कणकवली प्रशालेत
‘इंग्रजी भाषा दिवस’
कणकवली ः इंग्रजी भाषा ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आज मोबाईल संगणक, इंटरनेट सर्वच क्षेत्रांनी इंग्रजी भाषा व्यापली आहे. त्यामुळे आजच्या पिढीने इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे आवश्यक ठरले आहे, असे विद्यामंदिर माध्यमिक प्रशालचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी इंग्रजी भाषा दिवस कार्यक्रमात सांगितले. विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून विविध कविता, गाणी, भाषणे, गोष्टी, तसेच नाटिका सादर केल्या. इंग्रजीची आवड लागावी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन वाढावे, तसेच इंग्रजीतून बोलण्यास संधी मिळावी, यासाठी वर्षभरात घेतलेल्या निबंध, कथाकथन, भाषण स्पर्धा, पोस्टर्स मेकिंग स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थ्यांनीच इंग्रजीमधून केले. इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यामागे इंग्रजी विषय शिक्षिका संगीता साटम, वैभवी हरमलकर, वेदांती तायशेटे आणि विलास ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.
----
‘सिंधुरत्न टॅलेंट’मध्ये
तुळस प्रशालेचे यश
वेंगुर्ले ः सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत शारदा विद्यालय, तुळस कुंभारटेंबमधील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत शारदा विद्यालय, तुळसमधून ११ विद्यार्थी बसले होते. अकराही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ विद्यार्थी पदकप्राप्त ठरले. स्वरुपा मराठे (दुसरी) हिने सुवर्ण, आरोही कुंभार (दुसरी) व दिव्यल तांडेल (चौथी) यांनी रौप्य, युगाली टुंबरे (चौथी) याने कांस्य पदक पटकावले. प्रांजल रेडकर (दुसरी), वेद सावंत, विश्वास कुंभार (तिसरी), युवराज कुंभार (चौथी), मेघना कुंभार (चौथी), समृद्धी कुंभार (चौथी), प्रथम माळकर (चौथी) यांनीही या परीक्षेत यश मिळविले. मुख्याध्यापक वासुदेव कोळंबकर, सहकारी शिक्षक रावले, तसेच पालकांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी अभिनंदन केले.
....................
उभादांडा शाळेच्या
दोघांना शिष्यवृत्ती
वेंगुर्ले ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेत उभादांडा विद्यालयाचा मयंक नंदगडकर याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसाधारणमध्ये १५ वा, तर ‘ईडब्लूएस’मध्ये प्रतीक नाईक याने जिल्ह्यात ९ वा क्रमांक पटकावला. दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना बारावीपर्यंत वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे एनएमएमएस परीक्षा प्रमुख मनाली कुबल, दीपक बोडेकर, विद्या परुळेकर, उमेश वाळवेकर व सर्व परीक्षांची ऑनलाइन प्रक्रिया करणारे अजित केरकर यांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्थाध्यक्ष वीरेंद्र कामत-आडारकर, संस्था सचिव रमेश नरसुले आदींनी अभिनंदन केले.
---
तळेरे विद्यालयामध्ये
आज ‘महसूल’चे धडे
तळेरे ः येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कणकवली तहसील कार्यालय यांच्यातर्फे उद्या (ता. ९) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत विविध शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले एकाच ठिकाणी मिळणार आहेत. यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, तळेरे मंडलाधिकारी श्री. नागावकर, तलाठी कोळपकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर आदी उपस्थित राहणार आहेत. आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शिबिरास यावे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---
सावंतवाडीत आज
रक्तदान शिबिर
सावंतवाडी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे येथील बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीतर्फे उद्या (ता. ९) समाज मंदिरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता होणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.