वाचनालय हे पद, पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही
प्रकाश देशपांडे ः काम करा, मग पद मिळवा, १६२ वी सर्वसाधारण सभा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भूतपूर्व कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी काहींना जबरदस्त कानपिचक्या दिल्या. वाचनालय पद, पैसा आणि प्रसिद्धीसाठी नसल्याचे त्यांनी सुनावले. त्यांनी दिलेल्या या कानपिचक्यांमुळे अनाहूत इच्छुकांचे अवसानच गळालेले सभागृहात पाहायला मिळाले.
वाचनालयाची १६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही अत्यंत महत्त्वाची ठरली. या सभेला पंचवार्षिक कार्यकारणी निवडीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे कारणही तसेच होते. या संस्थेत काम न करता काहीजण पदासाठी इच्छुक असून, त्यांनी गेले काही दिवस मोर्चेबांधणी सुरू ठेवली होती. गत काही दशकांच्या अविश्रांत परिश्रमाअंती वाचनालयाने विविध मोठे प्रकल्प उभारले आहेत. नव्या काही प्रकल्पांचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेत अलगद पदावर बसण्याचा काहींचा मनसुबा असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. सभासदांचा एकूण पवित्रा आणि उपस्थिती पाहता बिनकामीवृत्तीचे मनसुबे हवेतच विरले.
संस्थेत वयाच्या ७५ पर्यंत पूर्ण वेळ काम करत वाचनालयाला सुवर्णकाळ प्राप्त करून देणारे प्रकाश देशपांडे म्हणाले, आम्ही सारे आयुष्य या वाचनालयासाठी खर्ची घातलं. महापूरात आमच्या घरात आठ फूट पाणी होतं तेव्हा आम्ही वाचनालयात काम करत होतो. त्यातला चिखल बाहेर काढताना कणकण निवडीत होतो. याचमुळे संग्रहालयातल्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील त्या चिखलातून वाचवता आल्या. परग्रहावरील अणकुचीदार सुईसारख्या छोट्या दगडापासून ते छोट्या सुवर्ण नाण्यापर्यंत सारं काही चिखलातून वेचलं आहे. हजारो पुस्तकं पुरात भिजलेली पाहून त्याही परिस्थितीत पुस्तके वाचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली आहे. कलादालन, वस्तूसंग्रहालय, अपरांत संशोधन केंद्र हे आणि असे अनेक प्रकल्प हे एका रात्रीत झालेले नाही, हे लक्षात घ्या. वाचनालय म्हणजे पद, पैसा आणि प्रसिद्धीचे ठिकाण नव्हे तर निरपेक्ष वृत्तीने करावयाचे काम आहे. त्यांच्या या भाषणाला सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे दाद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.