कोकण

आणीबाणीवेळी जागृती पत्रकांसाठी दापोलीतून आणायचे मशिन

CD

-rat२७p२५.jpg -
२५N७३५२१
गुहागर ः नाना पाटणकर यांचा सत्कार करताना भाजपचे पदाधिकारी.
----------
आणीबाणीवेळी जागृती पत्रकांसाठी दापोलीतून आणायचे मशिन
नाना पाटणकर ः जागवल्या आठवणी, गुहागरातील सातजण होते अटकेत
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : आणीबाणीच्या काळात जनजागृतीसाठी सायक्लोस्टाईलवर गुप्तपणे पत्रके काढायची आणि ती तितक्याच गुप्तपणे वितरित करायची, असे एक आवाहनात्मक काम तेव्हा संघ कार्यकर्त्यांना करावे लागत असे. गुहागरमध्ये हे मशिन उपलब्ध नव्हते. मग दाभोळ खाडीमार्गे दापोलीत जाऊन ते मशिन आणायचे. त्यासाठी लागणाऱ्या शाईच्या ट्यूब मिळवायच्या. आपल्या तालुक्यासाठी आवश्यक असतील तेवढ्या पत्रकांची छपाई करायची. त्यानंतर पुन्हा दापोलीत ते मशिन सुखरूप पोच करायचे. यामध्ये गुप्तता ही पाळावी लागायची, असे आणीबाणीचा काळ अनुभवलेले आणि त्यामध्ये जनजागृती केलेले मुकुंद उर्फ नाना पाटणकर यांनी सांगितले.
आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी नानांचा सन्मान केला. त्यांनी आणीबाणीच्या काळात संघाची सुप्त शक्ती कसे काम करत होती, याची माहिती दिली. पाटणकर म्हणाले, गुहागरातील अण्णा दामले, तात्या वझे, मधुकाका परचुरे, केशवकाका भावे, पांडुरंगशेठ तथा दादा शिरगांवकर, दांडेकर सर आदी सातजणांना मिसाखाली अटक झाली होती. सुशीलाबाई खरे, प्रमोदकाका सैतवडेकर, शशिनाना बिर्जे अशा काहीजणांना आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला म्हणून अटक झाली होती. दादा शिरगांवकर यांची चार दिवसाच्या पॅरोलवर सुटका होऊन ते पालशेतला आले; पण घरी बसले नाहीत. अटक केलेल्या सर्वांच्या घरी भेटण्यासाठी आम्ही प्रवास केला.
आपल्याला अटक होणार याची कुणकुण लागताच मधुकाका पोलिसांचा ससेमिरा चुकवून मुंबईला त्यांच्या भावाकडे ग. पां. परचुरे यांच्याकडे घरी गेले. तिथे झालेल्या गप्पांमध्ये पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय झाला; मात्र मुंबईत पोलिसांना शरण न जाता मधुकाका पुन्हा चलाखीने गुहागरला आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सदाशेठ आरेकरांविषयी बोलताना नाना म्हणाले, या काळात काँग्रेसचे गुहागरमधील प्रभावी नेते सदाशेठ आरेकर यांची भूमिका कौतुकास्पद होती. ठरवले असते तर सदाशेठ आपल्या विरोधकांना धडा शिकवू शकले असते; मात्र तसे न करता सदाशेठ यांनी गुहागर पोलिस ठाण्यात निरोप दिला होता. तुम्ही अटक करत असलेली मंडळी ही गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. अटक करताना त्यांचा अपमान करू नका. कोठडीत त्यांना मारहाण होता कामा नये. या वेळी नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, मंगेश रांगळे, उमेश भोसले, संतोष सांगळे, मंदार पालशेतकर उपस्थित होते.
----
केळकर नाव बदलून राहिले
आणीबाणीच्या काळात संघाचे प्रचारक (कै.) वसंतराव केळकर नानांच्या घरी शरद गोखले या नावाने १५ दिवस राहात होते. त्या काळात अचानक निरोप यायचा, अमूक ठिकाणी अमूक माणूस उभा आहे. त्याला अमूक ठिकाणी पोचवा, अशा अचानक येणाऱ्या कामांबरोबरच अटक झालेल्यांच्या घरी संपर्क, गुप्तपणे चालणाऱ्या शाखांवर प्रवास तसेच हा कठीण काळही निघून जाईल, हा आत्मविश्वास समाजात निर्माण करण्याचे कामही देशातील संघ कार्यकर्ते करत असल्याचे नानांनी सांगितले.
------
..वहिनी थरथरत दारात उभ्या होत्या
असोरेतील पद्माकर निमकर यांच्या घरी गेलो तेव्हा निमकरांच्या घराचे दार मोटरसायकलच्या आवाजाने बंद झाले होते. अखेर पांडुरंगशेठ तथा दादा शिरगावकरांनी वहिनींना नेहमीच्या पठडीतील हाक मारली तेव्हा घराचे दरवाजे उघडले; पण दादा नेमका काय निरोप घेऊन आले असतील असा विचार करत थरथर कापत वहिनी ओटीच्या दारात उभ्या होत्या. ही होती आणीबाणीची दहशत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT