कोकण

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; चौथ्या खेमसावंतांची स्वतंत्र कारकीर्द

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी : दुर्गाबाईंच्या निधनानंतर तिसरे खेमसावंत अर्थात राजर्षी यांच्या पत्नी नर्मदाबाई आणि सावित्रीबाई या कारभार पाहत असल्याचे संदर्भ आधी आलेच आहेत. यावेळी चौथे खेमसावंत अर्थात बापुसाहेब हे गादीचे मालक होते; मात्र त्यांचे वय कमी होते. याच काळात सावंतवाडी संस्थानवर ब्रिटीशांनी प्रभाव निर्माण केला. पुढे बापुसाहेब वयात आल्यानंतर त्यांनी सत्तासुत्रे हाती घ्यावी, असा ब्रिटीशांचा आग्रह होता. सुरूवातीला ते तयार झाले नाहीत. नंतर मात्र अचानक त्यांनी सुत्रे हाती घेतली. यावरून बापुसाहेब आणि नर्मदाबाई व सावित्रीबाई अशी दोन सत्तास्थाने तयार झाली. यात अखेर ब्रिटीशांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर बापुसाहेबांची स्वतंत्र कारकीर्द सुरू झाली.

सावंतवाडी संस्थानच्या स्वैर कारभार करणाऱ्या सरदारांना धडा शिकवण्याच्या बहाण्याने ब्रिटीशांनी येथे आपली पकड घट्ट करायला सुरूवात केली. सरदारांचा बंदोबस्त केल्यानंतर ब्रिटीश अधिकारी मेजर जनरल सर विल्यम ग्रँट केर यांनी येथून परतताना कॅप्टन अचिन्सन हा अधिकारी मागे ठेवला. त्याने येथील कारभाराची घडी बसवून द्यावी, अशी सूचना केली. यावेळी गादीचे मालक असलेले चौथे खेम सावंत अर्थात बापुसाहेब वयाने लहान होते. यामुळे थेट कारभाराची सुत्रे राजर्षींच्या पत्नी नर्मदाबाई व सावित्रीबाई यांच्याकडेच होती. त्यांनी या स्थितीतही मुत्सदीपणा दाखवत ब्रिटीशांच्या मदतीने कोल्हापूर संस्थानशी असलेले अधिकाराबाबतचे वाद मिटवण्यासाठी पावले उचलली.

कॅप्टन अचिन्सन यांनी वर्षभर सावंतवाडीत राहत कारभारात बरीच सुधारणा केली. नर्मदाबाई आणि सावित्रीबाई यांच्या कारभाराचे त्यांनी ब्रिटीशांकडे कौतुक केले. समुद्रकिनाऱ्‍यालगत नसलेले आणि ब्रिटीशांच्या ताब्यात गेलेले भाग सावंतवाडी संस्थानला परत देण्याची शिफारस त्यांनी केली. यावर ब्रिटीश सरकारने पाट व आजगाव या तर्फा चाचेगिरीचा उपद्रव होवू नये म्हणूनच घेतल्या होत्या हे दाखवण्यासाठी १७ फेब्रुवारी १८२० मध्ये तह करून या दोन्ही तर्फातील रेडी व निवती हे किल्ले आणि समुद्र किनाऱ्‍यालगतचे गाव वगळता इतर भाग सावंतवाडी संस्थानला परत दिला.

राज्यकर्त्या असलेल्या दोघींनीही ब्रिटीशांकडे कोल्हापूर संस्थानशी असलेला अधिकाराबाबतचा वाद मिटवण्याची मागणी केली. पूर्वी संस्थानातील काही भाग इतर सत्ताधाऱ्यांनी घेतल्यास तो लढून परत घेण्याची परंपरा होती; मात्र बदललेल्या स्थितीत ब्रिटीशांनी कोल्हापूर आणि सावंतवाडी अशा दोन्ही संस्थानांशी तह केला होता. त्यामुळे या संस्थानामध्ये काही गावांबाबत असलेला तनख्याचा वाद इंग्रजांनी मध्यस्थी करून सोडवावा अशी मागणी त्या दोघींनी केली. कॅप्टन अचिन्सन यांनी यात पुढाकार घेत शिवापूरच्या मनोहर गडाबाबत असलेला तनख्याचा प्रश्‍न निकाली काढला. या तनख्याशी कोल्हापूर संस्थानने केलेला दावा संपुष्टात आणला. हा निर्णय १८२० मध्ये झाला. त्याच वर्षी ब्रिटीश सरकारने कॅप्टन अचिन्सन यांची सावंतवाडीतील नेमणूक रद्द केली. ही जबाबदारी आधी रत्नागिरी जिल्ह्याचे न्यायधिश आणि नंतर १८२२ मध्ये रत्नागिरीच्या कलेक्टरवर सोपवली.

सावंतवाडी आणि कोल्हापूर यांच्यातील सिध्दगड आणि नरसिंहगड येथील तनख्याबाबतचा वाद कायम होता. १८२२ मध्ये रत्नागिरीचे कलेक्टर मिस्टर रीड यांनी हा प्रश्‍न हाती घेतला. पावशी येथे याबाबत चौकशीची प्रक्रिया झाली. यानंतर सावंतवाडी संस्थानने कोल्हापूर संस्थानला दरवर्षी ठरावीक रक्कम द्यावी आणि त्याबदल्यात कोल्हापूरने घाटाखालील गावांमध्ये कर वसुली करू नये, असा निर्णय घेतला. या काळात खेम सावंत अर्थात बापुसाहेबांचे वय १८ वर्ष होते. त्यांनी आता राज्यकारभार पहावा असे ब्रिटीशांना वाटत होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारने याची जबाबदारी मिस्टर डन्लॉप यांच्यावर सोपवली. त्यांनी नेरूर येथे नर्मदाबाई व सावित्रीबाई आणि बापूसाहेब यांची एकत्र बैठक घेतली.

ब्रिटीश सरकारचे मत त्यांच्याकडे मांडले; मात्र बापुसाहेब याला तयार नव्हते. बाईसाहेब कारभार पाहतात तो आपल्यासाठीच असे उत्तर त्यांनी दिले. नंतर मात्र काही दिवसांनी परिस्थिती एकदम बदलली. काही लोकांनी बापुसाहेबांच्या मनात नर्मदाबाई आणि सावित्रीबाई यांच्याबाबत गैरसमज निर्माण करून दिले. यातून बापूसाहेबांनी या दोघींना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या. एकदा ही सगळी मंडळी बाहेर गेली असता राज्याची शिक्कामोर्तबे बापुसाहेबांनी परस्पर आपल्याकडे घेत काही मंडळींना आपल्या बाजूने वळवले. यानंतर सावंतवाडीच्या राजवाड्याभोवती बंदोबस्त करून नर्मदाबाई आणि सावित्रीबाई यांना आत प्रवेश नाकारला. त्या दोघींही दोन घटका राजवाड्याच्या बंद दरवाजाबाहेर थांबल्या. त्यांच्यासोबत बापुसाहेबांच्या पत्नीही होत्या.

अखेर आपण दोघीही येत नाही. बापुसाहेबांच्या पत्नीला तरी आत घ्यावे असे त्यांनी सांगितले. त्यांना आत पाठवून त्या दोघीही माठ्यात जावून राहिल्या. यानंतर बापुसाहेब स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले; मात्र त्या दोघींनीही माठ्यातून सत्ता चालवणे सुरू केले. माधवराव शिवराम सबनीस आदी मुख्य मंडळी बापुसाहेबांकडे तर काहीजण बाईसाहेबांकडे होते. दोघांचेही सैनिक मुलखात वसुलीसाठी फिरू लागले. यामुळे दोन सत्तास्थाने तयार झाली. याचा लोकांना त्रास होवू लागला. यावर निर्णय घेण्यासाठी ब्रिटीश अधिकारी मिस्टर डन्लॉप पुन्हा सावंतवाडीत आले. त्यांनी आधी राजवाड्यात बापुसाहेबांची आणि नंतर माठ्यात जावून त्या दोघींचीही भेट घेतली. यावेळी बापुसाहेब हेच गादीचे मालक आहेत. तुम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे राहायला हवे. आपल्या मर्जीनुसार नेमणुका करू नका. तुम्हाला सैन्य ठेवण्याचा अधिकार नाही, असे डन्लॉप यांनी त्यांना सांगितले.

दुसऱ्याच दिवशी बापुसाहेबांकडील काही लोक माठ्यात येवून दोन्ही बाईसाहेबांच्या गटात असलेल्या विष्णूभट मिरवणकर यांना आपल्या स्वाधिन करावे असे सांगू लागले. यानंतर सावित्रीबाई आणि नर्मदाबाई आपल्या लोकांसह माठ्यातून निघून पावशी येथे राहायला गेल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत हजार ते बाराशे लोक होते. तेथून त्यांनी सैनिक पाठवून वसुली सुरूच ठेवली. अखेर याचा पूर्ण निकाल लावण्यासाठी मिस्टर डन्लॉप पुन्हा आले. त्यांनी बापुसाहेबांना भेटून उभयता बाईसाहेबांसाठी आर्थिक नेमणूक देण्याचे ठरवले. तेथून ते पावशीला गेले. तेथे जाहीरनामा प्रसिद्ध केला. या दोघींसाठी काम करणाऱ्यांनी आपापल्या घरी निघून जावे, अशी सूचना यात होती. दुसऱ्या दिवशी पुढील बंदोबस्तासाठी चौके येथील ब्रिटीशांच्या कॅम्पमधून काही लोक आणण्यात आले. शिवाय सावंतवाडीतूनही कुमक मागवण्यात आली. उभयता बाईसाहेब जेथे राहायच्या तेथे चौकी ठेवून त्यांच्याकडील कारकून, सरदार यांना कैद करून सावंतवाडीत पाठवण्यात आले.

उभयता बाईसाहेबांचे पुन्हा माठ्यात आगमन

ब्रिटीशांनी बळाचा वापर करून पावशीमध्ये दोन्ही बाईसाहेबांची यंत्रणा नाहीशी केली. यामुळे त्यांचा नाईलाज झाला. यानंतर नर्मदाबाई आणि सावित्रीबाई सावंतवाडीतील माठ्यात पुन्हा आल्या. त्या अखेरपर्यंत तेथेच होत्या. १८२३ पासून खऱ्या अर्थाने बापुसाहेबांच्या स्वतंत्र कारभाराला सुरूवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT