चिपळूण (रत्नागिरी) : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील खुर्ची जवळपास दुप्पट किमतीने खरेदी केल्याच्या कारणास्तव वादग्रस्त ठरली होती. यामुळे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी खुर्चीचे पूजन करून तिची मिरवणूक काढली. या निमित्ताने सांस्कृतिक केंद्र ते पालिकेपर्यंत खुर्चीची मिरवणूक काढून केंद्रातील नियमबाह्य कामांचे वाभाडे काढले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत; मात्र झालेली कामे नियमबाह्य करण्यात आली. शिवाय अव्वाच्या सव्वा किमतीने वस्तूंची खरेदी करून पालिकेचे लाखोंचे नुकसान केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे केंद्राचे उद्घाटन रखडले होते. अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. महिनाभरात केंद्राचे उद्घाटन होईल, असे त्यांनी जाहीर केले होते.
खुर्चीची मिरवणूक काढून वस्त्रहरण
दरम्यान, आज सकाळीच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी खुर्ची खरेदी कामाचे वस्त्रहरण केले. ओपन मिनी ट्रकमध्ये सांस्कृतिक केंद्रात ठेवण्यात आलेल्या दोन्ही खुर्च्या ट्रकमध्ये ठेवण्यात आल्या. केंद्रासमोरच खुर्चीला हार घालून पूजन करण्यात आले. सांस्कृतिक केंद्र ते पालिकेदरम्यान खुर्चीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीचे नगरसेवक व नागरिक सहभागी झाले होते.
नियमबाह्य कामे लोकांना समजावीत
यावेळी नगरसेवक अविनाश केळस्कर म्हणाले, सांस्कृतिक केंद्रासाठी पालिकेने बसवलेली सेमी लक्झरी खुर्ची ८१९२ रुपये प्रति नग दराने खरेदी केली. बसविण्यासाठी त्यावर ६४० रुपये प्रतिनग खर्च केला. तर दुसरी नॉर्मल खुर्ची ६४०० रुपयास प्रति नग खरेदी केली. मुळात लक्झरी खुर्चीचा दर ३५४० आहे तर नॉर्मल खुर्ची २८०० रुपयास मिळते. जिथून या खुर्च्या खरेदी झाल्या तिथून आम्ही माहिती घेत त्याच खुर्च्या निम्म्या किमतीत आणल्या आहेत. सांस्कृतिक केंद्र नूतनीकरणाच्या कामात झालेली नियमबाह्य कामे लोकांना समजावीत, यासाठी शहरातील बहुचर्चित खुर्चीची मिरवणूक काढण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
दुप्पट दराने या खुर्च्यांची खरेदी
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील खुर्ची ही ऐतिहासिक अशीच ठरली आहे. शहरातील लोकांना फसवून दुप्पट दराने या खुर्च्यांची खरेदी केली. कर भरणाऱ्या लोकांची फसवणूक करीत खिसे भरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोणाचे हात बरबटलेले आहेत, ते चौकशी दरम्यान उघड होतील.
- उमेश सकपाळ, गटनेता शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.