sindhudurg district history  
कोकण

सिंधुदुर्गाला निसर्गाची साथ पिढ्यानपिढ्या

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  - आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता शेकडो वर्षांपासून राहिली आहे. या सदराच्या पहिल्या भागात प्राचिन काळात या प्रांताची सत्तास्थिती कशी होती याचा आढावा घेतला. आता पुढच्या टप्प्यात सिंधुदुर्गाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असलेल्या गेल्या पाच-सहाशे वर्षांपूर्वीच्या घडामोडींचा दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या "सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा' या सदरात आढावा घेणार आहोत. यात प्रामुख्याने कुडाळ देश आणि सावंतवाडी संस्थानच्या राजकीय कारकीर्दीचा समावेश आहे. या दोन सत्तास्थानांनी आताच्या सिंधुदुर्गातील बऱ्याच भुभागावर अधिराज्य गाजवले. हे समजून घेण्यासाठी त्या काळात या प्रांताचे अर्थकारण, येथील रचना, व्यापार, शेती आदी क्षेत्राचा विचार करणे गरजेचे आहे. या भागातून त्या काळातील चित्र मांडण्याचा हा प्रयत्न... 

सह्याद्रीच्या कुशीत असलेला दक्षिण कोकणातील हा भाग कायमच निसर्गावर आधारीत अर्थव्यवस्थेवर चालणारा राहिला आहे. संस्थान काळही याला अपवाद नाही. जलमार्गाने होणारा व्यापार हेही त्या काळातील बलस्थान होते. त्या काळात पिकवली जाणारी काही पिके आज नामशेष झाली आहे. वन्यप्राण्यांच्या क्षेत्रातही अनेक प्राणी आज अतिदुर्मिळ किंवा नष्ट झाले आहेत. पण हा संपन्न वारसा आजही सिंधुदुर्गासाठी अभिमानास्पद आहे. ब्रिटीशांनी प्रसिद्ध केलेले गॅझेटियर आणि 1911 मध्ये प्रसिद्ध सावंतवाडी संस्थानचा इतिहास या संदर्भ पुस्तकामधून या प्रांताच्या संपन्नतेचे वर्णन आढळते. यानुसार या प्रांतात पाच मोठ्या नद्या वाहतात.

यातील चार पश्‍चिम वाहीनी तर एक पूर्व वाहिनी आहे. कर्ली, तेरेखोल, गड, तिलारी आणि हिरण्यकेशी उर्फ घटप्रभा अशा या नद्या होय. आजही त्या तितक्‍याच क्षमतेने वाहत आहेत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक गडकिल्ले होते. त्या काळात ते सत्तेची महत्त्वाची केंद्र होते. या भागात 135 इंच इतक्‍या सरासरीने पाऊस पडायचा. आंबोलीसह घाटमाथ्यावर हे प्रमाण 300 इंचापर्यंत होते. नद्या आणि विहीरी हे त्या काळातील पाणी व्यवस्थेचे माध्यम होते. 

त्या काळात हिवताप हा लोकांसाठी आरोग्याच्या क्षेत्रात डोकेदुखी ठरला होता. सह्याद्रीच्या रांगांमध्ये झाडी असलेल्या भागात याचा उपद्रव सगळ्यात जास्त होता. त्या पाठोपाठ आमांश आणि अतिसार हे पावसाळ्यात होणारे आजार अनेक गावांसाठी अडचणीचे ठरायचे.

याशिवाय देवी, गोवर, पटकी या आजाराने जर्जर झालेल्यांची संख्याही मोठी असायची. या प्रांतांत कृषी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने धान्य उत्पादनाचे प्रमाण जास्त होते. यात भात, नाचणी, वरी, हरीक, बरक आदी धान्ये कुळीथ, मुग, उडीत, पावटे, तुरी, चवळी आदी कडधान्ये याचे उत्पन्न घेतले जात असे. नारळ, सुपारी, काजू, कॉफी, आंबे, फणस, अननस, केळी, पपनस, साखर लिंबू, लिंबू, म्हावळूंग ही फळे प्रामुख्याने बागायतीत पिकवली जायची. तिळ, मध, विड्याची पाने, कात, ताग, खरडा, मिरची, आले, मिरी, चिंच, हळद, ऊस, कांदे याचे उत्पन्नही इथे घेतले जात असे. यातील काही पिके आता सिंधुदुर्गात आढळत नाहीत. बांबूपासून उत्पन्न घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती. 

येथील पर्यावरण क्षेत्राच्या संपन्नतेचाही वारसाही मोठा होता. बहुसंख्य ठिकाणी दाट जंगले होती. त्यात पट्‌टेरी वाघ, राणडुक्‍कर, अस्वल, तरस, गवा, कोल्हा, सांबर याच्या जोडीने चित्ताही असल्याचे उल्लेख सावंतवाडी संस्थानचा इतिहास या संदर्भ ग्रंथात आढळतात. 

