कोकण

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; अध्यात्म, विद्वत्तेचे आश्रयदाते राजश्री

तिसरे खेम सावंत यांची कारकिर्द अनेक चढउताराने भरलेली होती

शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : तिसरे खेम सावंत अर्थात राजश्री हे विद्येची अभिरूची असलेले आणि दानशुर होते. यांच्या कारकिर्दित अनेक विद्वान, कलावंत, साधूसंत राजाश्रयाला आले. यामुळे संस्थानला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांच्यात काळात संत साहित्याचीही निर्मिती झाली.

तिसरे खेम सावंत यांची कारकिर्द अनेक चढउताराने भरलेली होती. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लढाया झाल्या. दुष्काळासारखी नैसर्गिक संकटेही आली. आर्थिकदृष्ट्या त्यांच्या काळात संस्थानला बरीच ओढाताण सहन करावी लागली; मात्र विद्येची अभिरूची, दानशूरपणा यामुळे संस्थानला त्यांनी विशेषतः आध्यत्मिक क्षेत्रात एका उंचीवर नेले. अनेकांना तसेच देवस्थानांना इनाम जमिनी, नेमणूका त्यांच्याच काळात दिल्या गेल्या. काही संत, धार्मिक स्थळे त्यांच्या कारकिर्दीत नावारूपास आली.

सावंतवाडीतील आत्मेश्‍वर देवस्थानची स्थापना त्यांनीच पुढाकार घेऊन १७९९ मध्ये केली. याबाबत एक कथा सांगितली जाते. आत्मारामबाबा रामदास हे साधूपुरुष काशियात्रेला जावून परत येत होते. त्यांनी सोबत सावंतवाडीत स्थापन करण्यासाठी एक लिंग आणले होते. परतीच्या प्रवासात वालावल येथे उतरले असता रात्री त्यांना दृष्टांत झाला. त्यात अमुक एका व्यक्तीच्या घरी आपण राहत असून आपल्या अंगाला मिरचीचा जाळ पडला असल्याचे शंकराने स्वप्नात येऊन सांगितल्याचे त्यांना सांगितले. दुसऱ्यादिवशी त्यांनी चौकशी केली असता दृष्टांतात दिसलेल्या त्या व्यक्तीचे घर त्यांना सापडले. ती व्यक्ती दगड समजून एक बाणलिंग मिरची वाटपासाठी वापर होते. आत्मारामबाबांनी ते लिंग मागून घेतले. ही सगळी हकिकत त्यांनी राजश्रींना येऊन सांगितली. त्यांच्या समंतीने सावंतवाडीत लिंगाची स्थापना करण्यात आली. तेथे देऊळ व तळी बांधण्यात आली. काशिहून आणलेले लिंगही याच मंदिरात स्थापन करण्यात आले.

पहिल्या लिंगाला आत्मेश्‍वर आणि दुसऱ्याला प्राणेश्‍वर, अशी नावे देण्यात आली. त्याकाळात राजश्रींनी या देवस्थानला संस्थानकडून काही जमिन इनाम म्हणून दिली. राजश्रींची किर्ती ऐकून दूरदेशीचे कवी, पंडीत सावंतवाडीत राजश्रयासाठी यायचे. त्यांचा येथे योग्य सन्मानही केला जात असे. १७८०च्या दरम्यान तत्कालीन तेलंगणातील (आंध्र देश) गौतमी तिरावर राहणारे गोपाळ कुंदावोझ्झर नावाचे कवी सावंतवाडीच्या दरबारी आले. राजाज्ञेवरून त्यांनी सामंतविजय नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला. यात ३४७ श्‍लोक होते. यात सावंतवाडी संस्थानच्या पराक्रमाची गाथा वर्णन केलेली होती. १७८१ मध्ये विठ्ठल नरसिंह सांखवळकर यांनी त्याचे प्राकृत ओवीबद्द भाषांतर केले.

साधूपुरुष सोहीरोबानाथ आंबीये हेही याच काळात उदयाला आले. ते मुळचे पेडणे महालातील पालयेचे रहिवासी. त्यांचा जन्म १७१४ला झाला. पुढे ते बांदा येथे राहायला आले. तेथे ते कुलकर्णीपदाचे काम पाहायचे; मात्र जन्मापासून त्यांची वृत्ती सात्वीक होती. कुलकर्णी पदाच्या कामात त्यांचे मन रमेना. त्यामुळे त्यांनी हे काम सोडून दिले. ते एकदा सावंतवाडीहून बांद्याकडे जात होते. इन्सुलीतील सात जांभळी येथे त्यांना एक सद्पुरूष भेटले. त्यांनी केलेल्या उपदेशाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. यानंतर ते परमार्थाकडे वळले. यावेळी त्यांचे वय अवघे ३५ होते.

सोहीरोबानाथांनी पुढे अक्षयबोध, महदनुभवेश्‍वरी, पुर्णाक्षरी, अद्वयानंद, सिध्दांतसंहिता हे मोठे ग्रंथ लिहिले. याशिवाय अनेक पद्येही रचली. वयाच्या साठाव्या वर्षी म्हणजे १७७४ मध्ये ते आपल्या दोन मुलांसाठी उत्तर हिंदूस्थानात तिर्थाटनासाठी गेले. उत्तरेत ते ग्वाल्हेर येथे जिवबादादांच्या घरी उतरले. त्यांचा संपर्क महादजी शिंदे यांच्याशीही आला. शिंद्यांनी त्यांना उज्जयनी येथे मठ बांधून दिला. १ एप्रिल १७९२ मध्ये ते कोणालाही न सांगता मठातून निघून गेले. ते परत कोणाला दिसले नाहीत. सोहीरोबानाथांचे मंदिर आता इन्सुली येथे उभारण्यात आले आहे.

राजश्रींच्या काळात मळगावचे गोपाळ बोध बुवा या सत्पुरुषाचीही कारकिर्द ठळकपणे दिसते. त्यांचा जन्म १७६० ला परुळेत झाला होता. पुढे ते मळगावात स्थायीक झाले. पंढरपुरला बोधलेबुवा यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला होता. त्यांना विठ्ठलाने दृष्टांत देवून मंदिर स्थापण्यास सांगितले होते. नेमका याचवेळी राजश्रींनाही तसाच दृष्टांत झाला. त्यांनी मळगाव येथे मंदिरासाठी जमिनी इनाम दिल्या आणि देवस्थानची स्थापना केली. गोपाळबुवा उत्तम किर्तनकार होते. त्यांनी १७४० मध्ये मळगावात समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदीर आणि हे विठ्ठल मंदिर मळगाव येथे आहे. आजही मळगावहून कार्तिकीवारी एकादशीला पंढरपुरात जाते.

संघर्षमय संयमी कारकीर्दीची अखेर

तिसरे खेम सावंत यांच्या कारकिर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग घडले; मात्र त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांचे २५ सप्टेंबर १८०३ ला निधन झाले. सावंतवाडी माठेवाडा येथे त्यांचे उत्तमप्रकारे बांधलेले माठे आहे. त्यांना पुत्रसंतती नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT