सात माजी नगरसेवकांचा गट
स्थानिक नेतृत्वावर नाराज
सुधीर शिंदे : शिंदे शिवसेना विश्वासात घेत नसल्याचा आरोप
चिपळूण, ता. २७ : ज्या विश्वासाने शिवसेना शिंदे गटात आम्ही प्रवेश केला तो विश्वास आता जपला जात नाही. आमच्यावर कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. पक्षाचे कार्यक्रमही सांगितले जात नाहीत. त्यामुळे आम्ही प्रवेश केलेला सात माजी नगरसेवकांचा गट स्थानिक नेतृत्वावर नाराज असून, आम्ही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहोत, अशी भूमिका माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी सहकारी माजी नगरसवेकांसह काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. प्रवेश करताना विविध आश्वासने मिळाली; मात्र ती फोल ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले. चिपळुणात पक्षाच्या मंत्र्यांचे सातत्याने दौरे होतात, त्याची माहिती दिली जात नाही. सत्ताधारी पक्षाकडून पालिकेला देण्यात येणाऱ्या निधीची माहिती दिली जात नाही. कामे करताना माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पक्षाचे नेते येणार असले तरी त्याची माहिती समजू दिली जात नाही. कशासाठी लपवाछपवी केली जाते, याचा उलगडा होत नाही. शहरात ५० कोटींहून विकासकामे झाली असून, ती बोगस आहेत. त्याची माहिती विचारली असता कोणीही सरळ सांगत नाही, गोड बोलून फसवले जाते. पालिकेकडे बोगस कामांची माहिती मागितली असता ती मिळत नाही. पत्रव्यवहाराचा काही उपयोग होत नाही. या अधिकाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे? जर अधिकारी कामांची माहिती देत नसतील तर सत्ताधारी पक्षात राहायचे कशाला? सत्तेचा उपयोग काय? मंत्री, आमदार, खासदारांचा आम्हाला उपयोग काय? असे सांगून शिंदे यांनी थेट नाराजी व्यक्त केली. शहरातील स्थानिक नेतृत्व भेदभावाची भूमिका घेत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेगटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचा गट नाराज आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाबाबत माजी नगरसेवक करामत मिठागरी, संजीवनी शिंदे, महंमद फकीर, स्वाती दांडेकर, सुमैय्या फकीर हे पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
चौकट
रामदास कदम यांच्याशी चर्चेनंतर निर्णय ः शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. त्यांनी शहरातील विकासकामांना निधी दिल्याने आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. नाराजीबाबत माजी मंत्री रामदास कदम व राज्यमंत्री योगेश कदम यांनी बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील भूमिका घेऊ, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.