मंडणगड (रत्नागिरी) : रानातून चरून संध्याकाळी घरी परतलेल्या बैलाच्या मानेखालील भागातून रक्ताची धार लागल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तोंडाच्या जवळ नखांचे ओरखडे दिसून येत असल्याने याला दुजोरा मिळाला. ही घटना 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 च्या सुमारास पेवेकोंड मोठी वाडीत घडली.
बैलाच्या पाठीमागील पायांच्या वरच्या बाजूलाही नखांचे ओरखडे दिसून येत असल्याने बिबट्याने पाठलाग केला असावा, असा अंदाज आहे. माजी पोलिस पाटील बाळकृष्ण दुर्गवले यांचा बैल चरण्यासाठी रानात सोडण्यात आला होता. तो संध्याकाळी घरी परतला असता, त्याच्या मानेवर जखमा आढळून आल्या. तोंडाजवळील भागातून रक्त गळत असल्याचे निदर्शनास आले. नखांचे ओरखडे दिसून आल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज आहे.
पेवेकोंड परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित करणारे अनेक प्रसंग या आधी घडले आहेत. अनेकवेळा त्याचे दर्शन घडले आहे. काही दिवसांपूर्वी गोवळे परिसरात गाईवर हल्ला केला, असे ग्रामस्थानी सांगितले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
27 फेब्रुवारी 2018 रोजी शिगवण येथील वाड्यातून वासराला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला. आंबवली परिसरात गावातील गोठ्यातून गाईला बिबट्याने ओढून नेले तसेच पाच शेतकऱ्यांच्या मोकाट फिरणाऱ्या आणखी सहा जनावरांना आपले शिकार बनवले. त्यांचे शरीराचे काही भाग व सांगाडे ग्रामस्थांना आढळून आले.
पेवेकोंड येथे नोव्हेंबर 2017 मध्ये संध्याकाळी सातच्या सुमारास घरासमोरील अंगणात बसलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घालून एका महिलेच्या पुढ्यातूनच बिबट्या घेऊन गेला. ही महिला त्यावेळी बिबट्याला पाहून बेशुद्धही पडली. पाचरळ परिसरातही बिबट्याचा वावर असून अनेकांना रात्री तो दिसला आहे. पालेगाव येथे बकऱ्या मारल्या आहेत. तळेघर येथील एका गोठ्याच्या माळ्यावर बिबट्याने ठाण मांडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थ अनेक दिवस त्याच्या दहशतीखाली होते.
हेही वाचा - आता डिजिटल सहीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार
यापूर्वीच्या ठळक घटना
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.