लोगो ः स्वच्छ भारत मिशन उपक्रम
--
72520
प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करा
सीईओ खेबुडकर ः केंद्राच्या पथकाकडून स्वच्छ परिसराचीही होणार पाहणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः ‘‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०२५’ उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर, तसेच सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छता, शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्रातर्फे पाहणी करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
‘‘जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सहभागी होत असते. केंद्रातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्ययावत माहिती घेऊन उभारलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी व तपासणी करण्यासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे. तसेच राज्याचे देखील गुणांकन देशपातळीवर ठरणार असल्याने प्रत्येक गावाने आपापल्या सुविधांचा वापर नियमित केला पाहिजे,’’ असे आवाहन श्री. खेबुडकर यांनी केले.
या पाहणीदरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्ड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती आदींबाबत गुणांकन होणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी १२० गुण आहेत. ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण, गावातील सुविधांच्या वापराबाबत २४० गुण, तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणादरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे. एकूण १००० गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वांत स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या सर्वेक्षणादरम्यान घोषित होणार आहे. ही तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत असल्याने गावातील सुविधांचा वापर, तसेच बदललेल्या मानसिकतेबाबत कुटुंबांच्या भेटींशिवाय हा उपक्रम कायमस्वरुपी ठेवण्यासाठी गावपातळीवर झालेली उपाययोजना, ग्रामस्थांचा सहभाग आदी बाबींची प्रामुख्याने पाहणी होणार आहे.
गावभेटीदरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्वच्छता सुविधांचे निरीक्षण, ग्रामस्थांचा सहभाग, जनजागृती, दृश्यमान स्वच्छता आदींबाबत पाहणी होणार आहे. गावात गृहभेट होत असताना घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक स्वच्छतागृहांचा वापर, हात धुण्याच्या सवयी, तसेच कुजणारा व न कुजणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण व त्यासाठी असलेली सुविधा, शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम आदींबाबत गुणांकन होणार आहे. गावभेटीदरम्यान रस्त्यावर कुठेही सांडपाणी व घनकचरा पडलेला नाही. शिवाय प्लास्टिक व्यवस्थापन हे कचरा वर्गीकरण केंद्रात केले आहे. निर्माण झालेल्या खतखड्ड्यांमधून खतनिर्मितीबाबतचे नियोजन केले आहे. शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व नीटनेटकी केली आहेत का आदींबाबत पाहणी होणार आहे.
---------------
...असे होणार गुणांकन
सार्वजनिक ठिकाणे उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाडी परिसर, बाजार तळ या ठिकाणी उघड्यावर कचरा पडलेला नाही. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नीटनेटकी आहे का? वापर सुरू आहे का? कचरा वर्गीकरणासाठी वर्गीकरण केंद्र आहे का? आणि हा परिसर स्वच्छ असून मैला गाळ व्यवस्थापनाबाबत सुविधा गावात आहेत का? अशा प्रकारे पाहणी व गुणांकन होणार आहे. प्लास्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र, तसेच गोवर्धन व मैला गाळ व्यवस्थापन आदींच्या पाहणीदरम्यान गुणांकन होणार आहे.
-----------------
कोट
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा ही भविष्यकाळात बचतगटांना किंवा अन्य व्यवस्थेमार्फत कायमस्वरुपी चालविण्याबाबत सुरू ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीने शाश्वत उपायोजना केली असल्यास त्याचेही गुणांकन यात होणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनी दक्षता घ्यावी. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.