपर्क तुटला तरी त्याद्वारे त्या-त्या पथकाशी संपर्क ठेवून माहिती घेणे शक्य झाले आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या पावसाची नोंद त्वरित मिळावी, म्हणून नांदिवसे आणि करंबवणे येथे अॅटोमॅटिक रेनगेज मीटर बसवण्यात आला आहे. वाशिष्ठी नदीत तीन ठिकाणी रिव्हर गेजमीटर बसवल्याने पाण्याची पातळी दर तासाने मोजली जात आहे. आपत्ती व्यवस्थापनातील हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
अशी आहे तयारी
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या तयारीला दाद द्यावी लागणार आहे. वॉकीटॉकी, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, बोटींची व्यवस्था, रिव्हर वॉटरगेज मीटर, अॅटोमॅटिक रेनगेज मीटर आदी यंत्रणा बदलत्या आपत्ती व्यवस्थापनाची मजबूत बाजू आहे.
आपद्ग्रस्तांचे वेळीच स्थलांतर
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबावर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची वेळ आली. यावर्षी संभाव्य धोका ओळखून तालुक्यात ४३६ लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. यामध्ये पेढे, नांदगाव, नांदिवसे, पेढांबे, मिरजोळी, कोळकेवाडी आणि कळकवणे येथील ९१ कुटुंबांचा समावेश आहे. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना नाम फाउंडेशनने १९, तर सिद्धीगिरी गुरुकुल फाउंडेशन कणेरी मठाने ११ घरे बांधून देत त्यांना दिलासा दिला.
कोयनेची वीजनिर्मिती थांबवण्याचा यशस्वी प्रयोग
कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहरात पूर येतो, असा आरोप नेहमी केला जातो. मागील आठवड्यात वाशिष्ठीने इशारा पातळी गाठली होती. अशावेळी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठीला सोडण्यात येणारे अवजल भरतीच्यावेळी थांबवण्यात आले. चिपळूणच्या इतिहासात प्रथमच असा प्रयोग केला गेला ज्याची अनेक वर्षे मागणी केली जात होती; परंतु नव्या यंत्रणेमुळे पाण्याचा अंदाज सहजपणे येत असल्याने व कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाशी वेळोवेळी संपर्क ठेवता ये
त असल्याने चिपळूणच्यादृष्टीने ही बाब अत्यंत फायदेशीर ठरू लागली, असे सांगितले जात आहे; मात्र कोळकेवाडी धरणातून पूर येतो, अशी केवळ नागरिकांची समज आहे. प्रशासनाने नागरिकांचा दावा वेळोवेळी फेटाळून लावला आहे. कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे खरंच पूर येतो का? याची चौकशी करण्यासाठी जलसंपदा खात्याचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमली आहे. या समितीनेही आरोप फेटाळून लावला आहे; परंतु यावर्षी मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोळकेवाडीचे पाणी थांबवण्यात आल्यामुळे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
एनडीआरएफची तुकडी वेळीच दाखल
अतिवृष्टीचा पहिला इशारा मिळताच एनडीआरएफच्या २२ जवानांची तुकडी चिपळुणात दाखल झाली. महिना होऊनही ते येथे तळ ठोकून आहेत. या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसली तरी या जवानांकडून जनजागृती व सुरक्षिततेबाबतचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यावर भर दिला. नांदिवसे राधानगरी येथील डोंगराला भेगा पडल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने गावात जाऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. काही दिवस पालिकेच्या प्रशिक्षण वर्गातून निवडलेले तरुण व शासकीय कर्मचाऱ्यांनादेखील एनडीआरएफने वाशिष्ठी नदीपात्रात बचावकार्याचे प्रात्यक्षिक दिले. पालिकेने यावर्षी स्वमालकीच्या ५ बोटी खरेदी केल्या तसेच जिल्हा प्रशासनाकडून एक बोट दिली आहे. त्यामुळे पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम झाला आहे.
महापुरातून सावरत पुन्हा उभारी
महापुराचे पाणी ओसरताच जिल्ह्यासह राज्यातून मदतीला सुरवात झाली. पूरग्रस्तांच्या प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी चौफेर स्वरूपात मदत पोहोचली. कपडे, धान्य, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी या स्वरूपाची ही मदत चिपळूणकरांसाठी लाखमोलाची होती. दुसऱ्या दिवसापासूनच राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला, तो चिपळूणची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरूच होता. या मदतीमुळे उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणकरांना मोठा आधारा मिळाला. काही बँकांनी कमी व्याजदरात व्यावसायिकांना कर्जपुरवठा केला. अनेक सेवाभावी संस्थांनीही छोटे विक्रेते व व्यावसायिकांना उभारी मिळण्यास रोख तसेच वस्तुरूपात मदत केली. यातून खचलेल्या पूरग्रस्तांनी परिस्थितीशी दोन हात करत पुन्हा उभारी घेतली.
घरांचे दर पडले, नागरिकांनी चिपळूण सोडले
गेल्या वर्षीच्या महापुराचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला आहे. शहरातील महापुराच्या पाण्याची पातळी वाढली ती आता पुन्हा खाली येणार नाही, अशी मानसिकता लोकांची झाली. त्यामुळे शहरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमधील सदनिकांचे बुकिंग थांबले. अनेक बिल्डरांनी दर कमी केले तरी मागणी कमीच. तळमजला आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता गृहित धरून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जाण्यास पसंती दिली जात आहे. शिक्षणाच्या निमित्ताने शहरात आलेल्या ग्रामस्थांनी फ्लॅटला कुलूप लावून गावी जाणे पसंत केले.
नागरिकांची मानसिकता
शहरातील सखल भागातील गटार, नाले, पऱ्हे अरुंद आहेत. त्यात शहरातील नागरिक प्लास्टिकसह घरातील कचरा टाकत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडत आहेत. पालिकेच्या सफाई कामगारांना गटारात उतरून गटार स्वच्छ करावे लागत आहेत. नागरिकांची ही नैसर्गिक कृती पुराला काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.