82812
वेंगुर्ले ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे. शेजारी इतर.
महाअधिवेशनासाठी शिक्षक सज्ज
मुख्यमंत्री येणार; वेंगुर्लेतील उद्याच्या सोहळ्यास लाखोंची उपस्थिती अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा-शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्याय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गेली ६१ वर्षे चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद येथे आयोजित केली आहे. यानिमित्त उद्या (ता.१५) शिक्षण परिषद व सत्कार समारंभ, १६ ला त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन होणार आहे. याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवरांसह राज्यभरातील सुमारे एक लाख शिक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष शिंदे यांच्यासह राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सीताराम लांबर, भाऊ आजगावकर, संतोष परब, वासुदेव कोळंबकर, संतोष बोडके, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘कॅम्प येथे हे अधिवेशन होत आहे. उद्या सकाळी अकराला शिक्षण परिषद व सत्कार समारंभ होणार आहे. नवीन शिक्षण धोरण, संगणकीकृत प्रणालीतील अडथळे यावर चर्चा तसेच राज्यातील तज्ज्ञ ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सुनील लवटे यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार होणार आहे. याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते होणार आहे. १६ ला त्रैवार्षिक राज्य अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे आणि खनिकर्ममंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच शिक्षक नेते आदी उपस्थित राहणार आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. या अधिवेशनातच पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारणी निवडली जाणार आहे. आमची संघटना गेली ६१ वर्षे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ म्हणून कार्य करत आहे. या महाअधिवेशनातही शिक्षकांच्या विविध मागण्या यामध्ये शिक्षकांची रिक्त पदे, नवीन शिक्षक भरती, वस्ती शाळांचा प्रश्न, घर भाडे आदींवर चर्चा करून शिक्षकांच्या अतिरिक्त कामाकडे शासनाने लक्ष पुरवून शिक्षणातील गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही बदलत्या शिक्षण प्रणालीचा फायदा व्हावा, यासाठी सर्व सोयी शासनाने उपलब्ध करावेत, यांसह सर्वच मागण्यांबाबत चर्चा होईल. वेंगुर्ले नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. या अधिवेशनातून जाताना शिक्षकांना नवी ऊर्जा मिळेल.’’ राज्य प्राथमिक शिक्षक समितीची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा उत्कृष्ट व पारदर्शक काम करत आहे. दरवर्षी लेखापरीक्षणासह विविध उपक्रम ही शाखा घेत आहे. त्यामुळे या शाखेचे विशेष कौतुक यावेळी समितीचे राज्याध्यक्ष शिंदे यांनी केले.
-----------
चौकट
जिल्ह्यातील शाळांना उद्या विशेष सुटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या या महाधिवेशनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सहभागी होता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना १६ ला एक दिवसीय विशेष सुटी जाहीर केली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभागाचे विशेष आभार यावेळी समितीने मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.