खनिज क्षेत्राची चाहुलही पूर्वीपासून लागल्याचे दिसते. त्या काळात लोखंडाचा अंश असलेले दगड काही भागात आढळत असल्याचे उल्लेख आहेत. मॅगॅनिजच्या खाणींचाही उल्लेख आढळतो. रामघाटावर (तिलारी परिसर) सोने निघण्यासारखी माती असल्याचे संदर्भ दिले गेले आहेत. आकेरीत मिळणारा काळा दगड त्या काळातही मुर्ती कामासाठी प्रसिध्द होता. सोनवडे आणि सोनुर्ली येथे मिळणाऱ्या दगडाची त्या काळात भांडी बनवली जायची. अभ्रकाच्या खाणी कडावल आणि पांग्रड येथील डोंगरात होत्या. वालावलमधील कुपीच्या डोंगरात मिळणारा वैशिष्टपूर्ण मिळणारा दगड नक्षी कामासाठी उपयोगी यायचा. 

सावंतवाडी संस्थानच्या 1911 मध्ये केलेल्या खानेसुमारी (लोकसंख्या मोजणी) प्रमाणे इथली लोकसंख्या 217240 इतकी होती. यातील बहुसंख्य वस्ती हिंदूंची होती. त्या खालोखाल मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि जैन धर्मियांचा समावेश होता. हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या तब्बल 59 जाती होत्या. या सर्व समाजात चालीरिती, पोषाख, खाणेपिणे याच्या पद्धतीमध्ये बराच फरक होता. 

एकुण लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. शेतीच्या खालोखाल व्यापार, कलाकौशल्य, नोकरी, सागरी संपत्तीशी संबंधित व्यवसाय आदी उत्पन्नाची साधणे होती. त्या काळात सावंतवाडीत लाकडी खेळण्यांचे कारखानेही होते. सावंतवाडी शहरात कौले, विटा तयार करणारी फॅक्‍टरी असल्याचे उल्लेखही आढळतात. 

व्यापार प्रामुख्याने वेंगुर्ले, आरोंदा या बंदरातून व्हायचा. मालवणकडील भागातूनही जलवाहतूक चालायची. जलमार्गाने बहुतेक माल मुंबईतून यायचा यात तांदूळ, विलायती व देशी कापड, केरोसीन, लवंग, जायफळ, वेलदोडे आदी मसाल्याचे पदार्थ तांब्यापितळेची भांडी, लोखंडी हत्यारे, सुया, टाचण्या, स्टेशनरी, सुकामेवा, चहा, साबण, हरभरे, वाटाणे आदी कडधान्ये आदीची आवक होत असे. देशावरून रस्ता मार्गाने कोकणात माल येत असे. यासाठी फोंडा, घोडगे, हनुमंत किंवा रांगणा, पारपोली, तळकट, मांगेली, रामघाट ही घाटमार्ग होते. यातील फोंडा आणि पारपोली हे अधिक चांगले घाटमार्ग होते. रामघाटातूनही वर्दळ बरीच असाचयी. देशावरून घाट उतरून आंबेमोहर तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, तिळाचे तेल, तंबाखू, गांजा, कांदे, देशी कापड आदी कोकणात येत असे.

या प्रांतातून मात्र नारळ, सुपारी, ताग, मिरी, कॉफी, काजू, आंबे, आमसूल, तिळ आदी विक्रीसाठी बाहेर जात असे. कला कौशल्याच्या वस्तूही विक्रीला बाहेर जायच्या. त्या काळात सावंतवाडी संस्थानामध्ये दरवर्षी सरासरी साडेपाच लाख रूपयांचा माल यायचा आणि 50 हजाराचा माल संस्थानाबाहेर निर्यात व्हायचा. कसाल, घोटगे, नेरूर (दुकानवाड), आंबोली, तळकट, भेडशी, मळेवाडी (आजगाव), आरोस, आरोंदा, सातार्डा येथे टोलनाके होते. याठिकाणी जकात जमा केली जायची. एकुणच येथील अर्थकारण प्रामुख्याने निसर्गावर आधारीतच होते. त्या काळातही मुंबईशी असलेले नाते घट्ट होते. 

अशी होती लोकसंख्या 
* हिंदू - 20,5351 
* मुस्लीम -5,633 
* ख्रिश्‍चन - 5,815 
* जैन - 439 
* पारशी - 2 
(सावंतवाडी संस्थानने 1911 मध्ये केलेल्या मोजणीनुसार धर्मनिहाय असलेली लोकसंख्या) 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT