ओरोस ( सिंधुदुर्ग ) - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यात शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी पक्ष सामील आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे भाजपवासी झाले आहेत. त्यातच आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लॉरेन्स मान्येकर निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली असून, सत्ताधारी भाजपकडून मान्येकर यांना उपाध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी समिधा नाईक व माधुरी बांदेकर यांच्यात चढाओढ सुरू आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता आहे. खासदार राणे यांच्या विचारांची सत्ता जिल्हा परिषदेत आहे. राणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचे पूर्वीचे सहा सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाला तरी संधी मिळेल, अशी शक्यता होती; पण हे भाजप सदस्य निवडून आल्यानंतर शिवसेना-भाजपने केलेल्या नोंदणीकृत गटात सहभागी आहेत. अजूनही हे सदस्य या गटातून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे यातील कोणाला पद मिळणे कायदेशीर अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे राणे यांच्या मूळ गटातील समिधा नाईक, माधुरी बांदेकर, राजलक्ष्मी डिचवलकर यांना संधी प्राप्त झाली होती; मात्र सौ. डिचवलकर या विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या विरोधात होत्या. त्यामुळे त्यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. परिणामी समिधा नाईक व माधुरी बांदेकर यांत ही स्पर्धा होणार आहे.
हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री
उपाध्यक्ष पदासाठीही निवडणूक होत आहे. विद्यमान उपाध्यक्ष रणजित देसाई यांना सलग अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर संधी देण्यात आली आहे. सतीश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गटनेते पदावरसुद्धा त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे देसाई यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मिळालीच तर जिल्हा परिषदेचे कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन तोंडावर आल्याने ही संधी त्यांना कदाचित मिळू शकते; परंतु देसाई यांना संधी मिळाली नाही तर अनेकांना या पदासाठी संधी आहे. विष्णुदास कुबल, रवींद्र जठार, उत्तम पांढरे अशी अनेक नावे आहेत. मूळ भाजपच्या सदस्यांना संधी देता आली असती तर राजेंद्र म्हापसेकर यांनाही ही संधी होती; पण आंब्रड पोट निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या लॉरेन्स मान्येकर यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या एकातरी सदस्याला पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्येकर यांना लॉटरी लागू शकते. मान्येकर हे यापूर्वी दोन वेळा निवडून आलेले असून दहा वर्षे काम केले आहे. त्यावेळी खासदार राणे यांच्या कॉंग्रेस पक्षात होते. त्यावेळी त्यांना पदाची कोणतीच संधी मिळाली नव्हती. त्यामुळे हा योग साधला जाईल, असे बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.