coronavirus impact workers konkan sindhudurg
coronavirus impact workers konkan sindhudurg 
कोकण

अस्वस्थतेच्या वावटळीची "ही' चाहूल 

- शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग- लॉकडाउनमुळे गोव्यातील रोजगार क्षेत्रात आलेली स्थित्यंतरे सिंधुदुर्गात फार गंभीर स्थिती निर्माण करणार आहेत. सध्या हा परिणाम केवळ गोवा बंदीपुरता मर्यादित असला तरी जेव्हा सीमा खुल्या होतील तेव्हा जिल्ह्यातील अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ ओढवणार आहे. यातून जिल्ह्याला रोजगाराबरोबरच अनेक सामाजिक प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. 

सिंधुदुर्गात उद्योग नसल्याने रोजगाराचा प्रश्‍न नेहमीच चर्चिला जातो; पण गोव्यामुळे याची तीव्रता कमी झाली होती. गोव्यात जिल्हाभरातील शेकडो तरुण रोजगार मिळवतात. सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या सीमेलगतच्या जिल्ह्यांतील अनेक जण गोव्यातून नोकरीनिमित्त ये-जा करतात. गेली पंधरा ते वीस वर्षे गोव्यात नोकरीला जाण्याचा ट्रेंड अधिकाधिक घट्ट बनत आहे; मात्र आता तशी स्थिती राहिलेली नाही. लॉकडाउननंतर गोव्यातील उद्योग क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे येऊ घातली आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणून सिंधुदुर्गातील अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा येणार आहे. 

सध्या गोव्यात कोरोनामुळे सीमा बंद आहेत; मात्र तेथील उद्योग क्षेत्र सुरू आहे. तेथे काम करणारे अनेक तरुण सिंधुदुर्गात आपल्या गावी अडकले आहेत. त्यांना आपली नोकरी जाण्याची चिंता सतावते आहे; मात्र गोव्याच्या कडक निर्बंधामुळे त्यांना सीमा ओलांडता येत नाही. "सकाळ'ने या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. यानंतर माजी पालकमंत्री दीपक केसरकर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनीही सकारात्मक ग्वाही दिली; मात्र गोव्याने जारी केलेले निर्बंध आणि वास्तव याचा विचार केला तर आजही या तरुणांना सहज गोव्यात जाणे शक्‍य नाही. गोव्याच्या आताच्या निर्णयानुसार ज्यांची तेथे राहायची सोय असेल त्यांना ई पासची गरज नाही. 48 तासांत सक्षम लॅबकडून मिळालेला कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून गोव्यात प्रवेश करता येऊ शकतो; पण इतका ताजा कोरोना रिपोर्ट मिळवण्याची व्यवस्था सिंधुदुर्गात नाही. दुसरा पर्याय म्हणजे गोवा सीमेवर दोन हजार रुपये भरून कोरोना चाचणी करता येऊ शकते; पण दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय, या सुप्त भीतीमुळे हा पर्याय वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे. या दोन्ही गोष्टी करायच्या नसल्यास गोव्यात जाऊन चौदा दिवस होम क्‍वारंटाईनचा पर्याय आहे; पण या सगळ्या प्रक्रियेसाठी गोव्यात राहण्याचा सक्षम ठिकाणा हवा. आपल्याकडील बहुसंख्य तरुण सिंधुदुर्गातून ये-जा करत असल्याने त्यांना गोव्यात प्रवेश कसा मिळणार? काही जण भाड्याने राहतात; मात्र घरमालक या परिस्थितीत त्यांना घ्यायला तयार नाहीत. यामुळे गोव्याने प्रवेशासाठीची प्रक्रिया थोडी सैल केल्याचे कागदावर भासवले असले तरी वास्तव वेगळे आहे. शिवाय सिंधुदुर्गासाठी किंवा तेथे रोजगारानिमित्त जाणाऱ्यांसाठी कोणतेही वेगळे निकष लागू केलेले नाहीत. 
सध्या केवळ गोवा प्रवेशाबाबत प्रश्‍न दिसत असले तरी ते हिमनगाच्या टोकासारखे आहेत. खरी गंभीर स्थिती पुढे वाढून ठेवली आहे. गोव्यातील बहुसंख्य अर्थकारण पर्यटनावर चालते. गोव्यात रोजगार मिळवणाऱ्यांपैकी सिंधुदुर्गातील 60 टक्‍केपेक्षा जास्त संख्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. तेथे पूर्वीसारखे पर्यटन बहरायला खूप मोठा कालावधी जावा लागणार आहे. मुळात हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी पुढचे काही महिने लागतील. जगभरात कोरोनामुळे आलेल्या मंदीचा विचार करता परदेशी पर्यटक गोव्यात येण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे गोव्यात या क्षेत्रावर मंदीचे सावट ओढवले जाऊ शकते. यामुळे खूप मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील तरुण "जॉबलेस' होण्याची भीती आहे. 

गोव्याने आपल्या फॅक्‍टरी ऍक्‍टमध्ये नुकतीच दुरुस्ती केली. त्यानुसार आता आठऐवजी बारा तासांची ड्यूटी निश्‍चित केली आहे. यात आठ तास नियमित व पुढचे चार तास ओव्हरटाईम असेल. याचा परिणाम म्हणून येत्या काळात तीनऐवजी एकाच शिफ्टमध्ये कारखाने चालतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. मंदीमुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेऊन एकाच शिफ्टला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तीन शिफ्टमध्ये तीस जणांचे काम असल्यास एका शिफ्टमुळे ते अवघ्या दहा ते पंधरा जणांवर येणार आहे. यामुळे नोकऱ्या कमी होण्याची संख्या वाढणार आहे. याचाही परिणाम सिंधुदुर्गातील तरुणांना भोगावा लागणार आहे. गोव्याने ही कायद्यातील सुधारणा वर्षभरासाठी केली असली तरी पुढच्या काळात पर्यटनातील मंदी त्यांना आणखी काय काय कठोर निर्णय घ्यायला लावते, हाही चिंतेचा विषय आहे. 

या सगळ्यांमुळे सिंधुदुर्गातील अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी जवळपास नाहीत. या बेरोजगारांना मुंबई, पुणे असे पारंपरिक पर्याय समोर असणार आहेत; पण कोरोनानंतर मुंबईतील उद्योग क्षेत्रावरही गंभीर परिणामांची शक्‍यता आहे. अनेक मोठ्या कंपन्या अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोव्यातील नोकऱ्या गमावलेल्यांसमोर फार मर्यादित पर्याय समोर असतील. अशातून नैराश्‍य वाढीला लागणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता आहे. याचा जास्त परिणाम शहरापेक्षा ग्रामीण भागावर दिसू शकतो. 

या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आतापासूनच सर्व धोरणकर्त्यांनी एकत्र येत नियोजन करणे आवश्‍यक आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. कारण आरोप-प्रत्यारोपातून केवळ मनोरंजन होते. निष्पन्न काहीच होत नाही. माणसे टिकली तर शह-काटशहाचे राजकारण खेळायला खूप वेळ मिळेल; पण आता सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या अस्वस्थतेच्या वावटळीला थोपवण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वच घटकांनी एकत्र यायला हवे. एकदा वेळ निघून गेली तर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. 
 

गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर दृष्टिक्षेप 
* पंचतारांकित हॉटेलची संख्या - 30 
* सप्ततारांकित हॉटेलची संख्या - 3 
* इतर छोट्या-मोठ्या हॉटेलची संख्या - 1500 
* थेट पर्यटनातून मिळणारा रोजगार - 1,50,000 
* पर्यटनातून अप्रत्यक्ष मिळणारा रोजगार - 2,50,000 
* गोव्याची लोकसंख्या - 14,58,545 (2011 च्या जनगणनेनुसार) 
* लॉकडाउननंतर अधिकृतरीत्या गोवा सोडलेले परप्रांतीय - 1,70,000 (प्रत्यक्षात संख्या त्याहून खूप मोठी) 

पर्यटन धोक्‍यात 
* कोरोनाची चाहूल लागताच गोव्याच्या पर्यटनाला उतरती कळा 
* जागतिक मंदीचा पुढच्या काळात थेट परिणाम 
* 31 मेपर्यंत हॉटेल पूर्णतः बंद 
* बंदी उठली तरी पावसाळ्याचा हंगाम मंदीचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT