Goa Tourism Policy
Goa Tourism Policy esakal
कोकण

गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मालवणला मोठा फटका; पर्यटन पॅकेज सुविधेत बदल, पर्यटकांची संख्याही रोडावली

प्रशांत हिंदळेकर

गोव्यातील काही पर्यटन व्यावसायिकांनी गोव्यातच स्कुबा, स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

मालवण : गोव्याच्या बदललेल्या पर्यटन (Goa Tourism) धोरणाचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत आहे. गोव्यात येणारे पर्यटक इतर भागात जाऊ नये, यासाठी तेथे व्यवस्था उभी केल्याने गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन पॅकेज सिस्टीम (Goa-Sindhudurg Tourism Package System) बंद झाली आहे. त्यामुळे काही ठराविक दिवस वगळता येथील किनारपट्टी पर्यटकांअभावी सुनी होत आहे. यावर वेळीच धोरणात्मक पर्याय काढणे गरजेचे बनले आहे.

पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणात (Malvan Tourism) गेल्या काही वर्षात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या (Tourists) संख्येत वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन चार वर्षाचा विचार करता गोव्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे पॅकेजच्या माध्यमातून मालवणात साहसी जलक्रीडा प्रकारांचा, स्कुबा, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंगचा आनंद लुटण्यास मोठ्या प्रमाणात दाखल होत होते. त्यामुळे सुटी कालावधीबरोबरच अन्य कालावधीतही शहरातील दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेली असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे किनारपट्टी भागात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला होता.

गोव्यात येणारे पर्यटक हे पॅकेजच्या माध्यमातून मालवणात जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास येत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या मंत्र्यांनी गोव्यात येणारे पर्यटक पर्यटनासाठी अन्य ठिकाणी जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना दिल्यामुळे तसेच गोव्यातील काही पर्यटन व्यावसायिकांनी गोव्यातच स्कुबा, स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका दैनंदिन पर्यटनास बसला आहे.

गोव्यात पर्यटनासाठी येणारे व तेथून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला. यावर मार्ग काढण्यासाठी काही स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेत या प्रश्नासंदर्भात लक्ष वेधले. लोकप्रतिनिधींकडून गोव्याच्या संबंधित मंत्र्यांशी भेट घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना देण्यात आले. मात्र, याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी दैनंदिन पर्यटनास त्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

गोव्यातून प्रत्येक दिवशी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी भर दिला. यात नाश्त्याची सुविधा असलेली छोटी हॉटेल्स, बाथरूम, स्वच्छतागृह यांच्यासह अन्य छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला होता. दैनंदिन पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून किनारपट्टी भागातील व्यवसायिकांसह शहरातील विविध हॉटेल्स तसेच बाजारपेठेतील व्यावसायिकांना फायदा होत होता. मात्र, सद्यस्थितीत दैनंदिन पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागातील छोट्या व्यावसायिकांवर झाला असून त्यांच्या रोजगारावरही मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

व्यवसायिकांमध्ये समन्वय गरजेचा

येथे येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे तसेच साहसी जलक्रीडा प्रकारांचे आकर्षण असते. यासाठी गेल्या काही वर्षात शहरातील बंदर जेटी, चिवला बीच, दांडी, वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी भागातील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला आहे. मात्र, साहसी जलक्रीडा व्यवसायिकांमध्ये समन्वय नसल्याने त्याचा फटका येथील पर्यटनास बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन पर्यटनास पुन्हा जोमाने सुरवात करायची असल्यास स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्या भागातील नवनवीन आकर्षणाचे मार्केटिंग करण्याची आवश्यकता आहे. तरच येथील पर्यटन बारमाही बहरेल.

दुसऱ्यावर अवलंबून राहून सोपे मार्ग स्वीकारणे ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याकडे पर्यटकांना आकर्षून घेण्याची प्रचंड ताकद आहे. गोव्याकडे पर्यटक आकर्षित होण्याचे मुख्य कारण मद्य आहे. पण, आपल्याकडे पर्यटक आकर्षित होण्याचे कारण हे येथील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. त्याचबरोबर येथील पर्यटनात असलेला घरगुतीपणा ही आकर्षणे आहेत. गोव्यातील पर्यटनाचे व्यवसायीकरण झाले आहे. आपल्याकडील विविध आकर्षणाचे जर व्यवस्थितपणे मार्केटिंग केले तर त्याच्यातून फार मोठ्या संधी आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांनी एकसंघपणे इथल्या पर्यटनाच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी व्यापारी महासंघ आवश्यक मदत करण्यास तयार आहे.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही नियम ठरतील त्याचे सर्व व्यावसायिकांनी कसोशीने पालन करायला हवे. यातून कोणालाही कसलीही सवलत मिळणार नाही हे पाळायला हवे. आपल्याकडील वॉटर स्पोर्ट्स, साहसी जलक्रीडा, स्कुबा, स्नॉर्कलिंग यांचे अशा पद्धतीने मार्केटिंग व्हायला हवे की गोव्यातून येथे पर्यटक येण्यापेक्षा येथून पर्यटक गोव्यात जायला हवेत अशा पद्धतीची व्यवस्था करायला हवी. पर्यटन व्यवसायिकांमध्ये सध्या जी गळेकापू स्पर्धा सुरू आहे, ती बंद करून सर्वांना बरोबर घेऊन जाणे आणि स्वतःवर योग्य बंधने घालून घेतल्यास येथील पर्यटन वाढीस चालना मिळेल.

-नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला. त्यांच्या हस्ते राजकोट येथील शिव पुतळ्याचे अनावरण झाले. मात्र, अद्यापही राज्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या वेब पोर्टलवर याची माहिती प्रसिद्ध करण्याची गरज असताना त्याची कार्यवाही झालेली नाही. कोकणाचा विचार करता अधिकृत असलेल्या पोर्टलवर जातात. अनेक राज्याचे बुकिंग हे या पोर्टलवर अवलंबून असते. त्यादृष्टीने अद्ययावत असणे गरजेचे असते. मात्र, प्रशासनाची सकारात्मकता नसल्याचे दिसून येते. वॉटर स्पोर्ट्सच्या नियमावलीत ज्या अडचणी आहेत, त्याचा त्रास व्यावसायिकांना होत आहे.

मात्र, यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने शिवाय त्यांची मानसिकताच नसल्याचे दिसून येते. जर सर्व व्यावसायिक एकत्र आले आणि स्थिर दर निश्चित झाल्यास गजबजलेल्या पर्यटनात जेवढे अर्थाजन होत होते, तेवढेच अर्थाजन करण्याची क्षमता येथील पर्यटनात आहे. एखादे पर्यटन स्थळ विकसित झाल्यानंतर त्याचे ज्याप्रमाणे प्रमोशन व्हायला हवे त्यादृष्टीने पर्यटन संचलनालयाकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, ती झाली नाही. कोकणला प्रमोट करणाऱ्या टुरिस्ट गाईड सेंटरची निर्मिती होण्याची गरज आहे. मात्र, अनेक संधी असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

-बाबा मोंडकर, जिल्हाध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT