भाजपतर्फे चिपळुणात
७५ जणांचा सन्मान
चिपळूण ः योगाला जागतिक स्तरावर भाजपने वेगळी ओळख करून दिली आहे. आता खेडोपाडी ही योगाचे शिक्षक आहेत हेच या दिवसाचे महत्व आहे, असे मत माजी आमदार विनय नातू यांनी चिपळूणमधील नमो सन्मान सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. हा सोहळा ब्राह्मण सहाय्यक संघ हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण ७५ जणांना नमो सन्मान देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, बापू काणे, रामदास राणे, विजय चितळे. आशिष खातू, रसिका देवळेकर, वसंत ताम्हणकर आदी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांकडून
शैक्षणिक साहित्य वाटप
पावस ः उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वायंगणी येथील माजी विद्यार्थी अमित उबारे, नरेश पावसकर, शैलेश शिंदे, प्रतीक भोवड, संतोष पावसकर, निखिल शिंदे, प्रवीण घाणेकर, अक्षय शेडगे, प्रवीण भोवड यांनी शाळेतील मुलांच्या गरजा ओळखून त्यांना वह्या, चित्रकलेचे साहित्य असे शैक्षणिक साहित्य दिले. या माजी विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील मुलांनाच नाही तर गावातील व अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही चित्रकला वही व अन्य साहित्य दिले.
कबनूरकर स्कूलमध्ये
विद्यार्थ्यांची योगासने
साखरपा ः कोंडगाव येथील कबनूरकर स्कूलमध्ये जागतिक योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगशिक्षक धनंजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, योगासनं करण्यात आली. प्रारंभी शिक्षक धनंजय घाटे यांनी योगासनांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. नियमित प्राणायाम आणि योगासने केल्याने आरोग्याला होणारे फायदे याची माहिती दिली. योगासनामुळे केवळ शरीर बळकट होत नाही तर मन एकाग्र होऊन त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर प्रात्यक्षिकं झाली. त्यात प्रारंभी प्राणायाम, सुखासन, वज्रासन, ताडासन, वृक्षासन आदी आसने विद्यार्थ्यांनी केली. त्याचप्रमाणे अर्धमच्छिंद्रासन, पश्चिमोत्तानासन, चंद्रासन, मार्कटासन, खगासन आदी आसने विद्यार्थ्यांनी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
कृषीकन्यांतर्फे
योगाचे धडे
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या मांडकी-पालवण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कृषी संस्कृती ग्रुपतर्फे आबिटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत योगदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक संतोष काजरोळकर यांच्यासह सहकारी शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कृषीकन्यांतर्फे दाखवलेल्या आसनांचे अनुकरण करून उत्साह दर्शवला. कृषिकन्या अमिषा कोळी, वृषाली गोफणे, साक्षी अवतार, दिक्षा खांडेकर, सृष्टी काळे, साझी मुख, प्रज्ञा गोठणकर, मयुरी ढेफळे, मृणाल उपाध्ये, प्रिती पेरवी यांच्यातर्फे योगदिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी नियमित
खेळावे ः चव्हाण
सावर्डे ः गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या विद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
दिनानिमित्त मागील शैक्षणिक वर्षात खेळत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी विद्यालयामधील आयुष नागले, यश सावंत, अनुजा पवार, हुमेरा सय्यद, मुक्ता भुवड, सुजल चव्हाण, विराज हुमणे या खेळाडूंनी धावणे, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये उत्तुंग कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी नियमित खेळ व सराव करावा, असा सल्ला उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी दिला तर प्राचार्य राजेंद्रकुमार वारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पोलिस सभागृह
लांजात योगदिन
लांजा ः राष्ट्रीय योगदिनानिमित्त लांजा येथील प्रशासकीय यंत्रणांकडून विविध प्रकारच्या योगासनांची माहिती जाणून घेत प्रात्यक्षिकं लांजा शहरातील संकल्प सिद्धी पोलिस सभागृहात झालेला राष्ट्रीय योगदिन कार्यक्रम तहसील कार्यालय, लांजा पोलिस ठाणे, लांजा पंचायत समिती प्रशासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तिन्ही कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योगाशिक्षक देसाई यांनी योगाची प्रात्यक्षिकं करून घेतली. या वेळी आहारतज्ञ रसाळ यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आहार आणि योगाबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ. स्वरूप एकलुरे यांनी आधुनिक जीवनशैली व योगबाबत मार्गदर्शन केले.
बालभारती स्कूलमध्ये
मार्गदर्शन शिबिर
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त मालविका भट्टाचार्य यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाबद्दल माहिती दिली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी योगासनातून मनोवेधक प्रात्यक्षिकं सादर केली. त्यानंतर योगापूर्व तयारी व योगासने टप्प्याटप्प्याने घेण्यात आली आणि प्रत्येक योगासने चित्रफितद्वारे दाखवण्यात आली. त्या वेळी १० वीचे विद्यार्थी ईश्वरी संसारे व सक्षम लखनपाल यांनी प्रत्येक योगासनांचे फायदे सांगितले. विद्यार्थी आश्का बिर्जे, आर्या जाधव व नैतिक कुमार यांनी प्रश्नमंजुषा घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.