73598
दहा वर्षे उलटूनही टर्मिनस अर्धवट
कोकण रेल्वे प्रवासी संघटना ः साखर वाटून शासनाचा गांधीगिरी मार्गाने निषेध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर जाऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झाले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर या सर्वाचा निषेध म्हणून १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा केला. रेल्वे प्रशासन, प्रवाशांना साखर वाटून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी सचिव मिहिर मठकर म्हणाले, ‘‘ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जनआंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसलेले हे दगडी सरकार आहे. त्यामुळे निदान आता तरी सरकारने कोकणवासीयांना न्याय द्यावा.’’ प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात, असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालकांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले. सल्लागार सुभाष शिरसाट, अॅड. सायली दुभाषी, पुंडलिक दळवी, सौ. बांदेकर, भूषण बांदिवडेकर, पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत कोरगावकर, रवी सातवळेकर पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर, रफिक मेमन, विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे, प्रकाश भाईडकर, दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, नितीन गावडे, विनायक गांवस आदी उपस्थित होते.
-----------------
‘जनतेची फसवणूक केल्याचे जाहीर करा’
रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर म्हणाले, ‘‘१० वर्षे प्रकल्प रखडला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीत एकाच पक्षाची सत्ता राज्यात आली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती शरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन केले आहे. केवळ रेल्वेमंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याचे जाहीर करा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.