सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : माजी खासदार निलेश राणे यांच्याबद्दल यापुढे कोणत्याही प्रकारे अपशब्द किंवा असे प्रकार घडल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत आम्ही पुतळा जाळला अटक करून दाखवाच, असे आव्हान येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिले. येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी राजपुरोहित आदी उपस्थित होते.
परब म्हणाले, 'खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळला; मात्र चर्चसमोर पुतळा जाळायला आम्ही मुर्ख नाही. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम शिवसेना करत आहेत.'
ते म्हणाले, 'पंचायत समितीचे सदस्य रुपेश राऊळ यांच्या पंचायत समिती मतदारसंघात मळगाव आणि नेमळे येथे सरपंच भाजपचा आहे. नुकत्याच झालेल्या मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव झाला. याची चिंता राऊळ यांनी करावी. सावंतवाडीत घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देऊ नये. जनता सक्षम आहे. पुतळा जाळणे आणि भाजी मार्केट प्रश्न हे दोन वेगळे प्रश्न आहेत. ते एकत्र जोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघांमधील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे.'
यावेळी त्यांनी येथील विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्यावर तोफ डागली ते म्हणाले, 'राजकारण तुमचे काम नाही. पावडर लावून डायलॉग मारले म्हणून कोण नेता होत नाही. त्यासाठी मनगटात दम असावा लागतो.' निलेश राणे यांच्याबाबतीत पुन्हा असे काही करायची हिंमत केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.
...ही 'चिवचिव' सेना
खासदार राऊत यांचा पुतळा जाळला म्हणून पोलिस स्थानकात जाऊन निवेदने देण्याचे कालपासून प्रकार शिवसेना करत आहे. या शिवसेनेमध्ये दम राहिला नाही. ही पूर्वीची शिवसेना नव्हे तर ही 'चिवचिव' सेना असल्याचा टोला नगराध्यक्ष परब यांनी या पत्रकार परिषदेत लगावला.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.