देवगड - होम क्वारंटाईन असलेल्या एका वृध्दाचा मृतदेह घरातच सडलेल्या अवस्थेत सापडला. जामसंडे गणेशनगर परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार उघड झाला. भास्कर रामचंद्र दहिबांवकर (वय80) असे त्यांचे नाव आहे. वृध्दाच्या मृतदेहासमवेत त्यांची पत्नी व मुलगा घरातच राहत होता; मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नगरपंचायतीने पुढाकार घेत मृतदेहावर अंत्यविधी केले.
याबाबतची माहिती अशी, जामसंडे गणेशनगर येथे भास्कर दहिबांवकर पत्नी, मुलगा यांच्या समवेत राहत होते. लॉकडाऊनच्या आधी ते मुंबईला गेले होते आणि तेथेच अडकले. कोरोनाच्या कालावधीनंतर सुमारे अडीच महिन्यानंतर ते गावी जामसंडे गणेशनगर येथील घरी आले. मुंबईहून परतल्यावर पती, पत्नी आणि मुलगा होम क्वारंटाईन होते. मंगळवारी उशिरा त्यांच्या घरातून उग्र वास येवू लागल्यामुळे परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका हर्षा ठाकूर यांना माहिती दिली. ठाकूर यांनी खातरजमा करीत पुढील आवश्यक हालचाली केल्या.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक संजय कातिवले सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. श्री. कातिवले यांच्यासह हवालदार एस. डी. कांबळे, गणेश चव्हाण, एफ. जी. आगा यांनी पहाणी केली. त्यावेळी भास्कर दहिबांवकर यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा मुलगा, पत्नीही घरात होती. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे तत्काळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून फवारणी करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यासहीत घटनास्थळी येऊन दहिबांवकर यांच्या मृतदेहाची पाहणी केली. त्यांचा मृत्यू सुमारे चार ते पाच दिवसापूर्वी झाला असावा आणि मृतदेह पूर्ण कुजलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने दहिबांवकर यांचा मृतदेह रात्री घराबाहेर काढून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दहिबांवकर यांची पत्नी व मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने ते मृतदेहा समवेतच राहत होते. दुर्गंधी पसरली तरीही त्यांना कसलीही जाणीव झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षितता म्हणून आज नगरपंचायतीच्यावतीने दहिबांवकर यांच्या घरासह परिसरात फवारणी करण्यात आली. दहिबांवकर कुटुंब मुंबईहून गावी परतल्याची माहिती नव्हती, असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या सेवावृत्तीचे कौतुक
सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. त्यातच कोरोनामुळे सध्या अशा घटनांबाबत भीतीचे वातावरण आहे. तरीही नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मृतदेह धाडसाने बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. या कर्मचाऱ्यांच्या या सेवावृत्तीचे आज शहरात कौतुक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.