रत्नागिरी : पाण्याची बचत करत रब्बी हंगामात चांगल्या पद्धतीने शेती करून उत्पन्न मिळवण्याचा सेंद्रीय व नॅचरल थ्री लेयर मल्चींगचा यशस्वी प्रयोग रत्नागिरी तालुक्यातील खानू येथील प्रगतशील शेतकरी संदीप बबन कांबळे यांनी केला आहे. पहिल्याच वर्षी त्यांनी सुमारे दीड लाखापेक्षा अधिक उत्पन्न घेतले. ऐन कोरोनाच्या टाळेबंदीत त्यांच्या भाजीपाल्याने ग्रामस्थांना घराच्या जवळच भाजीही मिळाली.
इस्त्राईलमध्ये मल्चिंग शेतीचा प्रयोग होतो. त्याच धर्तीवर खानू येथे ऑक्टोबर महिन्यात कांबळे यांनी लागवड केली. रोपांना दररोज पाणी व वेस्ट डी कंपोझर हे सेंद्रीय औषध दिले. साधारणतः 45 व्या दिवशी वालीला शेंगा लागल्या. डिसेंबरला उत्पन्नही सुरु झाले. एक जुडी 10 रुपयांना विकली. मुख्य महामार्गाला लागून पाली बाजारात घर असल्याने विक्रीसाठी वेगळी यंत्रणा लागली नाही. डिसेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत भाजी व्यावसाय सुरु होता. पहिले दोन महिने दररोज शंभर जुड्या मिळाल्या. त्यानंतर पाच दिवसांनी शंभर जुडी मिळाली. सुमारे 70 ते 80 हजाराचे उत्पन्न त्यातून मिळाले.
साठाव्या दिवशी कुळीथ शेंगा काढल्या. त्यातुन सुमारे 50 किलो उत्पादन तर पावट्यातून सुमारे 60 किलो उत्पादन मिळाले. वांगी आठवड्याला 15 किलो प्रमाणे 120 किलो मिळाली. कुळीथ प्रथम तोडणी केल्यावर त्यांची झाडेही पुन्हा पावटा, वाल यांच्या मुळांमध्ये टाकल्याने मल्चींग व खत झाले. त्यामुळे पाच महिने उत्पादन सुरु राहिले. मल्चिंगमुळे तीन टप्प्यात नैसर्गिक आच्छादन झाले आणि पाण्याचे बाष्पीभवन थांबले. यासाठी प्लॅस्टीक पेपर न वापरता पर्यावरण संवर्धनासही मदत झाली.
काय आहे थ्री लेयर मल्चिंग
वीस गुंठ्यात थ्री लेयर मल्चिंग पद्धतीने शेतीसाठी सहा फूट अंतरावर तीनशे अळ्या केल्या. त्यात गोलाकार पद्धतीने कुळीथ बियांचे 5 दाणे पेरले. दोन्ही बाजूला सहा इंचावर 2 पावटा बिया दाणे आणि तीन कोकण वालाचे बियाणे अशी पेरणी केली. ड्रीप ठिबकद्वारे दिवसातून चार लीटर पाणी दिले. 4 ते 5 दिवसात बियांना कोंब आले. दोन आळयांतील मोकळ्या जागेवर वांग्याची 100 रोपे लावली. त्यानंतर कुळीथ, पावटा, वाल ही तिन्ही पीके अळ्यांमध्ये जवळ असल्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी अत्यंत जोमाने वाढू लागली. कुळीथ जमिनीशी समांतर अच्छादन घातल्यासारखा पसरला. पावटा थोडा वर वाढला. त्यात वालीचा वेल जाड काठ्यांच्या आधाराने वर चढविले.
भात, नाचणीनंतर रब्बी हंगामात दुबार पेरणी पाणी असते तिथेच होते. त्याला पर्याय म्हणून नोव्हेंबर महिन्यात सेंद्रीय पद्धतीने थ्री लेयर मल्चींगने रब्बीची लागवड करता येऊ शकते. त्यातून उत्पन्नही चांगले मिळते.
संदीप कांबळे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.